गुरूवार, 21 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. साईबाबा
Written By
Last Updated : मंगळवार, 26 एप्रिल 2022 (14:51 IST)

साईसच्चरित - अध्याय २७

Sai Satcharitra Marathi adhyay 27
॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
द्दढ धरिल्या श्रीसद्नुरुचरण । घडे ब्रम्हादित्रैमूर्तिनमन । साक्षात्परब्रम्हाभिवंदन । स्वानंदघन सुप्रकट ॥१॥
मारितां एका सागरीं बुडी । साधती सकल तीर्थपरवडी । बैसतां गुरुपदीं देऊनि दडी । आतुडती बुडीं सकल देव ॥२॥
जय जयाजी साई सद्नुरू । जय जयाजी सायुज्यकल्पतरू । जय जयाजी निजबोधसागरू । कथेसी आदरू उपजवीं ॥३॥
मेघोदकालागीं चातक । तैसे तव कथामृता भाविक । सेवोत तुझे भक्त सकळिक । पावोत सुख सदैव ॥४॥
परिसतां तव कथा निर्मळ । स्वेद अंगीं फुटो निखळ । नेत्रीं दाटो प्रेमजळ । प्राण पांगुळला राहो ॥५॥
मना येवो गहिंवर । रोमांच उठोत वरचेवर । रुदन स्फुंदन वारंवार । घडो सपरिवार श्रोतयां ॥६॥
तुटूनि जावोत परस्परविरोध । सानथोर भेदाभेद । हाच गुरुकृपावबोध । करावा शोध अंतरीं ॥७॥
येई न हा द्दष्टीं दावितां । सर्वेंद्रियां याची अगोचरता । सद्नुरुवीण याचा दाता । न मिळे धुंडितां त्रिभुवनीं ॥८॥
कामादि षड्‌विकारोपशम । भक्तिभाव नि:सीम प्रेम । नुपजतां गुरुपदीं निष्ठा परम । होई न उद्नम अष्टभावां ॥९॥
भक्ताचें जें निजसुख । तेणेंचि गुरूसि परम हरिख । भक्त जों जों परमार्थोन्मुख । तों तों कौतुक गुरूतें ॥१०॥
देह गेह पुत्र जाया । मी माझें  हा व्या वायां । ही तों सर्व क्षणिक माया । जैसी छाया दुपारची ॥११॥
बाधूं नये मायेची गुंती । ऐसें जरी असेल चित्तीं । अनन्यभावें साईंप्रती । शरणागती संपादा ॥१२॥
लावावया मायेचा अंत । वेदशास्त्रीं टेकिले हात । पाहील जो भूतीं भगवंत । तोचि तो निश्चित तरेल ॥१३॥
सोडूनियां निजामशाई । धन्य तो पाटील चांदभाई । सवें घेऊनि फकीर साई । आरंभीं येई नेवासिया ॥१४॥
तेथें वर्ष सहा मास । फकीराचा होई निवास । तेथेंच कानड गावींच्या कमास । सहवासास ठेवियलें ॥१५॥
असो पुढें प्रसिद्ध टाकळी । घेऊन तेथील दगडू तांबोळी । कमा - बाबांसमवेत ही मंडळी । तेथून आली शिर्डीस ॥१६॥
जागोजागीं अपरिमित । पवित्र स्थळें तीर्थें बहुत । परी साईंच्या भक्तांप्रत । शिरडीच अत्यंत पवित्र ॥१७॥
जरी न दैवें येता हा योग । कैंचा मग हा महाभाग । आम्हां दीनां हा संयोग । महद्भाग्य हें आमुचें ॥१८॥
जे जे भक्त शरणागत । साधावया तत्कार्यार्थ । साई तयांस दावी यथार्थ । सन्मार्ग हितार्थ तयांच्या ॥१९॥
तरी श्रोतां एकाग्रमन । होऊनि करा सच्चरितावर्तन । तें हें परम गुरुकृपासाधन । चरित्र पावन साईंचें ॥२०॥
