गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 जुलै 2020 (09:00 IST)

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना कोव्हिड सुरक्षा कवच, परीक्षेकरीता जवळचे परीक्षाकेंद्र निवडण्याचा पर्याय खुला

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विद्यार्थ्यांना उन्हाळी सत्रातील 2020 परीक्षेकरीता वास्तव्याच्या ठिकाणापासून जवळचे परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा देण्यात आली आहे तसेच कोव्हिड -19 च्या पार्श्वभूमीवर संलग्नित महाविद्यालयांतील सर्व पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थी व परीक्षार्थींना ’कोव्हिड सुरक्षा कवच योजना लागू करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद व परीक्षा मंडळाने सदर योजनेस नुकतीच मंजुरी प्रदान केली आहे.
 
विद्यापीठाचे मा. परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले की, कोव्हिड - 19 च्या अपवादात्मक परिस्थितीत एकवेळची विशेष बाब म्हणून पदवीपूर्व विद्यार्थ्यांना त्याप्रमाणे विद्यार्थी हे त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणाजवळचे, त्यांच्या अभ्यासक्रमाचे महाविद्यालय हे परीक्षा केंद्र म्हणून निवडू शकतात किंवा सद्यस्थितीत ते ज्या महाविद्यालयात प्रवेशित आहेत ते महाविद्यालयदेखील ते परीक्षा केंद्र म्हणून निवडू शकतात. ज्या परीक्षा केंद्राची ते निवड करतील तेथूनच त्यांना लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेसाठी हजर राहावे लागेल. पदवीपूर्व सर्व अभ्यासक्रमांच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातर्फे आवाहन करण्यात येते की, कोव्हिड - 19 मुळे उद्भवलेल्या गुंतागुंतीच्या परिस्थितीत, विद्यार्थ्यांनी लांबचा प्रवास करु नये या उद्देशाने  त्यांनी त्यांच्या घराजवळच्या त्यांच्या विद्याशाखेच्या महाविद्यालयाचा परीक्षा केंद्र म्हणून पसंतीक्रम द्यावा. सदर पसंतीक्रम त्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांमापर्फत विद्यापीठास दि.14 जुलै 2020 पर्यंत पाठवावा. यासंबंधीचे परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
 
विद्यापीठाकडून कोव्हिड - 19 च्या पार्श्वभूमीवर संलग्नित महाविद्यालयांतील सर्व पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थी व परीक्षार्थींना ’कोव्हिड सुरक्षा कवच’ योजनेअंतर्गत, विद्यार्थी आजारी झाल्यास उपचारासाठी रुपये एक लाख व दुर्दैवी मृत्यू झाल्यास रुपये तीन लाख इतकी रक्कम प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना कोव्हिड-19 करीता शासनाने निर्देशित केलेल्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे तसेच आरोग्याची काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले आहे. याबाबत अधिक माहिती विद्यापीठाचे www.muhs.ac.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.