भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत भाषण करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं दोनवेळा कौतुक केलं. दोन्ही वेळेला त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना शरद पवारांचं उदाहरण दिलं.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर विरोधकांनी उपस्थित केलेल्या, विशेषत: राहुल गांधींनी मांडलेल्या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तरं दिली. यावेळी मोदींनी राहुल गांधी, काँग्रेस आणि सर्वच विरोधकांवर जोरदार टीका केली.
या भाषणात दोनवेळा नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचा उल्लेख केला आणि दोन्ही वेळेला त्यांनी पवारांचं कौतुक केलं.
पहिल्यांदा कौतुक : पवारांकडून शिका - मोदी
राहुल गांधींचं नाव न घेता, काँग्रेस नेतृत्वाच्या निराशजनक वृत्तीवर मोदींनी भाष्य केलं. त्यावेळी नेतृत्व कसं असावं, हे सांगताना पवारांचं उदाहरण त्यांनी दिलं.
नरेंद्र मोदी म्हणाले, "लोकप्रतिनिधी छोटा असो वा मोठा असो, लोक तुमचा अनुयय करतात. जर नेताच निराशाजनक असेल, तर काय करणार? इतरांचं सोडा, कुणाकडून शिकत नसाल, तर शरदरावांकडून (शरद पवार) शिका."
"शरद पवार त्यांना अनेक आजार असतानाही, त्यांच्या भागातील लोकांना प्रेरणा देतात," असं नरेंद्र मोदी म्हणाले.
पुन्हा कौतुक : पक्षभेद विसरून पवार पुढे आले - मोदी
मोदींनी दुसऱ्यांदा पवारांचं कौतुक केलं ते, कोरोनासंबंधी सर्वपक्षीय बैठकीच्या मुद्द्यावरून. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसवर निशाणा साधला.
नरेंद्र मोदी म्हणाले, "काही लोकांना आत्मपरीक्षणाची गरज आहे. जेव्हा कोरोनावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली, तेव्हा काही पक्ष तिथे आले नाहीत. त्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला."
मोदी पुढे म्हणाले, "मी यासंदर्भात शरदरावांचे (शरद पवार) आभार मानतो. त्यांनी म्हटलं, बैठकीवर बहिष्काराचा निर्णय यूपीएचा नाही. शिवाय, जास्तीत जास्त पक्षांशी बोलून त्यांना बैठकीला बोलावेन. टीएमसीसह इतर पक्षांना घेऊन ते आलेही."
कोरोनाचं संकट सर्व मानवजातीवर आलेलं संकट होतं, पण तिथेही तुम्ही बहिष्कार टाकलात, असं मोदी पुढे म्हणाले.
लोकशही तुमच्या मेहरबानीमुळे नाहीय - काँग्रेसवर टीका
यावेळी नरेंद्र मोदींनी 'ही लोकशाही तुमच्या मेहरबानीमुळे नाहीय' असं म्हणत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
मोदी म्हणाले, "1975 मध्ये लोकशाहीचा गळा दाबणाऱ्यांना लोकशाहीवर बोलण्याचा हक्क नाही. आपल्याला गर्वानं म्हणायला हवं की, भारत लोकशाहीची माता आहे. लोकशाही भारतात शतकानुशतके चालत आलीय.
"काँग्रेसची अडचण आहे की त्यांनी घराणेशाहीच्या पुढे विचारच केला नाही. भारताच्या लोकशाहीला सर्वात मोठा धोका घराणेशाही पक्षामुळे आहेत. पक्षात कुटुंब सर्वोच्च असतं, तेव्हा सर्वात मोठं नुकसान गुणवत्तेची होते. देशात मोठ्या कालावधीनं या विचारानं नुकसान सोसलंय. सर्व पक्षांनी लोकशाहीच्या आदर्श मुल्यांचं पालन करावं."
तसंच, काँग्रेस हा पक्षाच नसता, तर काय झालं असतं असंही भाष्य मोदींनी यावेळी केलं.
