रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 15 एप्रिल 2022 (08:17 IST)

सन २०२१-२२ यावर्षी सतरा हजार कोटींचा महसूल जमा – राज्य उत्पादन शुल्क विभागाची माहिती

money
राज्य उत्पादन शुल्क विभागाने सन 2021-22 या आर्थिक वर्षात 17177.19 कोटी रूपयांचा महसूल जमा केला आहे. विभागाने  सन 2020-21 यावर्षी 15078.25 कोटी रूपयांचा महसूल जमा केला होता. सन 2020-21 यावर्षीच्या तुलनेत यावर्षी महसूलात 13.92 टक्के वाढ झाल्याची माहिती विभागामार्फत देण्यात आली.
 
राज्य उत्पादन शुल्क विभाग राज्यात मद्य निर्मिती, घाऊक विक्री, किरकोळ विक्री इ. अनुज्ञप्त्या देणे व त्यांची तपासणी करुन नियमन करणे, मद्यावरील कर गोळा करणे इ. कार्य प्रामुख्याने करीत असतो. तसेच राज्यातील अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक, बनावट मद्य, परराज्यातून होणारी अवैध मद्याची तस्करी इ. विरुध्द सज्ज राहून महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 अन्वये फौजदारी गुन्हे दाखल करुन त्याचे उच्चाटन व नियंत्रणाचे कामकाज करीत असतो.
 
अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष २४x७ कार्यरत आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. तक्रार नोंदविण्यासाठी ०२२-२२६६०१५२ या दूरध्वनी क्रमांकावर अथवा ८४२२००११३३ या व्हॉट्स अॅप क्रमांकावर संपर्क साधावा, त्याचप्रमाणे [email protected] या ईमेल आयडीवर संपर्क करता येईल, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.