दुर्दैवी! अखेर ‘त्या’ बिबट्याचा मृत्यू; फोटोशूट भोवले, कठोर कारवाईची मागणी
शेतात अचानक आलेल्या बिबट्याला हात लावून फोटोशूट करण्याचा प्रकार अखेर भोवला आहे. या फोटोशूटचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. मात्र, या बिबट्याने त्याचे प्राण गमावल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
बिबट्यासोबतच्या फोटोशूटचा हा प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील रायगव्हाण येथे घडला होता. शेतात आलेला हा बिबट्या आजारी असल्याचे सांगितले जाते. मात्र, त्याच्या शांतपणाचा गैरफायदा घेत स्थानिक ग्रामस्थांनी फोटोशूट केले. कुणी त्याला हात लावला, कुणी त्याच्या जवळ जाऊन फोटो काढले तर काहींनी या बिबट्याभोवती गराडा घातला. यासंदर्भात रायगव्हाणच्या तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष गणेश बन्शी शिंदे यांनी वन कर्मचारी रणदिवे यांना माहिती दिली. वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर उपचार सुरू केले. मात्र, या आजारी बिबट्याचा रात्री मृत्यू झाला आहे. दरम्यान, आता फोटोसेशनमुळेच या आजारी बिबट्याचा बळी गेल्याचे बोलले जात आहे. फोटोशूट करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.