शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023 (22:37 IST)

सत्यजित तांबेंना बाळासाहेब थोरातांचा पाठिंबा की भाच्यामुळे मामा अडचणीत?

facebook
नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसने सुधीर तांबे यांना एबी फाॅर्म दिला तरीही ऐनवेळी त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचं ठरवलं. यामुळे काँग्रेसने त्यांचं निलंबन केलं. आता नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा दणदणीत विजय झाला. परंतु त्यांचे मामा बाळासाहेब थोरात यांची भूमिका मात्र अद्याप उघड झालेली नाही.
 
"बाळासाहेब थोरात यांच्याशी आमचं बोलणं झालेलं नाही. त्यांच्याशी कुठलीही चर्चा झालेली नाही. तांबे प्रकरणात त्यांचा रोल होता की नाही हे हाय कमांडला जो रिपोर्ट देऊ त्यात स्पष्ट होईल." अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
 
तर या संपूर्ण घटनाक्रमात बाळासाहेब थोरात यांनी आतापर्यंत मौन बाळगलं आहे.
आता बाळासाहेब थोरातांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात थोरातांच्या पाठिंब्याशिवाय तांबे यांचा विजय झाला की भाच्यामुळे मामा अडचणीत आलेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
 
बाळासाहेब थोरात यांचा छुपा पाठिंबा?
बाळासाहेब थोरात यांचा सत्यजित तांबे यांना छुपा पाठिंबा आहे का? हा प्रश्न वारंवार उपस्थित होण्याचं कारण म्हणजे सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आणि तांबेंवर पक्षाने कारवाई केल्यानंतरही बाळासाहेब थोरात यांनी अद्याप आपली बाजू स्पष्ट केलेली नाही.
 
हिवाळी अधिवेशनादरम्यान त्यांच्या पायाला दुखापत झाल्यामुळे ते काही काळ रुग्णालयात उपचार घेत होते एवढीच माहिती काँग्रेस पक्षाकडून दिली जाते.
 
सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना उमेदवारी दिली. परंतु शु़भांगी पाटील यांच्या प्रचारासाठी किंवा त्यांच्या मदतीसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपलब्ध होते का हाही प्रश्न अनुत्तरित राहतो.
 
काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांनाच मदत केल्याचं दिसून आलं. बाळासाहेब थोरात यांच्या बालेकिल्ल्यात त्यांच्या सहमतीशिवाय हे शक्य नाही असंही जाणकारांचं म्हणणं आहे.
 
काही राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे की थोरात-तांबे यांची ही राजकीय खेळी आहे.
 
दुस-या बाजूला या चर्चेला अधिक बळ मिळालं ते बॅनर्समुळे. नाशिक महामार्गावर थोरात साखर कारखान्याबाहेर सत्यजित तांबे यांच्या बॅनर्सवर बाळासाहेब थोरात यांचे फोटो झळकले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच हे बॅनर्स लावल्याने याची अधिक चर्चा झाली.
सत्यजित तांबे यांचं पक्षातून निलंबन केल्यानंतरही अहमदनगरमध्ये आणि उत्तर महाराष्ट्रात सत्यजीत तांबे यांच्याविरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते काम करताना दिसून आले नाहीत. तसंच महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनीही पुरेसं समर्थन मिळालं नसल्याचं वक्तव्य केलं आहे.
 
तसंच बाळासाहेब थोरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी गेले परंतु शुभांगी पाटील यांच्या प्रचारासाठी गेले नाहीत असाही मुद्दा उपस्थित केला गेला.
 
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "आम्हाला असं वाटतं की थोरात यांचा रोल यात नसावा परंतु आमचा त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. 9 फेब्रुवारीला आमच्या पक्षाची कार्यकारिणीची बैठक आहे. त्यासाठी आम्ही त्यांना बोलवू, ते आले तर आम्ही चर्चा करू."
 