गताध्यायीं निरूपण । एकास निजगुरुपदीं स्थापन । अक्कलकोट स्वामींची खूण । एकास देऊन जागविलें ॥२१॥
एकाचा चुकविला आत्मघात । युक्ति योजूनि अकल्पित । जीवदान दिधलें क्षणांत । ओढवला देहान्त टाळुनी ॥२२॥
आतां या अध्यायीं कथन । कधीं साई कैसे प्रसन्न । होऊन करीत अनुग्रहदान । सुखसंपन्न भक्तांस ॥२३॥
दीक्षाप्रकार तो अद्भत । कैसा कवणालागीं होत । विनोदपूर्ण हांसत खेळत । श्रोते परिसोत सावचित्त ॥२४॥
उपदेशाच्या अनेक रीती । मागां वर्णिल्या येच ग्रंथीं । जैसी ज्याची ग्राहकस्थिती । मार्ग उपदेशिती तैसाच ॥२५॥
वैद्य जाणे रोगाचें निदान । तयास ठावा मात्रेचा गुण । रोग्यास नाहीं त्याची जाण । आधीं आण गूळ म्हणे ॥२६॥
गूळ गोड परी अपकारी । रोगी तदर्थचि हट्ट घरी । घेई न वाटी औषधाची करीं । गूळ करावरी न ठेवितां ॥२७॥
चाले न रुग्णावरी सक्ती । वैद्य तेव्हां युक्ति योजिती । आधीं गूळ मग औषध देती । परी साधिती निजकार्य ॥२८॥
मात्र अनुपान तेवढें बदलती । जेणें गुळाचे दोष हरपती । योजिलीं औषधें कार्यक्षम होती । तेच कीं रीती बाबांची ॥२९॥
हाच नव्हे सर्वत्र नियम । अधिकार आणि मनोधर्म । जैसी सेवा भक्त - प्रेम । तैसाच उपक्रम अनुग्रहा ॥३०॥
नवल बाबांची अद्भुत कृती । जेव्हां कोणा प्रसन्न होती । तया मग ते अनुग्रह देती । कवण्या स्थितीं तें परिसा ॥३१॥
आलें एकदां तयांचे चित्ता । ध्यानीं मनीं कोणाच्या नसतां । सहज थट्टा विनोद करितां । भक्तकृतार्थता साधीत ॥३२॥
इच्छा उद्भवतां ग्रंथवाचनीं । सहज येई भक्तांच्या मनीं । ग्रंथ बाबांच्या हातीं देऊनि । प्रसाद म्हणूनि तो घ्यावा ॥३३॥
पुढें मग त्या ग्रंथाचें वाचन । केलिया होईल श्रेयसंपादन । श्रोत्यावक्त्यांचें परमकल्याण । प्रसादपूर्ण श्रवण तें ॥३४॥
कोणी दशावतार चित्रें । कोणी दशावतारांचीं स्तोत्रें । कोणी पंचरत्नी गीतेसम पवित्रें । पुस्तकें चरित्रें अर्पीत ॥३५॥
दासगणूही संतलीलामृत । भक्तलीलामृतही अर्पीत । कोणी विवेकसिंधु ग्रंथ । बाबा ते देत शामातें ॥३६॥
पुस्तकें शामा हीं तुजला  व्हावीं । म्हणती घरीं बांधून ठेवीं । शामानें आज्ञा शिरीं वंदावी । पुस्तकें रक्षावीं दप्तरीं ॥३७॥
आणूनि ऐसें भक्त मनीं । ग्रंथ आणीत दुकानांतुनी । कीं बाबांचे हातीं देउनी । प्रसाद म्हणुनी मागावे ॥३८॥
स्वभाव बाबांचा जरी उदार । हेंही कराया लागे धीर । नेती माधवरावांस बरोबर । करिती समोर तयांसी ॥३९॥
तयांकरवीं बाबांचे हातीं । समय पाहूनि ग्रंथ देती । बाबांस जैसी ग्रंथांची महती । तैसीच भक्तस्थिति ठावी ॥४०॥
भक्तांनीं द्यावे ग्रंथ करीं । बाबांनीं चाळावे वरचेवरी । भक्तांनीं घ्यावया ते  माघारी । हस्त पुढारीं धरावे ॥४१॥
