1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 21 सप्टेंबर 2022 (08:13 IST)

नाशकातील उच्चभ्रू वस्तीत वन्यप्राण्यांचे अवयव विक्रीचे रॅकेट उघडकीस; कॉलेजचे ३ विद्यार्थी ताब्यात

arrest
नाशिक शहरातील अत्यंत उच्चभ्रू वस्ती असलेल्या कॉलेजरोड परिसरात वन्यप्राण्यांचे अवयव विक्री करणारे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाने सापळा रचला. त्यात अखेर हे रॅकेट उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, वनविभागाने ताब्यात घेतलेले तिन्ही कॉलेजचे विद्यार्थी आहेत.
 
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, कॉलेजरोड परिसरातील कृषी नगर जॉगिंग ट्रॅक लगत असलेल्या सायकल सर्कल परिसरात हे रॅकेट उघडकीस आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे रॅकेट कॉलेजचे विद्यार्थीच चालवित असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले आहे. याप्रकरणी कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून बिबट्याची कातडी, चिंकाराची दोन शिंगे, निलगायीची दोन शिंगे, तसेच, चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कारवाई केली आहे.

या विद्यार्थ्यांच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी उजेडात येण्याचा विश्वास वनविभागाने व्यक्त केला आहे. हे विद्यार्थी या व्यवसायाकडे कसे आकृष्ट झाले, त्यांना कुणी बळजबरी केली का, कोण हा गोरखधंदा करीत आहे, या व्यवसायात कोण कोण सहभागी आहे, कुठून हा व्यवसाय चालतो, कसा चालतो यासह अनेक बाबींची उत्तरे नजिकच्या काळात उघडकीस येण्याची चिन्हे आहेत.