गुरूवार, 7 डिसेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 22 ऑक्टोबर 2022 (11:32 IST)

संजय राऊत यांच्या राजकीय वक्तव्याचा त्रास का? - विशेष न्यायालय

sanjay raut
"पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत हे राजकीय नेते आहेत. त्यामुळे त्यांना न्यायालयात सुनावणीसाठी आणले जाते, त्यावेळी न्यायालयाबाहेर त्यांचे समर्थक आणि हितचिंतक त्यांना भेटण्यासाठी येत असतील, तसेच राऊत स्वत: प्रसारमाध्यमांसमोर राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींबाबत वक्तव्य करत असतील तर या सगळयाची चिंता तुम्हाला का? तुमची नेमकी अडचण काय?" असा प्रश्न विशेष न्यायालयाने शुक्रवारी (21 ऑक्टोबर) मुंबई पोलिसांना विचारला.
 
तसंच, या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास आणि आदेश देण्यास नकार दिला. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
 
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आरोपपत्र दाखल केल्यानंतर राऊत यांनी नियमित जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. सध्या या अर्जावर सुनावणी सुरू असून सुनावणीच्या वेळी राऊत यांना न्यायालयात आणले जाते.
 
न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यावरही त्यांना न्यायालयात आणले जाते. न्यायालयीन कोठडीत असताना राऊत हे प्रसारमाध्यमांबरोबर बोलतात. याबाबत सरकारने पोलीस अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर काळा घोडा येथील सत्र न्यायालयातील सुरक्षेची जबाबदारी असलेल्या कुलाबा पोलिसांतर्फे शुक्रवारी विशेष न्यायालयाकडे याबाबत तक्रार करण्यात आली. त्यावेळी तुम्हाला नेमकी अडचण काय? असा प्रश्न विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी पोलिसांना केला.
 
Published By- Priya Dixit