बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. साईबाबा
Written By
Last Updated : मंगळवार, 26 एप्रिल 2022 (14:52 IST)

साईसच्चरित - अध्याय २९

sai satcharitra chapter 29
॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
गताध्यायीं जाहलें कथन । त्याहूनि या अध्यायीं श्रवण । करवितों श्रीचें अतर्क्य विंदान । कथानुसंधान एकचि ॥१॥
ऐकून बाबांची अगाध लीला । इसवी सन एकूणीसशें सोळा । ते वर्षीं एक भजनी मेळा । शिरडीस आला दर्शनार्थ ॥२॥
मंडळी ही सर्व प्रवासी । कीर्ति परिसिली मद्रदेशीं । जात असतां काशीयात्रेसी । वाटेंत शिरडीसी उतरली ॥३॥
साईबाबा महासंत । धीर उदार आणि दान्त । यात्रेकरूंसी कृपावंत । पैसे अत्यंत वांटिती ॥४॥
दिडक्या चवल्या हाताचा कीस । अधेल्या - पावल्यांचा पाऊस । रुपये दहा कोणास वीस । कोणास पन्नास ते देत ॥५॥
हें काय सणासुदा दिसीं । कार्यविशेषीं कां पर्वकाळासी । प्रतिदिवशीं उक्त प्रमाणेंसीं । संतोषेंसीं अर्पीत ॥६॥
पहूड येती भवय्ये नाचती । गवय्ये गाती भाट वानिती । तमासगीर मुजरे देती । भजनीं रंगती हरिभक्त ॥७॥
ऐसे महाराज उदारवृत्ति । दानधर्मीं सढळ स्थिति । ऐकूनि कर्णोपकर्णीं ही कीर्ति । इच्छा धरिती दर्शनाची ॥८॥
कधीं आलिया बाबांचे चित्तीं । पांथस्थांतेंही पैसे वांटिती । दीनादुबळ्यांचा परामर्ष घेती । कृपामूर्ति साईनाथ ॥९॥
पुरुष एक बाया तीन । मेळा अवघा चौघांमिळून । मेहुणी स्वस्त्री दुहिता आपण । संतदर्शनकामुक ॥१०॥
घेऊइ साईंचें दर्शन । मंडळी पावली समाधान । करीत साईंपाशीं । अनुदिन । प्रेमळ भजन नेमानें ॥११॥
सांप्रदाय रामदासी । भजन करीत अति उल्हासीं । बाबाही रुपया आठ आणे तयांसी । आलिया मनासी अर्पीत ॥१२॥
कधीं तयास बर्फी देत । कधीं परतवीत रिक्तहस्त । बाबांचें हें ऐसें सदोदित । परी न निश्चित कांहींही ॥१३॥
पैसे वांटीत हें तों सत्य । नव्हतें यांत कांहींही असत्य । परी ते नव्हते सर्वांस देत । धर्म न करीत सर्वांतें ॥१५॥
जयाची लाभकाळाची घडी । तयासीच ही सुखपरवडी । संतहस्तस्पर्शाची कवडी । लाभेल जोडी भाग्याची ॥१६॥
ये अर्थींची  एक गोष्ट । ऐकतां श्रोते होतील संतुष्ट । करूनि तयांपुढें ती प्रविष्ट । धरूं मग वाट पुढील ॥१७॥
होऊनि प्रात:काळची न्याहारी । बैसतां बाबा स्तंभाशेजारीं । धुनीसंनिध मशिदीमाझारीं । येतसे पोरी अमनी तैं ॥१८॥
पोरी तीन वर्षांची नागडी । हातीं जिनतानी डबी उघडी । आई - जमलीसह तांतडी । येतसे ती घडी साधूनि ॥१९॥
अमनी बैसे मांडीवरी । डबी देई बाबांचे करीं । ‘बाबा रुपय्या रुपय्या’ करी । हात धरी बाबांचा ॥२०॥
बाबांस मुलांचें वेड भारी । पोरही होती गोंडस साजिरी । मुके घेत कुरवाळीत करीं । पोरीस धरीत पोटाशीं ॥२१॥
बाबांनीं धरावें पोटाशीं । अमनीचें चित्त रुपयापाशीं । ‘बाबा देना देना मजशीं’ । म्हणे खिशाशीं लक्ष सारें ॥२२॥
अमनीचा तों पोरस्वभाव । थोरामोठयांही तीच हांव । स्वार्थासाठींच धांवाधांव । परमार्थीं भाव एकाद्या ॥२३॥
पोरीनें बसावें मांडीवरी । आईनें दूर कठयाबाहेरी । हालूं नको देत तोंवरी । खुणावी पोरीस दुरूनि ॥२४॥