परी न बाबा तयांतें देती । ते तों देती माधवरावांप्रती । म्हणत शामा ठेव या प्रती । असूंदे संप्रती तुजपाशीं ॥४२॥
शामानें पुसावें स्पष्टोक्तीं । हे जे आतुरते हात पसरती । त्यांच्या त्यांस देऊं का प्रती । तरी ते वदती तूं ठेव ॥४३॥
एकदां भक्त काका महाजनी । आवड जयांस भागवतवाचनीं । सवें ग्रंथाची प्रत घेउनी । शिरडीलागुनी पातले ॥४४॥
माधवराव भेटूं आले । वाचूं म्हणून पुस्तक  उचललें । हातीं घेऊनि मशिदीं गेले । सहज पुसियेलें बाबांनीं ॥४५॥
शामा हें हातीं  पुस्तक कसलें । शामानें तें निवेदन केलें । बाबांनीं तें हातीं घेतलें । परत केलें पाहून ॥४६॥
हेंच पुस्तक हीच प्रत । हेंच नाथांचें भागवत । होतें श्रीकरप्रसादप्राप्त । महाजनींप्रत पूर्वींच ॥४७॥
ग्रंथ नव्हे तो मालकीचा । आहे काका महाजनींचा । वाचूं तात्पुरता जाहली इच्छा । स्पष्ट वाचा कळविलें ॥४८॥
तरीही बाबा वदती तयांला । ज्याअर्थीं म्यां हा तुज दिधला । ठेव तूं आपुले संग्रहाला । येईल कामाला दप्तरीं ॥४९॥
असो पुढें कांहीं कालें । पुनश्च काका शिरडीस आले । सवें आणिक भागवत आणिलें । हस्तीं ओपिलें साईंच्या ॥५०॥
प्रसाद म्हणून माघारा दिधलें । ‘नीट जीव लाव’ आज्ञापिलें । कीं तें जिवाभावाला आपुलें । येईल आश्वासिलें काकांस ॥५१॥
‘हेंच कामीं येईल आपुले । नको देऊं हें कोणास वहिलें’ । ऐसें मोठया कळकळीनें कथिलें । सप्रेम वंदिलें काकांनीं ॥५२॥
बाबा स्वयें अवाप्तकाम । पदार्थमात्रीं पूर्ण निष्काम । भागवत जयांचा आचरता धर्म । संग्रहश्रम किमर्थ ॥५३॥
कोण जाणे बाबांचें मन । परी हें ग्रंथांचें संमेलन । व्यवहारद्दष्टया अति पावन । श्रवणसाधन निजभक्तां ॥५४॥
शिरडी आतां स्थान पवित्र । देशोदेशींचे बाबांचे छात्र । होतील वेळोवेळीं एकत्र । ज्ञानसत्र मांडतील ॥५५॥
तेव्हां हे ग्रंथ येतील कामा । दप्तरांतून दावील शामा । स्वयें आपण जाऊं निजधामा । ग्रंथ प्रतिमा होतील ॥५६॥
ऐसे हे ग्रंथ परम पावन । असो शिरडी वा अन्य स्थान । वाचितां भक्तास व्हावी आठवण । संग्रहकारण असेल हें ॥५७॥
असो रामायण वा भागवत । परमार्थाचा कोणताही ग्रंथ । वाचितां रामकृष्णादिकांचें चरित । साईच दिसत मागें पुढें ॥५८॥
वाटे या ग्रंथांच्या निभूति । साईच नटला ते ते स्थिति । श्रोते वक्ते नित्य देखती । समोर मूर्ति साईंची ॥५९॥
ग्रंथ करिती गुरूस अर्पण । किंवा ब्राम्हाणा करिती दान । त्यांतही आहे दात्याचें कल्याण । शास्त्रप्रमाण ये अर्थीं ॥६०॥
हें काय स्वल्प प्रयोजन । कीं जें शामास बाबांचें नियोगजन । त्वां हें ग्रंथ गृहीं नेऊन । दप्तरीं संरक्षण करावें ॥६१॥
