बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 मार्च 2021 (08:03 IST)

‘तुझा कार्यक्रम करेन’ अशी धमकी दिल्याचा आरोप, योगेश बहल अडचणीत

पिंपरी-चिंचवड शहराचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश बहल व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपमुळे अडचणीत सापडले आहेत. सोशल मीडियावरुन टीका करणाऱ्या एका तरुणाला ‘तुझा कार्यक्रम करेन’ अशी धमकी दिल्याचा आरोप योगेश बहल यांच्यावर करण्यात आला आहे. तशी ऑडिओ क्लिपलही सध्या व्हायरल होत आहे. 
 
योगेश बहल यांनी धमकी दिल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर दोन-तीन दिवसांतच या तरुणाच्या बाईकचा अपघात झाला. तो बहल यांनीच घडवून आणल्याचा आरोप श्याम घोडके या तरुणानं केला आहे. श्याम घोडके या तरुणाचा एक टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. घोडके याच्या आरोपानुसार योगेश बहल यांनी त्याला फोनवरुन धमकी दिली. त्यात ‘मर्यादेत राहिला तर बरं होईल, नाहीतर बायांच्या नादाला लागून तुझा कार्यक्रम होईल, मीच तो करेन’, असं बहल यांनी म्हटल्याचा आरोप करण्यात आला आहे.
 
घोडके यांनी या प्रकरणाची तक्रार थेट पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे केली आहे. तसंच यावर तातडीने कारवाई करण्याची मागणीही करण्यात आलीय. आपल्या जिवाला धोका असून, आपलं काही बरंवाईट झाल्यास त्याला बहल जबाबदार असतील, असंही त्याने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.