“तुझ्या बापाचें मी काय लागें । उठली ती सुटली माझ्या मागें । फुकटखाऊ मेले निलागे” । म्हणावें रागें बाबांनीं ॥२५॥
परी हा राग बाह्यात्कारीं । अंतरीं प्रेमाच्या उसळती लहरी । हस्त घालूनि खिशाभीतरीं । रुपया बाहेरी काढावा ॥२६॥
घालूनियां तो डबींत घट्टा । झांकितां आवाज होई जों खट्ट । डबी हातीं पडतां ती झट्टा । घराची वाट धरीतसे ॥२७॥
हें तो होई न्याहारीवक्तीं । तैसेंच जंव ते लेंडीवर निघती । तेव्हांही अमनीस रुपय्या देती । रागें भरती तैसेंचि ॥२८॥
ऐसें प्रति दिनीं दोन तिजला । सहा देत त्या जमलीला । पांच दादा केळकरांला । भाग्या सुंदरीला दोन दोन ॥२९॥
दहा ते पंधरा तात्याबासी । पंधरा ते पन्नास फकीरबाबांसी । आठ वांटिती गोरगरीबांसी । नित्यनेमेंसीं हें देणें ॥३०॥
असो ऐसी ही दानशीलता । मद्रासियांनीं ऐकोनि वार्ता । सहज उपजोनि अर्थस्वार्थता । भजनोपक्रमता मांडिली ॥३१॥
बाह्यत: तें भजन सुंदर । अंतरीं द्रव्याचा लोभ दुर्धर । पैसे देतात या आशेवर । राहिले सपरिवार शिरडींत ॥३२॥
त्यांतून तिघांस मोठी हाव । बाबांनीं द्यावें बहुत द्रव्य । परी साईपदीं । भजन - सद्भाव । हा एक निजभाव स्त्रियेचा ॥३३॥
पाहूनियां मेघा समोर । आनंदें एक नाचेल मोर । चंद्रालागीं जैसा चकोर । तैसाच आदर तियेचा ॥३४॥
एकदां माध्यान्हींची आरती । चालतां साई कृपामूर्ति  । पाहूनि बाईची सद्भावस्थिति । दर्शन देती रामरूपें ॥३५॥
इतरांस नित्याचे साईनाथ । बाईच्या द्दष्टी जानकीकांत । डोळां घळघळ अश्रु स्रवत  । पाहोनि विस्मित जन झाले ॥३६॥
दोहीं हातीं वाजवी टाळी । सवेंच नयनीं असुवें ढाळी । देखून हें अपूर्व ते वेळीं । जाहली मंडळी विस्मित ॥३७॥
ऐसा पाहोनि तो देखावा । जिज्ञासा जाहली सकळांचे जीवा । इतुका प्रेमाचा पूर कां लोटावा । आनंद व्हावा तियेसचि कां ॥३८॥
पुढें स्वपतीस तिसरे प्रहरीं । आपण होऊन आनंदनिर्भरीं । रामदर्शन - नवलपरी । वदे आचरित साईंचें ॥३९॥
नीलोत्पलदलश्याम । भक्तकामकल्पद्रुम । तो हा भरताग्रज सीताभिराम । दाशरथी राम मज दिसला ॥४०॥
किरीटकुंडलमंडित । वनमालाविराजित । पीतवास चतुर्हस्त । जानकीनाथ मज दिसला ॥४१॥
शंख - चक्र - गदाधर । श्रीवत्सलांछन कौस्तुभहार । तो हा पुरुषोत्तम परात्पर । रूपमनोहर देखिला ॥४२॥
म्हणे हा मानवरूपधारी  । असामान्य लीलावतारी । जानकीजीवन मनोहारी । धनुर्धारी मज दिसला ॥४३॥
फकीर दिसो हा बाह्यात्कारीं । भिक्षाही मागो दारोदारीं । जानकीजीवन मनोहारी । धनुर्धारी मज दिसला ॥४४॥
असो हा अवलिया उपराउपरीं । कोणास कैसाही दिसो अंतरीं । जानकीजीवन मनोहारी । धनुर्धारी मज दिसला ॥४५॥
बाई मोठी परमभावार्थी । पति तियेचा अत्यंत स्वार्थी । ऐसीच भोळी स्त्रियांची जाती । कैंचा रघुपति ये स्थळीं ॥४६॥
मनीं वसे जैसें जैसें । भोळ्या भाविकां आभासे तैसें । आम्हां सकळां साई दिसे । हिलाच कैसें रामरूप ॥४७॥
ऐसे कुतर्क करुनी नाना । केली तियेची अवहेलना । विषाद नाहीं बाईच्या मना । असत्य कल्पना ती नेणे ॥४८॥
ती पूर्वीं मोठी अधिकारी । अशी तियेची आख्या भारी । होतसे रामदर्शन सुखकारी । प्रहरोप्रहरीं तियेस ॥४९॥