जैसा शामा भक्त नि:सीम । तैसेंच तयावर बाबांचें प्रेम । तयास लावावा कांहीं नियम । उदेला काम साईमनीं ॥६२॥
तंव तो पहा काय करिती । जरी शामाची इच्छा नव्हती । तरी तयावरी अनुग्रह करिती । कवण्या स्थितीं तें परिसा ॥६३॥
एके दिवशीं मशिदीसी । बुवा एक रामदासी । होता नित्यनेम तयासी । रामायणासी वाचावें ॥६४॥
प्रात:काळीं मुखमार्जन । स्नानसंध्या भस्मचर्चन । करोनि भगवें वस्त्र परिधान । अनुष्ठान मांडावें ॥६५॥
विष्णुसहस्रनामावर्तन । मागून अध्यात्मरामायण । पारायणावरी पारायण । श्रद्धापरिपूर्ण चालावें ॥६६॥
ऐसा कितीएक काळ लोटतां । माधवरावांची वेळ येतां । आलें साईसमर्थांचे चित्ता । काय ती वार्ता परिसावी ॥६७॥
फळली माधवरावांची सेवा । लावावा कांहीं नियम जीवा । भक्तिमार्गाचा प्रसाद व्हावा । लाहो विसांवा संसारीं ॥६८॥
ऐसें बाबांचे आलें मनीं । रामदासास जवळ बोलावुनी । म्हणती “पोटांत आली कळ उठुनी । आंतडीं तुटूनि पडत कीं ॥६९॥
जा. ही राही न पोटदुखी । आण कीं सत्वर सोनामुखी । मारिल्याविण थोडीसी फकी । जाई न रुखरुखी पोटाची” ॥७०॥
रामदास बिचारा  भावार्थी । खूण घालूनि ठेविली पोथी । गेला धांवत बाजाराप्रती । आज्ञावर्ती बाबांचा ॥७१॥
रामदास खालीं उतरले । इकडे बाबांनीं काय केलें । तात्काळ आसनावरूनि उठले । जवळ गेले पोथीच्या ॥७२॥
तेथें इतर पोथ्यांत होती । विष्णुसहस्रनामाची पोथी । उचलून बाबांनीं घेतली हातीं । आले मागुती स्वस्थाना ॥७३॥
म्हणती  “शामा ही पोथी कनी । पाहे पहा बहुगुणी । म्हणून देतों तुजलागुनी । ती त्वां वाचूनि पहावी ॥७४॥
एकदां मज उपजली नड । काळीज करूं लगलें धडधड । झाली जीवाची चडफड । दिसे न धडगत माझी मज ॥७५॥
ऐसिया त्या प्रसंगाला । काय सांगूं शामा मी तुजला । या पोथीचा जो उपयोग झाला । हा जीव तरला तिचेनी ॥७६॥
क्षणैक उरीं विसावा दिला । तात्काळ हा जीव गार झाला । अल्लाच वाटे पोटीं उतरला । जीव हा जगला तिचेनी ॥७७॥
म्हणोनि शामा ही तुजला नेईं । ओजें ओजें वाचीत जाईं । रोज एकादें अक्षर घेईं । आनंददायी ही मोठी” ॥७८॥
शामा म्हणे ही मजला नलगे । रामदास मज भरेल रागें । तो म्हणेल मींच त्याचे मागें । कर्म वावुगें हें केलें ॥७९॥
आधींच तो जातीचा पिसाट । माथेफिरू तापट खाष्ट । किमर्थ व्हावी ही कळ फुकट । नको कटकट ही मातें ॥८०॥
शिवाय पोथीची लिपी संस्कृत । माझी वाणी रांगडी कुश्चित । जोडाक्षरही न जिव्हेस उलटत । उच्चार स्पष्ट होई न मज ॥८१॥
पाहूनि बाबांचें कृत्य सकळ । बाबा लाविती वाटलें कळ । बाबांस शामाची केवढी कळकळ । शामास अटकळ नाहीं ती ॥८२॥
“माझा शामा असेल खुळा । परी मजला तयाचा लळा । लोभ लावी जीवा आगळा । तयाचा कळवळा मज मोठा ॥८३॥