2 फेब्रुवारीला फार पडलेल्या काँग्रेसच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीलाही बाळासाहेब थोरात गैरहजर होते. ते या संसदीय बोर्डाचे सदस्य आहेत. आता 9 तारखेच्या कार्यकारिणीच्या बैठकीला थोरात उपस्थित राहतात का ते पहावं लागेल.
 
ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र तनपुरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "बाळासाहेब थोरात मौन आहेत कारण ते सावध भूमिका घेताना दिसत आहेत. ही परिस्थिती त्यांच्यासाठी अडचणीची आहे हे स्पष्ट आहे. त्यामुळे ते लगेच यावर भाष्य करतील असं वाटत नाही. यापूर्वीही थोरांतांचे भाचे राजीव राजळे यांनी अशाप्रकारे काँग्रेसमध्ये बंड केलं होतं. त्यावेळीही थोरातांची अडचण झाली होती."
 
मुलीसाठी उमेदवारी नाकारली?
बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात यांना राजकारणात पुढे आणण्यासाठी सत्यजित तांबे यांना उमेदवारी नाकारली का? अशी चर्चा अहमदनगरमध्ये सुरू झाली आहे.
 
तसंच याला काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो' यात्रा निमित्त ठरली. या यात्रेवेळी गटबाजी दिसून आल्याचं जाणकार सांगतात. यावेळी सत्यजित तांबे आणि बाळासाहेब थोरात यांच्याकडून यात्रेचं नियोजन करण्यात आलं आणि त्याचं कौतुकही झालं. यावेळी थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांनीही राहुल गांधी यांची भेट घेतली.
 
शैलेंद्र तनपुरे सांगतात, "बाळासाहेब थोरात यांना आपल्या कन्येला संगमनेर येथून राजकारणात आणायचं आहे आणि त्यामुळे सत्यजीत तांबे यांना उमेदवारी त्यांनीच मिळू दिली नाही अशीही एक शक्यता इथे वर्तवली जात आहे. पण जोपर्यंत बाळासाहेब थोरात बोलत नाहीत तोपर्यंत यावर ठामपणे असं काही सांगता येणार नाही."
ज्येष्ठ पत्रकार गोपाळ जोशी यांनीही असंच मत व्यक्त केलं आहे. बीबीसी मराठीसाठी लिहिलेल्या लेखात ते म्हणतात, "सत्यजित तांबे यांच्या या बंडखोरीची दुसरी एक किनार आहे. बाळासाहेब थोरातांची कन्या जयश्री राजकारणात सक्रीय झाली आहे. थोरातांचे चिंरजीव सध्या विशीत आहेत. त्यामुळे पुढच्या पाच सात वर्षांत तेही राजकारणात उतरणारच आहेत. त्यावेळी बाळासाहेबांच्या जागी तेच येणार."
 
" घराणेशाही अशी चालूच राहणार आहे. त्यामुळे राजकारणात टिकून राहण्यासाठी सत्यजित तांबे यांना आतापासूनच हातपाय हलवणे आवश्यक होते. तेच ते करत आहेत,"
 
" परंतु बाळासाहेब थोरात यांना असं करायचं असतं तर नगर जिल्ह्यातून त्यांनी सत्यजीत तांबे यांनी मदत केली नसती. त्यांच्या मदतीशिवाय या भागातून ताबेंना एवढं मतदान झालं नसतं," असं मत शैलेंद्र तनपुरे व्यक्त करतात.
 
" सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबे काँग्रेसचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले त्यावेळी बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात सोबत होती. तांबे पिता-पुत्रांनी जयश्री थोरात यांना कळू न देता परस्पर हे बंड केलं,"असं ज्येष्ठ पत्रकार दीपक भातुसे सांगतात.
 
ते म्हणाले,"बाळासाहेब थोरात यांना याची कल्पना नव्हती. उलट त्यांना अंधारात ठेऊन सत्यजित तांबेंनी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. पण हे घरातलं प्रकरण असल्याने थोरातांची अडचण झाली हे खरं आहे. त्यामुळे कदाचित ते मौन असावेत."
 