पुढें जाह्ला द्रव्यलूमोद्भ । द्रव्यापाशीं नाहीं देव । जाहला रामदर्शनीं अभाव । ऐसा हा स्वभाव लोभाचा ॥५०॥
साईंस हें तों सर्व अवगत । जाणूनि तिचें सरलें दुरित । पुनरपि रामदर्शन देत । पुरवीत हेत तियेचा ॥५१॥
असो पुढें तेच रात्रीं । कैसी वर्तली नवलपरी । गृहस्थ देखे निद्रेमाझारीं । स्वप्न भारी भयंकर ॥५२॥
आपण आहोंत एका शहरीं । पोलीस एक आपणा घरी । मुसक्या बांधून आंवळी करकरी । टोकें निजकरीं मागे उभा ॥५३॥
तेथेंच एक पिंजरा ते जागीं । निकट तयाचिया ब्राह्यभागीं । साईही सर्व पहावयालागीं । उभेच कीं उगी निश्चळ ॥५४॥
पाहूनि महाराज संनिधानीं । जोडूनियां दोनी पाणी । करोनियां मुख केविलवाणी । दीनवाणी तंव वदे  ॥५५॥
बाबा आपुली कीर्ति ऐकुनी । पातलों असतां आपुले चरणीं । प्रसंग हा कां आम्हां - लागुनी । तुम्हीही असूनि प्रत्यक्ष ॥५६॥
महाराजीं प्रत्युत्तर दिधलें । “कृतकर्म अवघें पाहिजे भोगिलें” । गृहस्थ अति विनीत बोले । कांहीं न केलें ऐसें म्यां ॥५७॥
या जन्मीं तरी कांहीं न केलें । जेणें हें ऐसें संकट गुजरलें । तयावरी महाराज बोलले । “असेल केलें जन्मांतरीं” ॥५८॥
दिधलें मग प्रत्युत्तर तेणें । मागील जन्माचें मी काय जाणें । असलें तरी तें आपुले दर्शनें । भस्म होणें आवश्यक ॥५९॥
होतां आम्हां आपुलें दर्शन । अग्नीपुढें जैसें तृण । तैसें तें समूळ भस्म होऊन । कैसा न त्यापासून मुक्त मी ॥६०॥
तंव महाराज वदती तयास । “ऐसा तरी  आहे काय विश्वास” । होय म्हणतां गृहस्थास । डोळे मिटावयास आज्ञापिती ॥६१॥
आज्ञेप्रमाणें डोळे मिटुनी । उभाच आहे तंव तत्क्षणीं । धाडदिशीं जैसें पडलें कोणी । आवाज श्रवणीं ऐकिला ॥६२॥
आवाज कानीं पडतां दचकला । डोळे उघडूनि पाहूं लागला । आपण बंधनिर्मुक्त दिसला । पोलीस पडला रक्तबंबाळ ॥६३॥
तेणें मनीं अत्यंत घाबरला । महाराजांकडे पाहूं लागला । हांसून मग ते म्हणती तयाला । “भला सांपडलास तूं आतां ॥६४॥
आतां येतील अमलदार । पाहून येथील सर्व प्रकार । तूंच दांडगा म्हणतील अनिवार । पुन: गिरफदार करतील” ॥६५॥
मग तो गृहस्थ वदे तत्त्वतां । बाबा आपण खरेंच बोलतां । कसेंही करा सोडवा आतां । दिसेना त्राता तुम्हांविण ॥६६॥
ऐसें ऐकूनि साई वदती । “पुनश्च लावीं नेत्रपातीं” । तैसें करूनि डोळे जों उघडिती । नवल स्थिति आणीक ॥६७॥
आपण पिंजर्‍याचे बाह्यदेशीं । महाराज साई आपुलेपाशीं  । घाललें साष्टांग नमन त्यांसी । बाबा मग पुसती तयातें ॥६८॥
“आतांचा तुझा नमस्कार । आणि यापूर्वीं जे घालीस निरंतर । आहे काय दोहींत अंतर । करून विचार सांगें मज” ॥६९॥
तंव तो गृहस्थ देई उत्तर । जमीन - अस्मानाचें अंतर । केवळ द्रव्यार्थ पूर्वनमस्कार । सांप्रत परमेश्वरभावानें ॥७०॥
पूर्वीं कांहींही भाव नव्हता । इतकेंच नव्हे मुसलमान असतां । आपण आम्हां हिंदूंस भ्रष्टवितां । होता चित्तीं हा रोष ॥७१॥
तयावरी बाबा पुसती । “नाहीं काय तुझिया चित्तीं । मुसलमानाच्या देवांची भक्ति” । नाहीं म्हणती गृहस्थ ॥७२॥
पुसती बाबा तयालागुनी । “पंजा नाहीं का तुझिया सदनीं । पूजीत नाहींस का ताबुताचे दिनीं । पाहीं मनीं विचारूनी ॥७३॥
