शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , गुरूवार, 9 मार्च 2017 (10:07 IST)

प्रा. डॉ. ई वायुनंदन यांनी कुलगुरुपदाचा पदभार स्वीकारला

सर्वांना बरोबर घेऊन प्रगती साधणार
 
 मुक्त शिक्षण हे एक सांघिक काम आहे. ही जबाबदारी पार पाडताना सर्वांना बरोबर घेवून काम करण्यावर भर दिला जाईल. सध्या दूर शिक्षणापुढे अनेक मोठी आव्हाने आहेत. या आव्हानांना तोंड देण्यासाठी हे विद्यापीठ कटीबद्ध राहील, यादृष्टीने काम करण्यावर भर दिला जाईल असा विश्वास यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे नवनिर्वाचित कुलगुरू प्रा. डॉ. ई वायुनंदन यांनी केले.
 
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याकडून बुधवारी प्रा. डॉ. ई वायुनंदन यांनी कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारली.  कुलगुरुपदाची जबाबदारी स्वीकारणारे ते १६ वे कुलगुरू आहेत. प्रा. डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी सही करून विद्यापीठाची सूत्रे डॉ. वायुनंदन यांच्याकडे बहाल केली. त्यानंतर ते बोलत होते. तत्पूर्वी त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 
 
प्रा. डॉ. ई वायुनंदन म्हणाले की, शैक्षणिक क्षेत्रात भरारी घेण्यासाठी अमुलाग्र बदल घडविण्यावर पुढील काळात काम करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता असेल व ती कटाक्षाने पाळली जाईल. तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानाची गंगा पोहोचविण्यावर आपण अधिक भर देणार असल्याचे ते म्हणाले. या विद्यापीठाचा नावलौकिक ऐकून होतो. आता यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने स्थापन झालेल्या विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याने आपल्याला आनंद झाला असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठ कामकाजात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विभागीय केंद्रे अधिक गतिमान आणि कार्यक्षम करू असा विश्वासही डॉ. वायुनंदन यांनी आज कर्मचाऱ्यांसमवेत संवाद साधताना व्यक्त केला.
 
गेल्या सात महिन्यांचा प्रभारी कुलगुरू पदाचा कार्यभार सांभाळून नवीन कुलगुरूंकडे तो सोपविताना आपल्याला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्याचे सांगून डॉ. वायुनंदन यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. वायुनंदन यांनी या वेळी डॉ. म्हैसेकर यांचे आभार मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी संघटनेच्या वतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला. कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास विद्यापीठातील सर्व विद्याशाखांचे संचालक, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.
 
छायाचित्र ओळ : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे १५ वे कुलगुरू म्हणून प्रभारी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याकडून विद्यापीठाचा कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारताना नवनिर्वाचित कुलगुरू प्रा. डॉ. ई वायुनंदन. समवेत कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे