विद्यार्थ्यांना समजला किफायतशीर घरे बनविण्याचा कानमंत्र
कुठल्याही घरांचे डिझाईन बनविताना सर्वात आधी लोकांची गरज आणि जागेची उपलब्धता यांची सांगड घालून किफायतशीर दरात आणि कमी जागेत घरे कशी उभारता येऊ शकतात याचा प्रत्यक्ष अनुभव आयडीया वास्तूविशारद कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मिळाला. यासाठी कॉलेजमध्ये तीन दिवसाच्या ‘व्हर्टीकल स्टुडीओ’ चे आयोजन करण्यात आले होते. यात मान्यवर तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली शहरी भागात किफायतशीर घरे साकारण्याचा कानमंत्र विद्यार्थांना मिळाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला किफाईतशीर दरात घरे यावर विद्यार्थी उपाय सुचवणार आहे.
नाशिकमध्ये विद्यावर्धन ट्रस्ट यांच्या मार्फत इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन इंव्हारमेन्ट अॅण्ड आर्किटेक्चर अर्थात आयडिया कॉलेज कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा यासाठी तीन दिवसाच्या ‘व्हर्टीकल स्टुडीओ’ चे आयोजन करण्यात आले होते. घराच्या वाढत्या किंमतीमुळे गेल्या काही वर्षात स्व:ताचे हक्काचे घर असणे सामान्य लोकांसाठी स्वप्नवत ठरत आहे त्यांना घर कसे मिळेल असा विषय या कार्यशाळेसाठी निवडला गेला होता.
घर तयार करताना अशावेळी लोकांच्या गरजा, जागेची उपलब्धता आणि पैसा या तीनही गोष्टीची सांगड घालत वास्तूतज्ञानाला काम करावे लागते. अशावेळी स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या वस्तूंचा वापर करत घरे साकारता येतात. यात स्थानिक सांस्कृतीचा खुबीने वापरता होऊ शकतो. याबाबत डहाणू येथे अशाप्रकारची घरे साकारलेले आर्किटेक्ट प्रतिक धामनेरकर यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. तर गेल्या वर्षापासून विदेशात कॉम्पुटर गेम सारख्या घरांची उभारणी होतांना दिसते. या नाविन्यपूर्ण संकल्पनेची ओळख विनित निकुंभ यांनी करून दिली. अहमदाबादहून आलेल्या यतिन पंड्या यांनी घर उभारतांना ग्रामीण भागात घरासोबतच व्यवसाय सुद्धा जोडलेला असतो. त्यामुळे शहरात वापरले जाणारे टॉवरचे डिझाईन त्याठिकाणी मुळीच उपयोगाचे नाही हे लक्षात घ्यायला हवे असे सांगितले. मनोज कुमार आणि नम्रता कपूर यांनी आर्किटेक्टचे आता कामाचे स्वरूप बदलत असून अधिक व्यापक होत आहे. सौंदर्य, कलात्मकता याच्या जोडीला प्रत्यक्ष परिस्थतीचा सुद्धा अभ्यास करावा लागतो असे सांगितले. मुंबईतील धारावी सारख्या मोठ्या वस्तीवर काम करतांना लोकांच्या रोजगाराचा आधी विचार करावा लागतो असे जय भडगावकर यांनी सांगितले.
‘व्हर्टीकल स्टुडीओ’ च्या दुसऱ्या दिवशी ‘धारावी स्लम ऑन सेल’ या माहितीपटाचे सादरीकरण करण्यात आले. यात धारावीतील लोकांचे जगणे, त्याचे घराबाबतचे विचार मांडण्यात आले आहेत.