‘काड - बिबी’ ही आहे सदनीं । लग्नकार्यासी तिजला पूजुनी । तुष्टवितोस ना मानपानीं । मुसलमानी दैवत हें” ॥७४॥
होय म्हणूनी मान्य करितां । आणीक काय इच्छा पुसतां । निजगुरु रामदासदर्शनता । उपजली आस्था गृहस्था ॥७५॥
महाराज मग तयाप्रती । मागें वळून पहा म्हणती । मग जों मागें वळून पाहती । समर्थ मूर्ति सन्मुख ॥७६॥
पडतांच समर्थांचे पायीं । अद्दश्य जाहले ठाईंचे ठायीं । मग तो जिज्ञासापूर्वक पाहीं । आणीक कांहीं विचारी ॥७७॥
बाबा आपुलें जाहलें वय । म्हातारा हा दिसतो काय । आहे आपणा ठावा काय । आयुर्दाय आपुला ॥७८॥
काय वदसी मी म्हातारा आहें । माझिया सवें धांवूनि पाहें । म्हणोनि साई जों धांवताहे । हा लागलाहे माघारा ॥७९॥
महाराज सवेग धांवतां । धुळोरा जो उसळला वरता । तेच संधीस पावले अद्दश्यता । पावली जागृतता गृहस्थास ॥८०॥
असो तो जैं लाधला जागृती । मनीं विचारितां स्वप्नस्थिती । तत्काळ पालटली चित्तवृत्ती । वानी महती बाबांची ॥८१॥
पाहूनि ऐसी चमत्कृती । साईपदीं जडली भक्ति । बाबांविषयीं संशयवृत्ती । मावळली परिस्थिती पूर्वील ॥८२॥
पाहूं जातां अवघें स्वप्न । परी तीं उत्तरें आणि ते प्रश्न । ऐकूनि श्रोतां करावा ग्रहण । भावार्थ गहन आंतील ॥८३॥
हा प्रश्नोत्तर - अनुवाद । मद्रासी पावला परमबोध । विराला साईंसंबंधीं विरोध । हास्यविनोदरूपानें ॥८४॥
दुसरे दिवशीं प्रात:काळीं । मंडळी मशिदीं दर्शना आली । दोन रुपयांची बर्फी दिधली । कृपा केली साईनाथें ॥८५॥
तैसेच पल्लवचे रुपये दोन । बाबांनीं तयां समस्तां देऊन । घेतलें कांहीं दिवस ठेवून । भजन - पूजन चाललें ॥८६॥
पुढें कांहीं काळ क्रमिला । निघाली मंडळी जाण्याला । नाहीं जरी बहु पैसा लाधला । भरपूर लाभला आशीर्वाद ॥८७॥
“अल्ला मालीक बहोत देगा । अल्ला तुमारा अच्छा करेगा” । पुढें हेंच कीं आलें उपेगा । लागले मार्गा ते जेव्हां ॥८८॥
साईंचिया आशीर्वचनीं । साईंची आठवण ध्यानीं मनीं । मार्ग चालतां दिवसरजनीं । दु:ख ना स्वप्नीं तिळभरी ॥८९॥
घडली आशीर्वादानुरूप । यथासांग यात्रा अमूप । वाटेस न होतां यत्किंचित ताप । पातले सुखरूप निजगृहा ॥९०॥
मनीं चिंतिल्या होत्या एका । त्या घडून, घडल्या यात्रा अनेका । वानीत साईवचनकौतुका । आनंद सकळिकां अनुपम ॥९१॥
शिवाय संताचें आशीर्वचन । ‘अल्ला अच्छा करील’ हें वचन । अक्षरें अक्षर सत्य होऊन । मनोरथ पूर्ण जाहला ॥९२॥
ऐसे ते समस्त तीर्थोपासक । भगवद्भक्त मद्रासी लोक । सकळ सत्त्वस्थ सात्त्विक । बंधमोचक साई त्यां ॥९३॥
ऐसीच सुरस आणिक कथा । सांगतों परिसिजे सादर श्रोतां । भक्तिभावें श्रवण करितां । आश्चर्य चित्ता प्रकटेल ॥९४॥
भक्तकाजकल्पद्रुम । कैसे साई दयाळू परम । कैसे सप्रेम भक्तांचे काम । पुरवीत अविश्रम सर्वदा ॥९५॥
ठाणें जिल्ह्यांत वांद्रें शहर । तत्रस्थ एक भक्तप्रवर । रघुनाथराव तेंडूलकर । चतुर - धीर बहुश्रुत ॥९६॥
सदा आनंदी मोठे प्रेमी । विनटले साईंचे पादपद्मीं । तेथील बोधमकरंदकामीं । अखंड नामीं गुणगुणत ॥९७॥
रूप देऊनि ‘भजनमाला’ । वर्णिली जयांनीं साईलीला । ती भक्तिप्रेमें वाचील त्याला । साईच पावला पावलीं ॥९८॥
