रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 14 डिसेंबर 2022 (20:52 IST)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तब्बल 860 कोटींच्या कामांचे भूमिपजून होणार

nitin gadkari
नाशिक जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तब्बल 860 कोटींच्या कामांचे भूमिपजून होणार आहे. त्यात गोंदे ते पिंपरी सदो या दरम्यानच्या महामार्गाचे सहा पदरीकरण सुरू होणार आहे. मुंबई - आग्रा रोडवरील आडगाव शिवारातील दहावा मैल, जवळके फाटा तसेच नाशिक तालुक्यातील आंबेबहुला येथे बोगदे मंजूर झालेले आहेत.
 
येत्या 18 डिसेंबर रोजी या चारही कामांचे भूमिपूजन होणार आहे. या कामांमुळे नाशिक - मुंबई दरम्यानची वाहतूक कोंडी टाळणार असून खान्देशातील प्रवाशांना समृद्धी महामार्गाला सहजपणे जोडता येणार आहे. बोगद्यामुळे अपघात टळण्यास मोठी मदत होणार आहे, अशी माहिती खा. हेमंत गोडसे यांनी दिली.
 
गोंदे फाटा ते पिंपरी सदो या दरम्यानच्या रस्त्यावर सतत वाहतुकीची मोठी कोंडी होत असते. पिंपरी सदोपासून समृद्धी महामार्ग हा अगदीच हाकेच्या अंतर्गत आहे. त्यामुळे नाशिक - मुंबई दरम्यानच्या महामार्गाचे सहा पदरीकरण व्हावे यासाठी गेल्या काही महिन्यांपासून गोडसे यांचे प्रयत्न सुरू होते. नाशिक - मुंबई महामार्गावरील वाहतूक टाळण्यासाठी आणि धुळे, जळगाव, नंदुरबार येथील प्रवाशांना पिंपरी सदो शिवारातील समृद्धी महामार्गावर लवकरात लवकर पोहोचण्यासाठी गोंदे ते पिंपरी सदो या दरम्यानच्या रस्त्याचे सहा पदरीकरण होणे किती गरजेचे आहे हे गोडसे यांनीगडकरी यांच्या लक्षात आणून दिले होते.
 
यातूनच मागील महिन्यात ना. गडकरी यांनी गोंदे ते पिंपरी सदो या दरम्यानच्या रस्त्याचे सहा पदरीकरण करण्याचा निर्णय घेतला असून या कामासाठी सातशे कोटी रुपयांचा निधीला मंजुरी दिली आहे. यापूर्वी खासदार गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून महामार्गावरील आडगाव शिवारातील दहावा मैल येथे उड्डाणपूल तर जवळके फाटा आणि आंबे बहुला जंक्शन येथे बोगदयाना मंजुरी मिळालेली आहे.

Edited by-Ratnadeep Ranshoor