ही विष्णुसहस्रनाममाळा । बांधीन स्वहस्तें तयाचे गळां । करीन तया भवदु:खावेगळा । लावीन चाळा वाणीला ॥८४॥
नाम पापाचे पर्वत फोडी । नाम देहाचें बंधन तोडी । नाम दुर्वासनेच्या कोडी । समूळ दवडी लोटुनी ॥८५॥
नाम काळाची मान मोडी । चुकवी जन्ममरणओढी । ऐसिया सहस्रनामाची जोडी । शाम्यास गोडी लागावी ॥८६॥
नाम प्रयत्नें घेतां चोखात । अप्रयत्नेंही नाहीं ओखट  । मुखासि आलें जरी अवचट । प्रभाव प्रकट करील ॥८७॥
नामापरीस सोपें आन । अंत:शुद्धीस नाहीं साधन । नाम जिव्हेचें भूषण । नाम पोषण परमार्था ॥८८॥
नाम घ्यावया नलगे स्नान । नामासि नाहीं विधिविधान । नामें सकळपापनिर्दळण । नाम पावन सर्वदा ॥८९॥
अखंड माझेंही नाम घेतां । बेडा पार होईल तत्त्वतां । नलगे कांहीं इतर साधनता । मोक्ष हाता चढेल ॥९०॥
जया माझे नामाची घोकणी । झालीच तयाचे पापाची धुणी । तो मज गुनियाहूनि गुणी । जया गुणगुणी मन्नामीं” ॥९१॥
हेंच बाबांचें मनोगत । तदनुसार मग ते वर्तत । शामा जरी नको म्हणत । बाबा तें सारीत खिशांत ॥९२॥
वाडवडिलांची पुण्याई सबळ । तेणेंच साईकृपेचें फळ । ऐसें हें सहस्रनाम निर्मळ । प्रपंच - तळमळ वारील ॥९३॥
इतर कर्मां लागे विधि । नाम घ्यावें कधींही निरवधी । तया न अनध्याय प्रदोष बाधी । उपासना साधी नाहीं दुजी ॥९४॥
नाथांनींही येच रीती । एका आपुल्या शेजारियावरती । हेंच सहस्रनाम मारोनि माथीं । परमार्थपंथीं सुदिलें ॥९५॥
नाथांघरीं नित्य पुराण । शेजारी जातीचा ब्राम्हाण । होता स्नानसंध्याविहीन । दुराचरणनिमग्न ॥९६॥
कधीं करीना पुराणश्रवण । वाडयांत पाऊल ठेवीना दुर्जन । नाथ होऊनियां सकरुण । केलें पाचारण तयास ॥९७॥
उंचवर्णीं असोनि जन्म । वायां जातो हें जाणोनि वर्म । नाथांस उपजली कृपा परम । कैसा ह उपरम पावेल ॥९८॥
म्हणोन तयानें नको म्हणतां । सहस्रनामाची दिधली संथा । एकेक श्लोक पढवितां पढवितां । निजोद्धारता लाधला ॥९९॥
या सहस्र नामाचा पाठ । चित्तशुद्धीचा मार्ग धोपट । परंपरागत हा परिपाठ । तेणेंच ही आटाट बाबांना ॥१००॥
तों आले रामदास जलद । घेऊनि सोनामुखी अगद । अण्णा उभेच कळीचे नारद । वृत्तांत साद्यंत कळविला ॥१०१॥
आधींच रामदास आतताई । वरी नारदाची शिष्टाई । मग त्या प्रसंगाची अपूर्वाई । कोण गाईल यथार्थ ॥१०२॥
आधींच रामदास विकल्पमूर्ति । माधवरावांचा संशय चित्तीं । म्हाणे बळकावया माझी पोथी । बाबांनी मध्यस्थी घाताळें ॥१०३॥
सोनामुखीची वार्ता विसरला । माधवरावांवरी घसरला । वृत्तिप्रकोप अनावर झाला । उदंड वरसला वाग्डंबर ॥१०४॥
पोटदुखीचें हें ढोंग सगळें । तुवांच बाबांस उद्युक्त केलें । माझ्या पोथीवर तुझे डोळे । हें न चाले मजपुढें ॥१०५॥