सावित्री नामें तयांचें कलत्र । बाबू तयांचा ज्येष्ठ पुत्र । पहा तयांचा अनुभव विचित्र । परिसा तें चरित्र साईंचें ॥९९॥
एकदां बाबू साशंकितमन । वैद्यकीय पाठशाळेमधून । घेऊन परदेशीय वैद्यकी शिक्षण । परीक्षेलागून बैसेना ॥१००॥
तयानें रात्रीचा दिवस करून । अभ्यास केला अति कसून । सहज ज्योतिष्यास केला प्रश्न । परीक्षेंत उत्तीर्ण होईन का ॥१०१॥
चाळूनि पंचांगाचीं पानें । ज्योतिषी पाही ग्रहांचीं स्थानें । राशी नक्षत्रें मोजूनि बोटानें । सचिंत मुद्रेनें अवलोकी ॥१०२॥
म्हणे केलात परिश्रम थोर । परी ये वर्षीं न ग्रहांचा जोर । पुढील वर्ष फार श्रेयस्कर । परीक्षा निर्घोर ते वर्षीं ॥१०३॥
बैसून परीक्षेस काय सार्थक । होणार जरी श्रम निरर्थक । विद्यार्थ्यानें हा घेतला वचक । तेणें तो दचकला मनासी ॥१०४॥
पुढें तया विद्यार्थ्याची माता । अल्पावकाशीं शिरडीस जातां । नमितां साईचरण माथां । कुशल वार्ता चालल्या ॥१०५॥
निघाली तैंही ही कथा । करुणावचनीं बाबांसी प्रार्थितां । म्हणे मुलगा परीक्षेस बसता । असती अनुकूलता ग्रहांची ॥१०६॥
पत्रिका पाहिली ज्योतिष्यांहीं । म्हणती यंदा योग नाहीं । असून अभ्यासाची तयारीही । मुलगा न जाई परीक्षेस ॥१०७॥
तरी बाबा ही काय ग्रहदशा । यंदा अशी कां ही निराशा । पडेल एकदां पदरीं परीक्षा । ऐसी बहु आशा समस्तां ॥१०८॥
ऐकून बाबा वदले वचन । “सांगें तयास माझें मान । पत्रिका ठेवीं गुंडाळून । बैसें जा स्वस्थमन परीक्षे ॥१०९॥
नादा कुणाच्या लागूं नका । जन्मपत्रिका पाहूं नका । सामुद्रिका विश्वासूं नका । चालवा निका अभ्यास ॥११०॥
म्हणावें मुलास येईल यश । स्वस्थचित्तें परीक्षेस बैस । होऊं नको असा निराश । ठेवीं विश्वास मजवरी” ॥१११॥
असो बाबांची आज्ञा घेउनी । आई परतली ग्रामालागुनी । मुलास बाबांचा निरोप कथुनी । उत्साहें जननीं आश्वासी ॥११२॥
ऐसा तो साईवचनोल्हास । मुलगा बैसला परीक्षेस । उत्तरेंही लेखी प्रश्नांस । यथावकाश दीधलीं ॥११३॥
लेखी परीक्षा पूर्ण झाली । उत्तरेंही संपूर्ण लिहिलीं । परी आत्माविश्वासें घेरली । संशयें चळली स्थिरबुद्धि ॥११४॥
असतां लिहिलीं सम्यगुत्तरें । उत्तीर्ण व्हावया तितुकीं पुरे । परी विद्यार्थिया वाटे तें अपुरें । सोडिला धीर तयानें ॥११५॥
वस्तुत: लेखी परीक्षेंत पास । होता तरी त्यास वाटे मी नापास । तेणें होऊन तो उदास । तोंडी परीक्षेस बैसेना ॥११६॥
तोंडी परीक्षेस आरंभ झाला । प्रथम दिवस तैसाच गेला । दुसरे दिवशीं एक स्नेही आला । विद्यार्थी देखिला भोजनस्थित ॥११७॥
म्हणे ही काय आश्चर्यता । परीक्षकाला तुझी चिंता । म्हणे जा पाहून ये आतां । तेंडूलकर नव्हता कां काल ॥११८॥
लेखी परीक्षेंत तो नापास । तया तोंडीचे किमर्थ सायास । म्हणून घरीं तो बैसला उदास । स्पष्ट मीं तयास सांगितलें ॥११९॥
तेव्हां परीक्षक वदे तूं जाईं । असेल तैसा घेऊन येईं । “लेखी परीक्षेंत पास” ही देईं । आनंददायी खबर त्या ॥१२०॥
मग तो आनंद काय पुसावा । केला महाराज साईंचा धांवा । न घेतां एक क्षणाचा विसावा । उल्हासभावें धांवला ॥१२१॥
असो पुढें जाहलें गोड । परीक्षेची पुरली होड । दिधली द्दढ निजपदीं जोड । साईंनीं कोड पुरवुनी ॥१२२॥