शुभांगी पाटील यांना ऐनवेळी महाविकास आघाडीने उमेदवारी दिली. त्यांच्या प्रचाराला बाळासाहेब थोरात गेले नसले तरी त्यांना 40 हजारहून अधिक मतं आहेत. त्यामुळे थोरातांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी काम केलं नाही असं म्हणता येणार नाही, असंही भातुसे सांगतात.
 
सत्यजित तांबे भाजपमध्ये जातील की काँग्रेसमध्ये परतणार?
सत्यजित तांबे यांच्या एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजीत तांबे यांचं कौतुक केलं होतं.
 
सत्यजित तांबे यांच्यात क्षमता असून त्यांना जास्त वेळ दूर ठेऊ नका, अशा लोकांवर आमची नजर असते असं बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस नेत्यांना उद्देशून फडणवीस म्हणाले होते.
 
तर नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी सत्यजीत तांबे यांना मदत केल्याचं वृत्त समोर आलं होतं.
 
सत्यजित तांबे यांच्यासाठी भाजपने शुभांगी पाटील यांना उमेदवारी दिली नाही हे सुद्धा स्पष्ट आहे.
तर सत्यजित तांबे यांच्या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्यजित तांबे यांच्या विजयात राष्ट्रवादी काँग्रेसचंही योगदान असल्याचं म्हटलं आहे.
 
काँग्रेसने सत्यजित यांना उमेदवारी दिली असती तर असं काही घडलंच नसतं. आता निवडून आल्यावर योग्य तोच निर्णय ते घेतील, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.
 
सत्यजित तांबे यांनी 4 फेब्रुवारीला आपण भूमिका स्पष्ट करणार असल्याचं म्हटलं आहे.
 
सत्यजित तांबे आता विधानपरिषदेचे अपक्ष आमदार आहेत. पुढचा पाच वर्षांचा कार्यकाळ त्यांच्याकडे मतदारसंघात जम बसवण्यासाठी आहे. त्यामुळे सत्यजित तांबे घाईघाईत हा निर्णय घेणार नाहीत असंही राजकीय विश्लेषक सांगतात.
 
शैलेंद्र तनपुरे म्हणाले, "मला वाटत नाही ते भाजपमध्ये जातील. कारण त्यांचा मतदार हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे. ते आता अपेक्ष आमदार आहेत. निर्णय घेण्यासाठी ते स्वतंत्र आहेत."
ज्येष्ठ पत्रकार गोपाळ जोशी यांना वाटतं, "सत्यजित तांबे लगेचच भाजपकडे जातीस असं सांगणं कठीण आहे. पण सध्या ते कुंपणावर बसून निरीक्षण करतील. पुढच्या विधानसभा निवडणुकांपर्यंत आता त्यांच्याकडे वेळ आहे. त्यांच्याकडे हक्काचा मतदारसंघ नाही. त्यामुळे आता येत्या 6 वर्षांते ते एखादा मतदारसंघ बांधण्याचा प्रयत्न करतील. लोकांचा प्रतिसिद आणि अपेक्षा काय आहे हे पाहून ते त्यांचं राजकारण आखतील असं सध्या तरी दिसतंय," असं गोपाळ जोशी सांगतात.
 
सत्यजित यांचं हे बंड भाजपमध्ये जाण्यासाठी नसून ते स्वतःला राजकीयदृष्ट्या स्थापित करण्यासाठीची हालचाल म्हणून पाहावं लागेल, असं जोशी यांना वाटतं.
 
सत्यजित तांबे यांची पक्षाकडून समजूत काढली जाऊ शकते असंही काहींना वाटतं. काँग्रेसने सत्यजीत तांबे सारखा युवा नेता गमवू नये असंही मत अनेक ज्येष्ठ पत्रकार व्यक्त करतात. त्यामुळे काँग्रेस पुढे काय करणार? हाही प्रश्न आहे.
 
यासंदर्भात बोलतीना नाना पटोले म्हणाले, "याबाबतचा निर्णय हायकमांड घेईल. कारवाई हायकमांडने केली आहे. यापुढेही निर्णय तेच घेतील."
Published By- Priya Dixit