नांवाचा मी रामदास निधडा । पोथी न देतां गुणाधडा । पहा हें मस्तक फोडीन तुजपुढां । घालीन सडा रक्ताचा ॥१०६॥
तुझा माझे पोथीवर डोळा । स्वयेंच रचूनियां कवटाळा । घालिसी सकळ बाबांचे गळां । नामानिराळा राहून ॥१०७॥
माधवराव बहु समजाविती । रामदासा नाहीं शांती । तंव माधवराव सौम्यवृत्तीं । काय वदती तें परिसा ॥१०८॥
मी कपटी हा माझे माथां । मारूं नको रे प्रवाद वृथा । काय तुझ्या त्या पोथीची कथा । नाहीं दुर्मिळता तियेला ॥१०९॥
तुझ्याच पोथीला काय सोनें । किंवा हिरकणी जडली नेणें । बाबांचाही विश्वास जेणें । धरिसी न जिणें धिक् तुझें ॥११०॥
पाहूनि तयाचा अट्टाहास । बाबा मधुर बोलती तयास । “काय बिघडलें रे रामदास । व्यर्थ सायास कां वहासी ॥१११॥
अरे शामा आपलाच पोरगा । तूं कां शिरा ताणिसी उगा । किमर्थ इतका कष्टसी वाउगा । तमाशा जगा दाविशी ॥११२॥
ऐसा कैसा तूं कलहतत्पर । कां न बोलावें मधुरोत्तर । अरे ह्या पोथ्या पढतांही निरंतर । अजूनि अंतर अशुद्ध ॥११३॥
प्रत्यहीं अध्यात्मरामायण पढशी । सहस्रनामाचें आवर्तन करिशी । तरी ही उच्छृंखलवृत्ति न त्यजिसी । आणि म्हणविशी रामदास ॥११४॥
ऐसा कैसा तूं रामदास । तुवां सर्वार्थीं असावें उदास । परी तुटेना पोथीचा सोस । काय या कर्मास सांगावें ॥११५॥
रामदासीं नसावी ममता । सान थोरीं असावी समता । त्या तुझी या पोरासीं विषमता । झोंबसी हाता पोथीस्तव ॥११६॥
जा बैस जाऊन स्थानावरी । पोथ्या मिळतील पैशा पासरी । माणूस मिळेना आकल्पवरी । विचार अंतरीं राखावा ॥११७॥
तुझ्या पोथीची काय महती । शाम्याला त्यांत कैंची गती । उचलली ती म्यांच  आपमतीं । दिधली तयाप्रति मींच ती ॥११८॥
तुला ती तों मुखोद्नत । शाम्यास द्यावी आलें मनांत । वाचील ठेवील आवर्तनांत । कल्याण अत्यंत होईल” ॥११९॥
काय त्या वाणीची रसाळता ॥ मधुरता आणि कनवाळुता । तैसीच स्वानंदजळ - शीतळता । अति अपूर्वता तियेची ॥१२०॥
रामदास उमगला चित्ता । म्हणे माधवरावांस फणफणतां । घेईन बदला पंचरत्नी गीता । हें तुज आतां सांगतों ॥१२१॥
रामदास इतुका निवळला । माधवरावांस आनंद झाला । एकच काय मी दहा तुजला । गीता बदला देईन ॥१२२॥
असो पुढें तो तंटा निवाला । गीताग्रंथ जामीन रहिला । देव गीतेचा ज्यातें न कळला । गीता कशाला तयास ॥१२३॥
साईंसन्मुख अध्यात्मरामायण । पाठावर पाठ करी जो जाण । त्या रामदासें साईंसी तोंड देऊन । करावें भांडण कां ऐसें ॥१२४॥
हें तरी म्यां कैसें वदावें । दोष कोणास कैसे द्यावे । झाले ते प्रकार जरी न व्हावे । महत्त ठसावें कैसेनी ॥१२५॥
इतुका झगडा लाविला ज्यानें । बाबांचेंही घालविलें दुखणें । कल्याण आहे माझें जेणें । अलौकिक देणें साईंचें ॥१२६॥