दळावयाच्या जात्याचा खुंट । हालहालवूनि बसविती घट्ट । तैसीच गुरुपदनिष्ठेची गोष्ट । हालवूनि चोखट साई करी ॥१२३॥
ऐसें न कोणा केव्हांही कथिती । जेणें न हालेल चित्तवृत्ती । हे तों बाबांची नित्य प्रचीती । निष्ठा ये रीतीं द्दढ करिती ॥१२४॥
चालूं जातां कथिल्या वाटे । आरंभीं आंरभीं गोड वाटे । पुढें ऐसे पसरितील सराटे । कांटेच कांटे चोंहींकडे ॥१२५॥
मग त्या निष्ठेस फुटतील फांटे । सहज मनीं संशय दाटे । किमर्थ साई या आडवाटे । आणी हें वाटे मनाला ॥१२६॥
परी हें ऐसें जेथें वाटे । तेथेंच श्रद्धा धरा नेटें । कसोटीच हीं प्रत्यक्ष संकटें । तेणेंच पैठे द्दढ श्रद्धा ॥१२७॥
देऊनियां संकटां तोंडा । करितां साईस्मरण अखंड । होतील सकळ अपाय दुखंड । शक्ति ही प्रचंड नामाची ॥१२८॥
हेंच या अंतरायांचें प्रयोजन । तेंही करी साईच निर्माण । तेव्हांच घडेल साईस्मरण । संकटोपशमनही तेव्हांच ॥१२९॥
असो याच मुलाचे वडील । भक्त बाबांचे अति प्रेमळ । धीर उदार सत्त्वशील । गात्रें शिथिल जाहलीं ॥१३०॥
प्रसिद्ध परदेशीय व्यापारी । पेढी जयांची मुंबई शहरीं । इमानें इतबारें तयांचे पदरीं । केली नोकरी तयांनीं ॥१३१॥
पुढें होतां वृद्धापकाळ । नेत्रांस येऊं लागली झांकळ । इंद्रियें निजकार्यीं विकळ । वांछिती निश्चळ आराम ॥१३२॥
काम कराया उरली न शक्ति । म्हणून सुधारावया प्रकृति । रघुनाथराव रजा घेती । स्वस्थ विश्रांति भोगिती ॥१३३॥
पुढें ती रजा संपूर्ण भरली । नाहीं पूर्ण विश्रांति लाभली । म्हणून मागुती अर्जी लिहिली । रजा प्रार्थिली आणीक ॥१३४॥
अर्जी देखूनियाम उपरी । अपेक्षित रजेची शिफारस करी । परी त्या पेढीचे वरिष्ठाधिकारी । पूर्ण विचारी दयाळू ॥१३५॥
धनी मनाचा उदार । पाहुनि आपुला इमानी चाकर । देई प्रेमाची अर्धी भाकर । पुढील चरितार्थ चालावया ॥१३६॥
ऐसी ही सरकारी पद्धत । उत्तम पेढयाही प्रसंगोपात । प्रामाणिक सेवकांनिमित्त । उत्तेजनार्थ अवलंबिती ॥१३७॥
परी ही भाकर माझा धनी । देईल काय मजलागुनी । पडेन जेव्हां मी बेकार होउनी । ऐसिया चिंतनीं पडले ते ॥१३८॥
दीडशें अवघा माझा पगार । पाऊणशेंच्या पेन्शनावर । पडेल दिनचर्येचा भार । मनांत विचार घोळत ॥१३९॥
परी पुढें जाहली मौज । पहा बाबांचें नवल भोज । रघुनाथरावांचे कुटुंबा हितगुज । पुसती तें चोज परिसिजे ॥१४०॥
अखेरचा हुकूम व्हावया आधीं । असतां पंधरा दिसांचा अवधी । जाऊनि तियेच्या स्वप्नामधीं । पुसती बुद्धी तियेस ॥१४१॥
शंभर द्यावे माझी मनीषा । पुरेल ना तव मनींची आशा” । बाई वदे हें काय पुसा । आम्हां भरंवसा आपुलाच ॥१४२॥
तिकडे ठराव अर्जीवर । रघुनाथराव इमानी नोकर  । बहुत जाहली सेवा आजवर । अर्धी भकर द्यावी त्यां ॥१४३॥
मुखें जरी वदले शंभर । दहा दिधले आणीक वर । ऐसे हे समर्थ करुणाकर । प्रेम अनिवार भक्तांचें ॥१४४॥
आतां परिसा आणीक एक । कथा सुंदर मनोरंजक । भक्तप्रेमोल्हासकारक । आनंददायक  श्रोतयां ॥१४५॥
डॉक्टर नामें क्यापटन हाटे । बाबांचे भक्त श्रद्धाळू मोठे । बाबांनीं स्वप्नांत दर्शन पहांटे । दिधलें तें गोमटें कथानक ॥१४६॥
