सोमवार, 26 फेब्रुवारी 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 डिसेंबर 2023 (21:10 IST)

जर तुमचं मूल बोलताना अडखळत असेल, तर पालकांनी 'या' 4 गोष्टी लक्षात ठेवाव्यात

"शाळेत सकाळच्या हजेरीवेळी मला खूप भीती वाटायची. तुम्ही 'प्रेजेंट मॅम' किंवा 'येस मॅम' असं म्हणता. मी नेहमीच 'येस मॅम' असं म्हणायचो. जितकं कमी बोलता येईल तितकं चांगलं असा माझा प्रयत्न असायचा."
 
35 वर्षाचा आदित्य आज व्यवसायाने सॉफ्टवेअर अभियंता आहे. त्याने त्याच्या शाळेतल्या दिवसांची आठवण सांगितली. तो बोलताना अडखळायचा. यावर तो स्पीच थेरेपीची मदत घेत आहे.
 
बीबीसीच्या प्रतिनिधी पायल भुयनशी बोलताना त्याने सांगितलं की, "जर मी अडखळत बोलतो तर त्यात माझा काय दोष? देवाने मला असंच बनवलं आहे. माझ्या लहानपणीही माझी चेष्टा केली जायची आणि कदाचित हे आयुष्यभर चालू राहील."
 
एका संशोधनानुसार, 8 टक्के मुले कधी ना कधी अडखळत बोलतात. परंतु अनेक मुलांमधील ही समस्या कालांतराने बरी होते. अनेकांमध्ये काही फरक दिसून येतो तर काही मुलांमध्ये सुधारणा होत नाही.
 
1) संयमाची अपेक्षा
मूल अडखळत बोलत असेल तर पालकांसाठी हे नक्कीच चिंतेचं कारण आहे. त्यामुळे ते त्यांच्या मुलाला मदत करण्याचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात.
 
बीबीसी साउंड्सच्या वुमेन्स अवर पॉडकास्ट कार्यक्रमात बोलताना, जेरी नावाच्या एका पालकाने सांगितलं की, त्यांचा मुलगा दोन-तीन वर्षांपासून अडखळत बोलतोय.
 
"जेव्हा तो पाच-सहा वर्षांचा झाला, तेव्हा मला समजलं की तो खरोखरच अडखळत बोलतोय. लहान असताना आम्हाला वाटायचं की मुलं असंच बोलतात. त्याला कशी मदत करावी हेच आम्हाला समजत नव्हतं. तो स्वतःहून बरा व्हावा अशी प्रार्थना आम्ही करत होतो."
 
जेरीच्या मुलाच्या समस्या कालांतराने वाढत गेल्या आणि तो पूर्वीपेक्षा जास्त अडखळू लागला. एका एका वाक्यावर त्याला राग यायचा.
त्या सांगतात, "आम्ही आमच्या मुलाला मदत करण्यासाठी त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. जिथे तो अडकायचा त्या शब्दांची त्याला आठवण करून दिली. पण या गोष्टीवर तो निराश व्हायचा. अनेकवेळा तर त्याला रागही यायचा. त्याच्या चेहऱ्यावर असहायतेची भावना दिसायची."
 
दिल्लीला लागून असलेल्या नोएडा येथील रहिवासी आदित्य सांगतो की, अनेक वेळा असं घडतं की लोक अडखळणाऱ्या व्यक्तीचं वाक्य पूर्ण करतात. जे योग्य नाही.
 
तो म्हणतो, "आम्हाला आमचा मुद्दा पूर्ण करण्याची संधी दिली पाहिजे. मला माहीत आहे की तुम्ही आम्हाला चांगल्या मनाने मदत करण्याचा प्रयत्न करत आहात. पण हे आम्हाला कुठेतरी चिडवणारं आहे. आम्ही फक्त तुमच्याकडून आमच्यासाठी थोड्या संयमाची अपेक्षा करतो."
 
2) अडखळण्याची पातळी
बीबीसीच्या प्रतिनिधी पायल भुयन यांनी दिल्लीला लागून असलेल्या नोएडा येथील 'द लर्निंग हब' स्पीच अँड हिअरिंग सेंटरमध्ये स्पीच थेरपिस्ट शिशुपाल यांच्याशी संवाद साधला.
 
ते सांगतात की, पूर्वीच्या तुलनेत आता बरेच लोक अडखळत बोलण्याची समस्या कमी करण्यासाठी स्पीच थेरपीची मदत घेत आहेत.
 
शिशुपाल सांगतात की, ही समस्या तीन टप्प्यात विभागली जाऊ शकते :
 
सौम्य म्हणजे खूप कमी अडखळत बोलणं
मध्यम म्हणजे नेहमीपेक्षा जास्त अडखळत बोलणं
तीव्र म्हणजे खूप जास्त अडखळत बोलणं
ते म्हणतात "ज्या मुलांमध्ये सौम्य अडखळत बोलण्याची समस्या आहे ते लवकर बरे होऊ शकतात. मध्यम अडखळत बोलण्याची समस्या असलेल्या मुलांना 4-5 महिने थेरपी घ्यावी लागते, त्यानंतर चांगली सुधारणा दिसून येते."
 
