रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Modified: सोमवार, 5 डिसेंबर 2022 (12:21 IST)

नवीन सुनेशी कसे वागावे? तिची परीक्षा न घेता तिला आधार द्या

women
लग्न म्हटलं की मुलीसमक्ष अनेक प्रश्न उभे राहतात. नवीन विवाहित जीवनाबाबत तिच्या मनात अनेक आशा आणि शंका निर्माण होत असतात. भारतीय समाजात मुलीला बालपणापासून अनेक वेळा सांगितले जाते की एक दिवस तिचे लग्न होईल आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदलेल. पण सूनही मुलीसारखी असते. नव्या वातावरणात नव्या सुनेच्या संगोपनाची जबाबदारी सासरच्या मंडळींनी चोखपणे पार पाडली तर लवकरच सूनही आपल्या नव्या कुटुंबाला मनापासून स्वीकार करते. नाहीतर ती ज्या पूर्वग्रहांनी सासरच्या घरात पाऊल ठेवते, ते कायमच राहतात. म्हणून सासरच्या मंडळीनी असे वागावे ज्याने नवीन सून सगळ्यांची लाडकी होईल आणि त्यांना स्वीकारेल.
 
अनेक जागी आपण वाचले असेल की सासरी कसे वागावे यावर उपाय सांगण्यात येतात परंतु सासरच्यांनी कसे वागावे यावर का विचार करु नये. म्हणून जाणून घ्या अशा काही गोष्टी च्या सासरच्यांनी देखील लक्षात घेतल्या पाहिजे- 
 
सन्मान द्या
आपल्या सुनेला कुटुंबाचा अविभाज्य सदस्य बनवण्यासाठी आणि तिचे मन जिंकण्यासाठी तिचा आदार करा. तिला आपले बनवण्यासाठी खर्‍या अर्थाने तिला तिच्या मनाप्रमाणे घरात राहण्याचा अधिकार द्या. तिचे छंद पूर्ण करण्यासाठी, तिचे आवडते पदार्थ बनवण्यासाठी तयारी दाखवा. ती अस्वस्थ किंवा थकलेली असेल तर तिला विश्रांती देण्याची संधी द्या. तिच्या आरोग्याबद्दल विचारपूस करा. तिला तुमच्याकडून खरे मातृप्रेम मिळाले तर ती देखील आपल्याशी आदर आणि प्रेमाने वागेल.
 
परीक्षा घेऊ नका
घरातील कामे असोत जसे स्वयंपाक, घर स्वच्छ राखणे, पाहुण्यांचे आगत्य करणे इतर कधीही आपल्या सुनेला अडचणीत आणण्याचा किंवा तिची चेष्टा करण्याचा किंवा तिची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करू नका. असे करत असताना तुम्ही नकळत तिच्यात आणि तुमच्यात एक दूरी निर्माण करत असता. याऐवजी तिला जे जमत नसेल ते करण्यात तिची मदत करा. तिला शिकवा की या घरात कोणते काम कशा प्रकारे केलं जातं.
 
सुनेचं कौतुक करा
प्रशंसा ही कोणत्याही व्यक्तीसाठी सर्वोत्तम भेट आहे. कोणाचेही मन जिंकण्यासाठी खरी प्रशंसा आणि प्रोत्साहन पुरेसे आहे. जर तुम्हाला सून आपलीशी करायची असेल तर तिची स्तुती फक्त तिच्या समोरच नाही तर इतर लोकांसमोरही करा. यामुळे सुनेच्या मनात तुमच्याबद्दल आदर वाढेल. तुम्ही तिच्या च्वाईसची, एखाद्या पदार्थाची किंवा तिच्या मॅनेजमेंटची स्तुती करु शकता.
 
इतर सुनांशी तुलना नको
अनेक घरांमध्ये नवीन सुनेला तिचा कमीपणा दाखवण्यासाठी तिची तुलना वहिनी, नणंद, किंवा इतर सुनांशी केली जाते. इतरांबद्दल खूप कौतुक करुन सुनेला घालून-पाडून बोललं जातं. असे करणे योग्य ठरत नाही. एकदा का सुनेच्या मनातून आदर नाहीसा झाला तर जन्मभर ते मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागू शकतो.
 
जरा अॅडजस्ट करा
केवळ सुनेकडूनच अॅडजस्टमेंटची अपेक्षा करू नका तर तिच्या स्वभावानुसार आणि कामाच्या पद्धतीनुसार तुम्ही स्वतःलाही बदला. तिचे ऑफिस सकाळी लवकर असेल किंवा संध्याकाळी उशिरा राहिले तर त्यानुसार जेवण वगैरे बनवण्याची जबाबदारी घ्या. घरातील बाकीच्यांनीही सुनेच्या सोयीनुसार खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये किंवा वागण्यात काही बदल करायला हवेत. यामुळे घरामध्ये अनावश्यक तणाव पसरणार नाही आणि वातावरण प्रसन्न राहील.
 
घरातील संस्कार आणि पद्धत समजण्यासाठी वेळ द्या
आल्या आल्या सुनेकडून सर्व एका दिवसात शिकण्याची अपेक्षा करु नये. आपल्या घरातील पद्धती, आवडनिवड, संस्कार हे वेळोवेळी तिला प्रत्यक्ष दाखवून शिकवा. एक-दोनदा नाही जमले तरी राग न करता पुन्हा प्रयत्न करण्याची संधी द्या. कठोर व्यवहार असल्यास नाती बिघडू लागतात त्यापेक्षा नवीन सुनेला तुमच्या कुटुंबातील चालीरीती आणि परंपरांबद्दल सांगत रहा परंतु तिच्या नोकरी, आरोग्य आणि सोयीनुसार त्यांचे पालन करायचे की नाही हे तिच्यावर सोडा. यामुळे नात्यात कधीही दुरावा निर्माण होणार नाही.