शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 28 एप्रिल 2021 (10:57 IST)

कोरोना संकटात विद्यापीठांनी प्रशासनाला आघाडीवर राहून सहकार्य करावे – राज्यपाल

कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक गंभीर असून या संकटावर मात करण्यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठांनी तसेच संलग्न महाविद्यालयांनी आघाडीवर राहून प्रशासनाला सहकार्य करण्याची सूचना राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील विद्यापीठांना केली.
 
राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच एनसीसी कॅडेट्स यांच्यासोबतच विद्यार्थी संघटनांना देखील रक्तदानासारख्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्याची सूचना करताना कोरोनाबाबत जनजागृती करण्याच्या कार्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी विद्यापीठांना केली.
 
कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल कोश्यारी यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी दूरदृश्य माध्यमातून चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सर्व कुलगुरूंनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी केलेली कार्यवाही तसेच भावी योजनांबद्दल राज्यपालांना माहिती दिली.
 
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, सध्याचा काळ शिक्षण क्षेत्राकरिता आव्हानात्मक आहे. सर्व विद्यापीठे आपापले अभ्यासक्रम व परीक्षा दूरस्थ पद्धतीने घेत आहेत. मात्र समाजाच्या आणि देशाच्या देखील विद्यापीठे व महाविद्यालयांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. विद्यापीठांचे देखील समाजाला या कठीण प्रसंगी मदत करणे नैतिक कर्तव्य आहे. विद्यापीठांनी प्रशासनाला आपणहून मदत करून प्रशासनावरील ताण कमी करण्यास मदत करावी.
 
अजूनही सर्व लोक मास्कचा वापर करीत नसल्यामुळे दररोज हजारो लोकांना दंड होत आहे. याकरिता महाविद्यालय व विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना जनजागृतीच्या कार्यात सहभागी करून घ्यावे. जनजागृतीमुळे देखील अनेक जीव वाचतील.
 
कोरोना निवारण कार्यासाठी विद्यापीठांनी कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधी मिळविण्याचे दृष्टीने योजना तयार कराव्या अशीही सूचना राज्यपालांनी केली.