जरी न होता हा सायास । बसता न माधवरावांचा विश्वास । खरेंच चढतें न अक्षर जिव्हेस । पाठचि तयांस होतें ना ॥१२७॥
ऐसा हा साईनाथ प्रेमळ । खेळिया परमार्थाचा दुर्मिळ । दाबील केव्हां कैसी कळ । करणी अकळ तयाची ॥१२८॥
पुढें शामाची निष्ठा जडली । दीक्षित - नरक्यांहीं संथा दिधली । अक्षर ओळख करून घेतली । पोथी चढली जिव्हेवर ॥१२९॥
असो हा माधवरावांचा वाद । साई शुद्धबोधानुवाद । परमानंदपूर्ण हा विनोद । निर्विवाद सुखदायी ॥१३०॥
तैसेंच ब्रम्हाविद्या  अभ्यास्तिती । तयांची बाबांस मोठी प्रीती प्रसंगोपात्त अभिव्यक्ति । दाविती कैसी अवलोका ॥१३१॥
एकदां जोगांची  आली बंगी । शिरडी पोस्टांत टपालमार्गीं । स्वीकारावया तया जागीं । लागवेगीं निघाले ॥१३२॥
पुस्तक पाहती तों तें भाष्य । लोकमान्यांचें गीतारहस्य । बगलेस मारून मशिदीस । दर्शनास पातले ॥१३३॥
नमस्कारार्थ खालवितां डोई । बंगीही पडली बाबांचे पायीं । “बापूसाब ही कशाची काई” । बाबा ते ठायीं पूसती ॥१३४॥
बंगी मग समक्ष फोडली । कसली काय ती वार्ता कळविली । ग्रंथासह बाबांचे हातीं दिधली । अवलोकिली बाबांनी ॥१३५॥
ग्रंथ काढोनि हातीं घेतला । क्षणार्धांत चाळून पाहिला । खिशांतून एक रुपया काढिला । वरती ठेविला कौतुकें ॥१३६॥
रुपयासह मग तो ग्रंथ । घातला कीं जोगांचे पदरं । म्हणाले हा वाचा साद्यंत । कल्याणप्रद होईल ॥१३७॥
अशा बाबांच्या अनुग्रहकथा । वर्णितां येतील । असंख्याता । ग्रंथ पावेल अति विस्तृतता । म्हणोन संक्षिप्तता । आदरीं ॥१३८॥
एकदां शिरडींत ऐसें झालें । दादासाहेब खापर्डे आले । सहपरिवार तेथें राहिले । प्रेमें रंगले बाबांच्या ॥१३९॥
खापर्डे नव्हेत सामान्य गृहस्थ । आति विद्वान मोठें  प्रस्थ । साईंसन्निध जोडूनि हस्त । पायीं मस्तक खालवीत ॥१४०॥
आंग्लविद्यापारंगत । धारासभेंत कीर्तिमंत । वक्तृत्वें  सर्वांस हालवीत  । मूग ते गिळत साईंपुढें ॥१४१॥
भक्त बाबांचे असंक्यात । परी त्यापाशीं मूकव्रत । खापर्डे - नूलकर - बुट्टींव्यतिरिक्त । धरितां न भक्त आढळला ॥१४२॥
इतर सर्व बाबांशीं बोलत । कांहीं तोंडासी तोंडही देत । नाहीं भीडभाड मुर्वत । मूकव्रत तें यां तिघां ॥१४३॥
बोलण्याचीच काय कथा । बाबांसन्मुख तुकविती माथा । अवर्णनीय तयांची लीनता । श्रवणशालीनताही तैसी ॥१४४॥
विद्यारण्यांची पंचदशी । समजून घ्यावी जयांपाशीं । ते दादासाहेब मूकवृत्तीसी । धरीत मशिदीसी येतांच ॥१४५॥
शब्दब्रम्हाचें कितीही तेज । शुद्धब्रम्हापुढें निस्तेज । साई परब्रम्हामूर्ती सतेज । विद्वत्ते लाज लावी ती ॥१४६॥
चार महिने तयांचा वास । कुटुंब राहिलें सात मास । दिवसेंदिवस उभयतांस । अति उल्हास वाटला ॥१४७॥
