शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेतेपद कुणाला मिळणार?

- प्राजक्ता पोळ
राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले आहेत.
 
वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाची फक्त औपचारिकता बाकी आहे, असं म्हटलंय.
 
तसंच राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर काही काँग्रेसचे आमदारही भाजपमध्ये येणार असल्याचं महाजन यांनी सांगतिलंय. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश आता कुठल्याही क्षणी होऊ शकतो असं बोललं जातय.
 
येत्या १७ जूनला राज्याच पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. फडणवीस सरकारचं हे शेवटचं अधिवेशन आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षनेते पद कोणाकडे असणार? राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार का? साडेचार वर्षं फडणवीस सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले विखे पाटील पाटीलांसाठी संपले आहेत का? असे अनेक प्रश्न समोर येत आहेत.
 
विखे पाटील यांची कारकीर्द
२०१४च्या निवडणुकीत मोदी लाटेतही राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी मतदारसंघातून ७५,००० मताधिक्याने निवडून आले. ३१ ऑक्टोबर २०१४ ला देवेंद्र फडणवीस सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.
 
विरोधी पक्षनेते म्हणून विखे पाटील यांनी सरकारवर जितके आरोप केले तितकीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मैत्रीही वाढवली. मुख्यमंत्र्यांबरोबर असलेल्या मैत्रीमुळे आणि त्यांच्या कौतुकामुळे विखे-पाटील अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही सापडले.
 
विरोधी पक्षनेते असताना केलेले आरोप
राज्यातील शेतकरी, बेरोजगार, मराठा समाज, धनगर समाज यांची फडणवीस सरकारने खोटी आश्वासनं देऊन फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी वारंवार केला होता.
 
मुंबई विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीत राज्यसरकारने केलेल्या बदल्यांमुळे निवडक बिल्डरांना १ लाख कोटी रूपयांहून अधिकचा लाभ झाला असून मुख्यमंत्री कार्यालयाने यात १० हजार कोटींची डील केल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला होता. यात मुख्यमंत्र्यांनी विखे पाटील यांना अब्रूनुकसानीची नोटीसही पाठवली होती.
 
पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की खेरदी प्रकरणी, विनोद तावडेंवर बोगस डिग्री आणि पुस्तक खरेदी प्रकरणी, गिरीश बापट यांच्यावर तुरडाळ डाळ खरेदी प्रकरणी विखे पाटील यांनी आरोप केले आणि या मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली होती.
 
जीएसटी, नोटाबंदी, शेतकरी कर्जमाफी, कायदासुव्यस्था यावरून विविध आंदोलनं आणि भाषणांमधून टीका केली होती.
 
विरोधी पक्षनेते असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी फडणवीस सरकारमधल्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप आता माझ्यासाठी संपले असल्याचं वक्तव्य राजीनामा दिल्यानंतर केलंय.
 
काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बीबीसी मराठीशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका करताना म्हटलं होतं, "विखे यांनी विरोधी पक्षनेत्याची भूमिका कधी प्रभावीपणे मांडली नव्हती ते कधीच भाजपचे झाले आहेत. सत्ता स्थापनेच्या सुरुवातीपासूनच विखे पाटील यांच्यावर भाजपशी जवळीक असल्याचे आरोप झाले."
 
जुलै २०१७ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील हे एकाच मंचावर आले. त्यावेळी विखे पाटील यांनी केलेली वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.
 
मागच्या सरकारपेक्षा या सरकारमधले मंत्री जास्त जवळचे वाटतात.
निळवंडे धरणाचं आजपर्यंत फक्त राजकारण झालं फडणवीसांच्या काळात हे काम पूर्ण होईल असं वाटतं.
साईबाबा शताब्दी महोत्सवास मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदींना बोलवावे.
मुख्यमंत्री आणि माझ्या घट्ट मैत्रीवर शिक्कामोर्तब झालंय.
या वक्तव्यांमुळे काँग्रेस पक्षातूनच विखेंवर विरोधी पक्षनेते की काँग्रेस विरोधी नेते अशी टीका झाली होती.
 
कोण होणार नवे विरोधी पक्षनेते?
काँग्रेसमध्ये तीन नावं चर्चेत होती. विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड या नावांची सुवातीला चर्चा झाली. राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गेबरोबर झालेल्या बैठकीनंतर ही नावं मागे पडली.
 
विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झालं. मल्लिकार्जुन खर्गे हे बैठक संपल्यावर विजय वडेट्टीवार यांना त्यांच्या गाडीत बसवून घेऊन गेले त्यामुळे वडेट्टीवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सध्या चर्चा आहे.
 
कोण आहेत विजय वडेट्टीवार
विदर्भातील प्रभावी नेते म्हणून विजय वडेट्टीवार यांची ओळख आहे. गडचिरोली जिल्हा निर्मिती आंदोलनामध्ये वडेट्टीवार यांचा मोठा सहभाग होता.
 
तेव्हापासून विदर्भातील आक्रमक नेत्याची त्यांची प्रतिमा आहे. राज्याचं सत्ताकेंद्र विदर्भातील आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी विदर्भातला ओबीसी चेहरा दिल्यास विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची राजकीयदृष्टया वेगळी प्रतिमा तयार होऊ शकते, असं जाणकारांना वाटतं.
 
१९८६ साली वडेट्टीवार यांनी गडचिरोलीतून राजकारणाला सुरुवात केली. २००५ साली काँग्रेस पक्षात प्रवेश केला. १९९८ - २००४ दरम्यान ते विधानपरिषद सदस्य राहीले. त्यानंतर चिमूर आणि आता ब्रम्हपूरी मतदारसंघातून ते विधानसभा सदस्य आहेत. जलसंपदा आणि ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं आहे.
 
बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरात हे कॉंग्रेस पक्षातले जेष्ठ आणि अनुभवी नेते म्हणून ओळखले जातात. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर विरोधक मानले जातात.
 
१९८५ ते २०१४ पर्यंत सलग संगमनेर तालुक्यातून आमदार राहीले आहेत. आघाडी सरकारच्या काळात कृषी, महसूलसारख्या महत्वाच्या खात्याचे मंत्रिपद त्यांनी भूषविलं आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी थोरात यांचा दांडगा अनुभव उपयोगी ठरू शकतो.
 
वर्षा गायकवाड
दलित नेत्या म्हणून वर्षा गायकवाड यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. महिला आणि दलितांच्या प्रश्नांवर आमदार म्हणून त्या विधानसभेत आणि सभागृहाबाहेरही कायम आक्रमक राहील्या आहेत.
 
गेली १५ वर्षं त्या धारावी मतदारसंघातून आमदार राहीलेल्या आहेत. महिला आणि बालविकास मंत्रिपद त्यांनी भूषवलेलं आहे. महिला विरोधी पक्षनेतेपदी असल्यास राजकीयदृष्ट्या एक वेगळी प्रतिमा तयार होऊ शकते.
 
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार नसल्याचं शरद पवार यांनीच स्पष्ट केलंय. त्यामुळे नवीन विरोधी पक्षनेते हे काँग्रेसचेच असतील. पण त्यांना विरोधी पक्ष नेतेपदाचा दर्जा मिळणार की गटनेता म्हणून ठेवलं जाणार हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.