गंभीर प्रकरणे थोडी आव्हानात्मक असतात आणि त्यात 30 ते 40 टक्के सुधारणा होण्यास वाव असतो. पण थेरपीबरोबरच मुलांचे प्रयत्न आणि खर्चही महत्त्वाचा असतो.
 
3) थेरपीसोबत समुपदेशनाची गरज
आदित्य सांगतो, "माझ्या लहानपणी मी कधीच विचार केला नव्हता की बरा होऊ शकेन आणि या थेरपी खूप महाग आहेत. त्यावेळी आमच्याकडे थेरपी घेण्यासाठी पुरेसे पैसेही नव्हते."
 
बीबीसी साउंड्स पॉडकास्ट कार्यक्रमात बोलताना जेरी म्हणतात, "माझा मुलगा शाळेत धडा वाचत असताना खूप अडखळायचा. माझं मूल मंद आहे, असं शिक्षक मला सांगायचे. त्याच्यात आत्मविश्वासाचा अभाव होता. साहित्य शिकवत असाल तर अनेक वेळा अनेक मुलं अडकतात. माझ्या मुलासारख्या विद्यार्थ्यांना आणखी थोडा वेळ द्यायचा आहे, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. फक्त तो मंद आहे असं म्हणणं योग्य नाही."
 
स्पीच थेरपिस्ट शिशुपाल यावर भर देतात की कधीकधी या मुलांना थेरपीसोबत समुपदेशनाची गरज असते.
 
"अनेकदा असं दिसून आलंय की जे लोक अडखळत बोलत असतात त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. मी काही चुकीचं बोललो तर लोक माझ्यावर हसतील, हे त्यांच्या मनात कुठेतरी राहतं."
 
शिशुपाल सांगतात की, असं अनेकवेळा घडतं, त्यामुळे हे लोक अनेक ग्रुपमध्ये बसत नाहीत. त्यांना वाटतं की कोणी काही विचारलं तर आपण काय बोलणार? त्यामुळे अनेकवेळा कार्यालयात अडचणी निर्माण होतात.
 
आपल्या नोकरीच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देताना आदित्य सांगतो, "मी सर्व तांत्रिक चाचण्या पास करायचो पण प्रत्येक वेळी शेवटच्या फेरीत मी बाद व्हायचो. हळुहळू मला समजू लागलं की माझं अडखळत बोलणं हेच मला नोकरी न मिळण्याचं कारण आहे."
 
"मग जिथे मला मला पहिली नोकरी मिळाली तिथे मी आधीच सांगितलं होतं की मला अडखळत बोलण्याची समस्या आहे. त्यांनी माझ्या थेरपीबद्दल विचारलं आणि मला नोकरी मिळाली."
 
"पण तरीही बरेचदा आपल्या मनात काय आहे हे सांगायचं मी टाळतो, कारण जास्त बोलावं लागेल."
 
आदित्यने थेरपीची अनेक सेशन घेतले आणि स्वतःवर काम केलं आणि त्याची अडखळत बोलण्याची समस्या बर्‍याच अंशी कमी झाली.
 
4) कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल
ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या म्हणण्यानुसार , जेव्हाही तुम्ही अडखळत बोलणाऱ्या व्यक्तीला भेटता तेव्हा खालील गोष्टी लक्षात ठेवा.
 
त्यांची वाक्य लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नका.
धीर धरा, त्यांच्या बोलण्यात व्यत्यय आणू नका.
त्यांना लवकर किंवा हळू बोलण्यास सांगू नका.
ते काय बोलतात याकडे लक्ष द्या, ते कसे बोलतात याकडे लक्ष द्या. त्यांच्याशी डोळ्यांद्वारे संपर्क करा.
लहान मुलांशी बोलताना हळू हळू बोला. लहान वाक्य वापरा. सोप्या भाषेत बोला.
तुमचे म्हणणं समजून घेण्यासाठी त्यांना पूर्ण वेळ द्या.
ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या मते अडखळत बोलण्याची अनेक कारणं आहेत. बऱ्याचदा भीती हे देखील एक कारण असतं. आपल्या बोलण्यात सुधारणा करता येऊ शकते.
 
लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण थेरेपी घेऊ शकतात. तुम्ही जितक्या लवकर सुरुवात कराल तितकं चांगलं ठरेल. तुम्ही कोणत्याही वयात थेरपी घेऊ शकता.
 
बीबीसीशी बोलताना जेरी म्हणतात, "माझे मूल अडखळते आणि भविष्यातही ते अडखळण्याची शक्यता आहे. माझ्या मुलासाठी जग थोडं सोपं व्हावं अशी माझी इच्छा आहे. तो आपल्यासारखाच आहे, लोकांना वाटतो तितका वेगळा नाही."
 
आदित्य शेवटी म्हणतो, "आमच्यात काही कमतरता आहे असं समजू नका. मला वाटतं लोकांनी आमची चेष्टा केली नाही तर कदाचित आमचा आत्मविश्वास वाढेल."
 
Published By- Priya Dixit