बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 2 ऑगस्ट 2021 (14:44 IST)

पूजा चव्हाण प्रकरण नेमकं काय, कोण आहे पूजा चव्हाण ?

पूजा चव्हाण ही 22 वर्षीय तरुणी मूळची परळी, जिल्हा बीड येथील रहिवासी आहे. गेल्या काही दिवसांपासून ती पुण्यातील महंमदवाडी येथील हेवन पार्क या सोसायटीमध्ये राहत होती.
 
पूजाने महाविकास आघाडीमधील एका मंत्र्यामुळे आत्महत्या केल्याच्या चर्चा सोशल मीडियावर केल्या जात आहेत. भाजपच्या महिला आघाडीकडून पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. याप्रकरणाची चौकशी करुन आरोपीला अटक करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
 
स्पोकन इंग्लिश क्लास लावण्यासाठी पूजा पुण्यात आली होती. मात्र 7 फेब्रुवारीला रात्री दीड वाजता तिने पुण्यातील महंमदवाडी येथील हेवन पार्क या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. सुरुवातीला पूजाने आत्महत्या केल्याचंच दिसत होतं मात्र, या प्रकरणाच्या 11 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या. या क्लिपमध्ये कथित मंत्री आणि त्याच्या कार्यकर्त्याचं संभाषण असल्याचं बोललं गेलं असून या संभाषणातून अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या. त्यामुळे या कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याने प्रकरणाला नवीन वळण आलं. पूजाने आत्महत्या केली की तिची हत्या झाली? अशी चर्चा सुरू झाली.
 
महाविकास आघाडीतील एका मंत्र्यामुळे या तरुणीने आत्महत्या केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. "पूजा चव्हाण घटनेत समोर आलेले सगळे अपडेट्स पाहाता प्रकरणाचा थेट रोख शिवसेना मंत्री संजय राठोडांकडे जातो. पोलिसांनी स्यूमोटो घेऊन मंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा," अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली होती. 
 
सोशल मीडियावर दोन ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या असून यातील एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ती आत्महत्या करणार आहे तुम्ही तिला समजावून सांगा असे म्हणत आहे. तर तरुणीने आत्महत्या केल्यानंतर अरुण नावाचा एक कार्यकर्ता त्या तरुणीच्या मृतदेहाजवळ होता. त्यावेळी कथित मंत्र्याने त्या तरुणीचा मोबाईल ताब्यात घेण्यास सांगितल्याचे दुसऱ्या ऑडिओ क्लिपमधून समोर आलं आहे.
 
''संबंधित तरुणीचे प्रेमसंबंध एका मंत्र्यांशी असल्याच्या क्लिप सोशल मीडियावर फिरत असल्याचे समजले आहे. एका तरुणीचा मृत्यू व त्याभोवती निर्माण झालेले संशयाचे वर्तुळ पाहता हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पुणे पोलिसांनी करु नये, त्यातील सत्य तात्काळ समोर आले पाहिजे असेही फडणवीस म्हणाले होते.''
 
आता पोलिसांना पूजाच्या मोबाईल मधून बरेच कॉल रिकॉर्ड आढळले आहे.या मध्ये पूजा आणि माजी मंत्री संजय राठोड यांचे संभाषण आहे.हे संभाषण पूजाने आत्महत्या केल्याच्या पाच -सहा दिवसा पूर्वी केले होते.
 
पूजा चव्हाण ने 7 फेब्रुवारीला पुण्यात राहत्या घरात इमारती वरून उडी मारून आत्महत्या केली होती.या प्रकरणात माजी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव सातत्याने घेतले जात होते.माजी वनमंत्री संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांचे 90 मिनिटाचे संभाषण असल्याचे वृत्त मिळत आहे.हे संभाषण बंजारा समाजात असल्याचे वृत्त आहे.ही संभाषणे पूजाने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवली होती.या संभाषणात असलेला आवाज संजय राठोडचा असल्याचे सांगितले.
 
पोलिसांनी पूजाचा फोन फॉरेन्सिक टीमकडे पाठविला होता.त्यामुळे या संभाषणामुळे माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.या प्रकरणावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यावर संजय राठोड यांना आपल्या पदावरून राजीनामा द्यावा लागला.