मंगळवार, 21 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 एप्रिल 2023 (10:53 IST)

उटीची वारी म्हणजे काय ?

What is Ooty Wari  Sant Nivrittinath Maharaj Samadhi Temple  Trimbakeshwar
त्र्यंबकेश्वर येथे असलेल्या संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिरात समाधीसह विठुरायाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावण्यात येतो. या सोहळ्याला उटीची वारी म्हणून संबोधले जाते. अभंग म्हणत पखवाज वाद्याच्या तालात आणि हरिनामाच्या जयघोषात सुहसिक पदार्थ या चंदनाच्या लेपमध्ये टाकून समाधीला व मूर्तीला लेप लावण्यात येतो. यापूर्वी मूर्ती आणि समाधी पूर्णतः स्वच्छ पाण्याने धुऊन घेतली जाते. त्यानंतर परंपरागत चालत आलेल्या प्रथेनुसार दुपारच्या सुमारास लेप लावण्यात येतो.
 
दरम्यान, नामसप्ताहाचे आयोजन करून यावेळी सात दिवस रोज येणारे भाविक चंदन उगाळून त्याची उटी तयार करत असतात आणि चैत्र कृष्ण एकादशी म्हणजे वरुथिनी एकादशीच्या दिवशी सुगंधी वनस्पतीपासून तयार केलेला चंदनाचा लेप उटी संत निवृत्तीनाथ समाधीस लावली जाते. त्यांनतर रात्रीच्या सुमारास ही उटी काढून ती भाविकांमध्ये शिंपडली जाते. त्यानंतर त्याचा प्रसाद म्हणून हा मंदिरात आलेल्या भाविकांना वाटला जातो.
 
 
उटीची वारी म्हणजे काय ?
उटीची वारी ही वर्षानुवर्षे चालत आली आहे. सुगंधीत चंदनाचा लेप उटी हा संत निवृत्तीनाथ महाराज समाधी आणि मंदिरात असलेल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला लावला जातो. ग्रीष्म ऋतुचा त्रास देवाला होऊ नये आणि भाविकांना होऊ नये. तसेच वाढत्या उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी हा लेप लावला जातो, अशी वारकरी भाविकांची भावना आहे. त्यामुळे नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये उटीची वारी हा उत्सव सोहळा साजरा होतो.
यासाठी संस्थानमार्फत चैत्र वद्य ५ ते चैत्र वद्य १२ पर्यंत नामसप्ताहाचे आयोजन केले जाते.


यावेळी सात दिवस रोज भाविक भक्त चंदन उगाळून त्याची उटी तयार करतात व चैत्र वद्य ११ च्या दिवशी ही उटी समाधिस लावली जाते व त्याच दिवशी रात्री या उटीचा प्रसाद सर्व वारकरी भक्तांना वाटण्यात येतो. यासाठी लाखोंच्या संख्येने वारकरी येथे जमतात. या उटीच्या प्रसादाने अनेक व्याधी, संसारीताप निवृत्त होत असल्याचा लोकांचा अनुभव आहे. यासाठी वारक-यांची राहण्याची, भोजनाची व्यवस्था संस्थानमार्फत पूर्वीपासून ठरवून दिलेल्या गांवां मार्फत केली जाते.
 
चैत्र वद्य १२ या दिवशी काल्याच्या कीर्तनाने तसेच संध्याकाळी रथोत्सवाने नगर प्रदक्षिणा करून या उत्सवाचा समारोप होत असतो.
 
क्रेडीट : श्रीसंत निवृत्तिनाथ महाराजांची समाधि संस्थान सर्व फोटो 

Edited By - Ratnadeep ranshoor