सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 5 फेब्रुवारी 2023 (10:10 IST)

सत्यजित तांबेंच्या आरोपांमुळे नाना पटोले अडचणीत येणार का?

Nana Patole
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे यांचा विजय झाला आहे. या निवडणुकीत उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्याचं दिसून आलं. सत्यजित तांबे यांनी ही निवडणूक अपक्ष लढवत जिंकली आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत.
 
"या निवडणुकी दरम्यान बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी आणि आमच्या कुटुंबाला काँग्रेस बाहेर ढकलण्यासाठी षडयंत्र रचण्यात आलं," असा आरोप सत्यजित तांबेंनी केला आहे.
 
यावेळी त्यांच्या बोलण्याचा रोख थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे होता. त्यामुळे सत्यजित तांबेंच्या आरोपांमुळे नाना पटोले अडचणीत येणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
 
या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी हे नेमकं प्रकरण काय आहे ते पाहूया.
 
सत्यजित तांबेंचे आरोप आणि नाना पटोलेंचं उत्तर
तांबे-थोरात कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत निवडणुकीत झाला आणि आमच्या कुटुंबाची प्रतिमा मलीन करण्याचं षड्यंत्र रचण्यात आलं, असा आरोप तांबे यांनी केला आहे.
 
"मला मुद्दामहून चुकीचा एबी फॉर्म देण्यात आला आणि मी बंडखोरी केली असा बनाव करण्यात आला. चुकीचा एबी फॉर्म देण्यासाठी प्रदेश काँग्रेस कार्यालय जबाबदार आहे, त्यावर भारतीय काँग्रेस काही कारवाई करेल का हे पाहावे लागेल," असंही सत्यजीत तांबे म्हणाले.
 
तांबेंच्या आरोपांनंतर नाना पटोले यांनीही त्यांना प्रत्युतर दिलं आहे.
पटोले म्हणाले, "मी आधीच सांगितलं आहे की हे जास्त पक्षाच्या अंगावर आणू नका. हा परिवारातला वाद आहे. जास्तच अंगावर आणला तर माझ्याजवळ खूप मसाला आहे. जे लोक इकडे तिकडे दोन नावेवर चालतात, त्या लोकांचा आमच्याकडे सगळा मसाला आहे."
 
"जे काही प्रश्न त्यांनी (सत्यजित तांबे) उपस्थित केले, त्यावर जी काही कागदपत्रं असतील ती मीडियाला दाखवा, असं आम्ही पक्षाच्या प्रवक्त्यांना सांगितलं आहे. यातून लोकांना वस्तुस्थिती कळेल. नाशिकमधील हायव्होल्टेज ड्रामा आता समोर येत आहे. आज त्यांनी जे काही आरोप केलेत त्यावर आमचे प्रवक्ते पुराव्यानिशी सगळी माहिती देतील," असंही पटोले म्हणाले आहेत.
 
सत्यजित तांबेंना वेळेवर आणि योग्य असाच AB फॉर्म पाठवला, असं स्पष्टीकरण काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिलं आहे.
 
ते म्हणाले, "नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराला काँग्रेस पक्षाने कोरे AB फॉर्म पाठवले होते व पाठवलेले कोरे एबी फॉर्म योग्य तेच होते. हे एबी फॉर्म मिळाल्याचा 'ओके' असा मेसेजही विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांचे ओएसडी सचिन गुंजाळ यांनी मोबाईलवरून पाठवला होता, त्यामुळे सत्यजित तांबे यांनी काँग्रेस पक्ष व एबी फॉर्म संदर्भात जे आरोप केले आहेत ते संपूर्णपणे चुकीचे आहेत."
 
नाना पटोले अडचणीत येणार?
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्या मते, "सत्यजित यांच्या आरोपांनंतर नाना पटोले निश्चितच अडचणीत आले आहेत. कारण सत्यजित यांनी पुराव्यानिशी आरोप केले आहेत. पटोलेंनी आधी म्हटलं होतं की मी 2 ब्लँक फॉर्म दिले होते. तर आता सत्यजित यांनी सांगितलं की, मला चुकीचे एबी फॉर्म देण्यात आले. एक फॉर्म औरंगाबादचा होता, तर दुसरा नागपूर पदवीधरचा होता. नाना पटोले खोटं बोललेत असा याचा अर्थ होतो. त्यामुळे आता त्यांना यासंबंधी खुलासा करावा लागेल."
ज्येष्ठ पत्रकार गजानन जानभोर सांगतात की, "सत्यजित तांबेंच्या आरोपांनंतर नाना पटोले यांच्या अडचणीत नक्कीच वाढ होणार आहे. कारण तांबेंनी केलेले आरोप हे त्यांचे स्वत:चे थोडेच आहेत? त्यांचे मामा बाळासाहेब थोरात यांनी त्यांना फीडबॅक दिला असेलच. या निवडणुकीत थोरात यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना मतदान करा, या आशयाचं साधं ट्विटदेखील केलं नाही. बाळासाहेब थोरात हे तांबेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून नाना पटोलेंवर प्रहार करत आहेत."
 