"महात्मा गांधींच्या इच्छेनुसार जर काँग्रेस नसती, तर घराणेशाहीमुक्त लोकशाही असती. काँग्रेस नसती तर आणीबाणीचं कलंक नसता, जातीवाद आणि प्रांतिक वाद इतका नसता, शिखांचं शिरकाण नसतं झालं. पंजाब दहशताखाली जळत नसता. वीज, शौचालयं, पाणी यासाठी इतकी प्रतिक्षा करण्याची गरज भासली नसती," असं मोदी म्हणाले.
काल लोकसभेत पंतप्रधान काय म्हणाले होते?
देशभरात कोरोनाचा संसर्ग पसरवण्यास काँग्रेस जबाबदार आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना स्थलांतर करण्यासाठी भाग पाडलं, त्यासाठी मोफत तिकीटं त्यांना देण्यात आली, असा आरोपही नरेंद्र मोदींनी केला.
लॉकडाऊनमध्ये काँग्रेसच्या लोकांनी मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर उभं राहून मुंबईतील कामगारांना आपआपल्या घरी जाण्यासाठी तिकीट काढून दिले. लोकांना मुंबई सोडून जाण्यासाठी प्रोत्साहित केलं असंही ते म्हणाले.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणेवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते संसदेत बोलत होते. काँग्रेसचा अनेकदा पराभव झाला तरी त्यांचा अहंकार जात नाही. काँग्रेसच्या भूमिका आणि वक्तव्य पाहिली तर 100 वर्षं सत्ता येऊ नये यासाठी जणू त्यांचा प्रयत्न सुरू आहे असं वाटतं असा टोला त्यांनी लगावला.
भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहत त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.
पश्चिम बंगाल, तमिळनाडू, गोवा, ओडिशा, नागालँड अशा अनेक राज्यात मतदारांनी काँग्रसला नाकारलं आहे याचा उल्लेख करत त्यांनी काँग्रसच्या पराभवांचा पाढा वाचला. तरीही काँग्रेसचा अहंकार जात नाही, अशी टीका त्यांनी केली.
पंतप्रधानांनी म्हटलं, "पहिल्या लॉकडाऊन काळात देश करोना नियमांचे पालन करत होता, साऱ्या जगात असा संदेश दिला जात होता, तेव्हा काँग्रेसच्या लोकांनी मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर लोकांना जाण्यासाठी सांगितलं गेलं, तिकीट काढून दिलं गेलं.
महाराष्ट्रातील ओझं कमी करा आणि जिथे कोरोना कमी आहे त्या उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये घेऊन जा असंच जणू म्हटलं. तुम्ही आमच्या श्रमिक लोकांना मोठ्या त्रासात ढकलून दिलं."
कोरोनासारख्या आरोग्य संकटातही काँग्रेसने कायम टीका केली. राजकारणासाठी कोरोना काळाचा वापर केला. त्यावेळी जे निर्णय घेतले त्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. जगभरात भारताची प्रतिमा खराब होण्यासाठी टीका करण्यात आली असंही ते म्हणाले.
'पंतप्रधानांचं वक्तव्य त्यांना शोभणारं नाही'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
ते म्हणाले, "कोरोना काळात परराज्यातील मजुरांची काळजी घेणं ही केंद्र सरकारचीही जबाबदारी होती. पण पंतप्रधानांनी जे वक्तव्य केले आहे ते दुर्दैवी आहे. त्यांच्या पदाला ते शोभणारं नाही."
आम्ही लाखो मजुरांना साभांळलं असून त्यांना खाद्यपदार्थही दिली. पण काही काळानंतर त्यांना त्यांच्या घरी जायची इच्छा होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने त्यांना परत पाठवण्यासाठी व्यवस्था केली असं स्पष्टिकरण थोरात यांनी दिलं आहे.
मजुरांना तिकीट दिले हे खरं आहे. सोबत त्यांना जेवणाचा डबाही दिला होता. याचं कौतुक करायचं सोडून पंतप्रधानांनी असं वक्तव्य करणं म्हणजे कोणत्या थराचे राजकारण केलं जाऊ शकतं याचं हे उदाहरण आहे अशी टीका त्यांनी केली.