हाटे राहती ग्वालेरीं । बाबांस देखती स्वप्नामाझारी । पहा बाबांची प्रश्नकुसरी । हाटेही उत्तरीं काय वदती ॥१४७॥
म्हणती बाबा मज विसरलासि काय । तात्काळ हाटयांनीं धरिले पाय । जरी विसरलें लेंकरूं माय । तरणोपाय कैसेनी ॥१४८॥
उठून बागेंत गेले तांतडी । खुडिली ताजी वालपापडी । शिधा साहित्य दक्षिणा रोकडी । भक्ति परवडी सिद्ध केली ॥१४९॥
ऐसी पाहोनि सिद्धी पूर्ती । हाटे तें सूप जों समर्पूं सरती । अवचित उघडलीं नेत्रपातीं । स्वप्नस्थिती हें तैं कळलें ॥१०५॥
तात्काळ हाटयांचें जाहलें मन । पदार्थ हे समस्त मिळवून । करावे बाबांस प्रत्यक्ष अर्पण । तदर्थ जाऊन शिरडीस ॥१५१॥
परी ते तेव्हां ग्वालेरीस । पत्र लिहिलें मुंबईस । वृत्तान्त साद्यंत कळविला स्नेह्यास । विनविलें शिरडीस जावें स्वयें ॥१५२॥
टपालमार्गें येईल पैसा । शिधा घ्यवा योग्य तैसा । शेंगा पापडीच्या सुंदर खाशा । मिळवाव्या कैशातरीही ॥१५३॥
उरला पैका सवें न्यावा । शिध्यासमवेत बाबांस द्यावा । चरण वंदूनि प्रसाद मागावा । तो मज द्यावा पाठवून ॥१५४॥
पैसा येतांच स्नेही निघाले । शिरडीस जाऊन सामान घेतलें । पापडीवांचून किंचित अडलें । तों एक टोपलें तैं आलें ॥१५५॥
तें होतें जिये बाईचे माथां । तियेस बोलावून पाहूं जातां । शेंगाच पापडीच्या लागल्या हाता । अतिआश्चर्यता सकळांतें ॥१५६॥
मग तें सर्व साहित्य आणिलें । महाराजांसी सादर केलें ।  त्यांनीं निमोणकरांतें दिधलें । उदयीक निवेदिलें शिजवून ॥१५७॥
पुढें बाबा भोजना बैसतां । वरण - भातादिकां न शिवतां । शेंगाच तेवढया उचलून घेतां । आश्चर्य समस्तां वाटलें ॥१५८॥
शेंगाच तेवढया ग्रहण केल्या । त्याच तेवढया मुखीं घातल्या । हाटयांना बहु आनंद झाला । वृत्तांत कळला हा तेव्हां ॥१५९॥
जया मनीं जैसा भाव । तैसाच कीं हा हाटयांना अनुभव । पुढील कथेचा परिसा नवलाव । गोड लाघव साईंचें ॥१६०॥
साईहस्तस्पर्शपूत । असावा एक रुपया गृहांत । इच्छा उद्भवली हाटयांचे मनांत  । पुरवीत मनोगत तो साई ॥१६१॥
मनाच्या वृत्ति कोटयनुकोटी । त्यागून ओखटी धरावी गोमटी । मग पहा साईची कैंची हतवती । उभाच पाठीं भक्तांच्या ॥१६२॥
होतां ऐसी सदिच्छा निर्माण । सफळ व्हावया नलगे क्षण । निघाला एक स्नेही तत्क्षण । साईदर्शनकामुक ॥१६३॥
वृत्ति असावी मात्र गोड । नवल साई पुरवितो होड । जया सद्वृत्तीची आवड । तयाचें कोड त्या हातीं ॥१६४॥
तंव हाटे एक रुपया देती । तया स्नेहासी अतिप्रीतीं । म्हणती नका पडूं देऊं विस्मृती । घाला हा हातीं बाबांच्या ॥१६५॥
स्नेही जेव्हां शिरडीस गेले । तात्काळ बाबांचें दर्शन घेतलें । चरण तयांचे माथां वंदिले । सन्मुख बैसले बाबांचे ॥१६६॥
दक्षिणेलागीं कर पसरितां । आपुली दक्षिणा दिधली प्रथमता । बाबांनीं खिशांत सूदिली अविलंबता । काढी तो मागुता हाटयांची ॥१६७॥
तोही रुपया जोडूनिज कर । ठेवी बाबांचे करतलावर । म्हणे ही दक्षिणा मजबरोबर । हाटे डॉक्टर पाठविती ॥१६८॥
हा साई सर्वह्रदयवासी । हाटे जरी ग्वालेरनिवासी । जाणूनि मनीषा तयांचे मानसीं । बैसले रुपयासी न्याहाळीत ॥१६९॥
होऊनियां प्रेमोन्मुख । बाबा रुपया धरिती सन्मुख । नवल अवलोकिती लावोनि टक । लोक टकमक देखती ॥१७०॥