पटोले विरुद्ध थोरात संघर्ष
सत्यजित त्यांच्या पत्रकार परिषदेत असंही म्हणाले की, "हा आमच्या कुटुंबाला बदनाम करण्याचा कट आहे. माझ्याच वडिलांची उमेदवारी दिल्लीतून का जाहीर केली गेली? अमरावती आणि नागपूरचे उमेदवार दिल्लीतून जाहीर का गेले नाहीत? ही सगळी स्क्रिप्ट केवळ बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी, सत्यजित तांबेंना बदनाम करण्यासाठी आहे."
 
या सगळ्या गोंधळाची जबाबदारी प्रदेश काँग्रेस घेणार का?, असा थेट सवाल करून सत्यजित यांनी नाना पटोले यांच्यावर तोफ डागली आहे. कारण नाना पटोले हे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.
 
सत्यजित तांबेंच्या या आरोपांनंतर नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील संघर्षही समोर आल्याचं हेमंत देसाई सांगतात.
त्यांच्या मते, "एबी फॉर्मधील गोंधळ हा आमच्या कुटुंबाला बदनाम करण्यासाठी रचल्याचं तांबे यांनी म्हटलं आहे. बाळासाहेब थोरात हे सत्यजित तांबेंच्या तोंडातून बोलत असल्याचं दिसत आहे. काँग्रेसच्या दोन एकनिष्ठ नेत्यांमध्ये यामुळे संघर्ष लागल्याचं दिसून येत आहे. पण, असं झालं तर काँग्रेस पक्षासाठी ते चांगलं ठरणार नाही."
 
या सगळ्या प्रकरणात बाळासाहेब थोरात यांनी मात्र मौन बाळगलं आहे.
 
ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र तनपुरे यांच्या मते, "बाळासाहेब थोरात मौन आहेत कारण ते सावध भूमिका घेताना दिसत आहेत. ही परिस्थिती त्यांच्यासाठी अडचणीची आहे हे स्पष्ट आहे. त्यामुळे ते लगेच यावर भाष्य करतील असं वाटत नाही. यापूर्वीही थोरांतांचे भाचे राजीव राजळे यांनी अशाप्रकारे काँग्रेसमध्ये बंड केलं होतं. त्यावेळीही थोरातांची अडचण झाली होती."
 
असं असलं तरी मुलगी मुलगी जयश्री थोरात यांना राजकारणात पुढे आणण्यासाठी बाळासाहेब थोरात यांनीच सत्यजित तांबे यांना उमेदवारी मिळू दिली नाही, अशीही चर्चा अहमदनगरमध्ये सुरू आहे. या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे, ते बाळासाहेब थोरात बोलल्यानंतरच स्पष्ट होईल.
 
काँग्रेसअंतर्गत धुसफूस आणि नाराजी
नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी हातात घेतल्यानंतर संघटनेच्या पातळीवर अनेक बदल केले.
 
काँग्रेसचे तत्कालीन प्रवक्ते सचिन सावंत यांना दूर करण्यात आलं आणि त्यांच्या जागी अतुल लोंढे यांना स्थान दिलं.
 
राज्य काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदी अतुल लोंढे यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे सावंत यांनी राजीनामा दिल्याची त्यावेळी चर्चा होती.
 
याशिवाय, आमच्याविषयीच्या वावड्या कोण उठवतं, असं विदर्भातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी एकदा म्हटलं होतं. त्यावेळी त्यांचा रोख नाना पटोले यांच्याकडे असल्याचं राजकीय विश्लेषकांनी म्हटलं होतं.
सत्यजित तांबेंची राजकीय घौडदोड पाहता, त्यांना उमेदवारी न देऊन त्यांचं वजन कमी करण्यात आल्याचं राजकीय पत्रकारांच्या बोलण्यातून समोर येत आहे.
 
सत्यजित तांबेंच्या आरोपांवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, "सत्यजित तांबे यांचा विषय अतिशय गंभीर आहे. त्याची दखल घ्यावीच लागणार आहे."
 
नाना पटोले यांच्या कारकिर्दीविषयी बोलताना गजानन जानभोर सांगतात, "नाना पटोले यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर ज्या पद्धतीनं पक्षाला संघटित करायला हवं होतं, त्यापद्धतीनं ते करू शकले नाहीत. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवर त्यांच्यावर नाराज असल्याचं दिसून येतं."

Published By- Priya Dixit