बुधवार, 30 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified सोमवार, 15 मार्च 2021 (20:22 IST)

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या लेखी परीक्षा १९ एप्रिलपासून

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखांच्या प्रथम, व्दितीय व तृतीय वर्ष अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा दि. १९ एप्रिल २०२१ पासून घेण्यात येणार आहे. याबाबत सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
 
याबाबत माहिती देतांना विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले की, विविध जिल्हयांमध्ये कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोविड-19 रोगाचा संसर्ग पसरु नये तसेच अनेक ठिकाणी जाहिर करण्यात आलेली टाळेबंदी व निर्बंधामुळे विद्यापीठाच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत. विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांमधील परीक्षार्थींचे आरोग्य सुरक्षित रहावे यासाठी विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे.
 
तसेच, सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा संदर्भात कोणत्याही अफवांवर, सामाजिक माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या खोटया बातम्यांवर विश्वास ठेवू नये. परीक्षा संदर्भातील अद्ययावत माहितीसाठी आरोग्य विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in भेट द्यावी, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, प्रथम व द्वितीय वर्ष परीक्षांचे उन्हाळी – 2020 परीक्षांचे समचिकित्सा, आयुर्वेद, भौतिकोपचार विद्याशाखांचे निकाल प्रक्रियेचे कामकाज सुरु आहे. ८ मार्च २०२१ पासून सुरु करण्यात आलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षेस विद्यार्थ्यांची मोठया प्रमाणात उपस्थिती आहे. सदर परीक्षा नियमित वेळापत्रकाप्रमाणेच घेण्यात येत आहेत. तसेच लेखी परीक्षेनंतर लगेचच विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही. सदर परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी आंतरवासियता कार्यक्रम करावा लागणार आहे.
 
सदर कालावधीत हे विद्यार्थ्यी कोविड-19 रुग्ण सेवेकरीता उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोविड-19 आजाराच्या प्रादुर्भावामुळे तसेच राज्य शासनाच्या वेळोवेळी प्राप्त झाालेल्या निर्देशान्वये व शासनाच्या वेळोवेळी कोविड-19 परिस्थितीनुरुप धोरणान्वये परीक्षा संचलन करण्यात येईल. यासाठी विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळावरील माहिती पहावी. सदर परीक्षांबाबत विद्यापीठाचे कुलगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, उपकुलसचिव महेंद्र कोठावदे आदीं परीक्षा यशस्वी करण्यासाठी कामकाज करीत आहेत.