दक्षिणांगुष्ठें वरचेवरी । उडवूनि झेलिती बाबा निजकरीं । ऐसी क्रीडा करूनि क्षणभरी । रुपया करीत ते परत ॥१७१॥
म्हणती “हा ज्याचा त्यास देईं । सवें ह उदीचा प्रसाद नेईं । नलगे आम्हांस तुझें कांहीं । स्वस्थ राहीं म्हणें तया” ॥१७२॥
घालूनि लोटांगण बाबांचे पायीं । उदीप्रसाद पाठवूनि ठायीं । घेऊनि बाबांची आज्ञा तो स्नेही । आला निजगेहीं ग्वालेरीस ॥१७३॥
आलियावरी ग्वालेरीतें । रुपया देऊनि डॉक्टरांतें । कळविलें सकळ वृत्तांतातें । दाटलें भरतें हाटयांतें ॥१७४॥
म्हणे मनीं जैसा हेत । केला होता जैसा संकत । जाणोनि माझें मनोगत । पुरविला मनोरथ बाबांनीं ॥१७५॥
ऐसें वाटलें हाटयांचे मना । परी ही तरी त्यांची कल्पना । कोण जाणील संतांची योजना । प्रयोजना तयांच्या ॥१७६॥
हें जरी म्हणावें निश्चित । तीच पहा दुसरी प्रचीत । ती तों याहून विपरीत । ज्याचें मनोगत त्या ठावें ॥१७७॥
एकाचा रुपया परत देती । एकाचा तो खिशांत सूदती । कारण काय वदावें निश्चितीं । काय चित्तीं बाबांच्या ॥१७८॥
त्यांचीं कारणें तयांस ठावीं । जापण केवळ मौज पहावी । ऐसी गोड संधी न दवडावी । कथा परिसावी ये अर्थीं ॥१७९॥
एकदां वामन नार्वेकर । जयांस बाबांचें प्रेम अपार । आणिला एक रुपया सुंदर । भक्तिपुर:सर अर्पाया ॥१८०॥
एका बाजूस कोरिली होती । राम लक्ष्मण सीतासती । दुजिया बाजूस रम्य मूर्ति । होता मारुती बद्धांजळी ॥१८१॥
तया अर्पणीं पोटीं हेत । हस्तस्पर्शापाठीं तो परत । मिळावा उदीप्रसादासहित । म्हणून हस्तांत ठेविला ॥१८२॥
कोणा मनीं काय ह्रद्नत । बाबा हे तों सकळ जाणत । तरी तो रुपया पडतां हस्तांत । तात्काळ खिशांत सूदिला ॥१८३॥
वामनरावांचा मानस । माधवरावांनीं कळविला बाबांस । रुपया परत करावयास । विनविलें तयांस अत्यंत ॥१८४॥
“त्याला कसला द्यावयाचा । आपणांसचि तो ठेवावयाचा” । वदले बाबा स्पष्ट वाचा । वामनरावांच्या समक्ष ॥१८५॥
“तरीही तो देईल । रुपये पंचवीस याचें मोल । हा मी यासी देईन बदल” । म्हणाले बोल तयाला ॥१८६॥
मग त्या एका रुपयालागीं । वामनरावानें लागवेगीं । तेही मिळवून जागोजागीं । बाबांलागीं दीधले ॥१८७॥
तेही पूर्ववत खिशांत ठेविले । म्हणती रुपयांचे ढिगार लाविले । तरी त्या रुपयासवें न तोले । उणें ते मोलें तयापुढें ॥१८८॥
म्हणती शामा हा तूं घेईं । असूं दे हा आपुले संग्रहीं । देव्हार्‍यामाजीं ठेवून देईं । करीत जाईं पूजन ॥१८९॥
आतां हें ऐसें काय करितां । विचारावयाची कोणास सत्ता । साई योग्यायोग्य जाणता । देता घेता समर्थ ॥१९०॥
असो आतां ही कथा आटपतां । विसावा देऊं श्रोतयां चित्ता । जेणें मनन आणि निदिध्यासता । कथा परिसतां घडावी ॥१९१॥
केलें काय ऐकलें श्रवण । पचनीं न पडे मननावीण । वरी न घडतां निदिध्यासन । श्रवण निष्कारण होईल ॥१९२॥
तरी हेमाड साईंसी शरण । मस्तकीं धरी साईंचे चरण । सकळ साधनांचें हें साधन । पुढील निवेदन पुढारां ॥१९३॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । स्वप्नकथाकथनं नाम एकोनत्रिंशतितमोऽध्याय: संपूर्ण: ॥
 
 
॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