कुटुंब मोठें निष्ठावंत । साईपदीं प्रेम अत्यंत । साईंस नित्य नैवेद्य आणीत । मशिदींत स्वहस्ते ॥१४८॥
होई जो न नैवेद्यगरण । बाईस तोंवर उपौष्न महाराजांनीं केलिया सेवन । माणून जेवण बाईचें ॥१४९॥
असो एकदां आली वेळा । बाबा परम भक्तवत्सल बाईची श्रद्धा पहहु अचळ । मार्ग सोञ्ज्वळ दावीत ॥१५०॥
अनेकांच्या अनेक परी । बाबांची तों अगदींच न्यारी । हासतां खेळतां अनुग्रह वितरी । जो द्दढ अंतरीं ठसावे ॥१५१॥
एकदां सांजा - शिरापुरी । भात वरान्न आणि खिरी । सांडगे पापड कोशिंबिरी । बाईनें ताटभरी आणिलें ॥१५२॥
ऐसें तें ताट येतांक्षणीं । बाबा अति उत्कंठित मनीं । कफनीच्या अस्तन्या वरी सारुनी । आसनावरूनी ऊठले ॥१५३॥
जाऊनि बैसले भोजनस्थानीं । घेतलें ताट सन्मुख ओढुनी । वरील आच्छादन बाजूस सारुनी । अन्नसेवनीं उद्युक्त ॥१५४॥
नैवेद्य येती इतरही बहुत । याहून सरस अपरिमित । कित्येक वेळ ते पडून राहत । यावरीच हेत कां इतुका ॥१५५॥
ही तों प्रपंचाची वार्ता । शिवावी कां संतांचे चित्ता । माधवरावजी साईसमर्था । म्हणती ही विषमता कां बरें ॥१५६॥
अवघ्यांचीं ताटें ठेवूनि देतां । कोणाचीं चांदीचींही दूर भिरकावितां । मात्र या बाईचें येतांच उठतां । खाऊं लागतां नवल हें ॥१५७॥
हिचेंच अन्न कां इतुकें गोड । देवा हें आम्हांस मोठें गूढ । काय तरी हें तुझें गारुड । आवडनिवड तुम्हां कां ॥१५८॥
बाबा म्हणती सांगूं काई । काय या अन्नाची अपूर्वाई । पूर्वीं ही एक वाण्याची गाई । दुधाळ लई लठ्ठ असे ॥१५९॥
मग ती कुठें नाहींशी झाली । माळियाकडे जन्मास आली । तीच पुढें क्षत्रियाकडे गेली । पत्नी झाली वाणियाची ॥१६०॥
पुढें ही उपजली ब्राम्हाणापोटीं । बहुता काळानें पडली द्दष्टी । प्रेमाचे दोन घांस पोटीं । सुखसंतुष्टी जाऊं दे ॥१६१॥
ऐसें म्हणूनि यथेष्ट जेवले । मुख आणि हात धुतले । सहज तृप्तीचे ढेकर दिधले । येऊन बैसले गादीवर ॥१६२॥
बाईनें मग करूनि नमन । आरंभिलें साईचरणसंवाहन । बाबांनीं ती संधी साधून । हितगुज सांगून राहिले ॥१६३॥
बाई जयांनीं चरण चूरी । दाबीत ते कर बाबा स्वकरीं । पाहूनि देव - भक्तांची चाकरी । करी मस्करी तंव शामा ॥१६४॥
ठीक चाललें आहे कीं देवा । काय मौजेचा हा देखावा । पाहूनि या परस्परांच्या भावा । वाटे नवलावा अत्यंत ॥१६५॥
पाहोनि तिचा सेवाकाम । प्रसन्न बाबांचें अंतर्याम । हळूच म्हणती ‘राजाराम । राजाराम’ वद वाचे ॥१६६॥
ऐसें म्हणत राहीं नित । सफल होईल आई जीवित । शांत होईल तुझें चित्त । हित अपरिमित पावसील ॥१६७॥
काय त्या वचनाची मात । ह्रदयांतरीं जाऊन खोंचत । वचनयोगेंच शक्तिपात । क्षणार्धांत करीत ॥१६८॥
ऐसा कृपाळू श्रीसमर्थ । प्रणतपाळ साईनाथ । पुरवी नित्य भक्तमनोरथ । साधी निजहित तयांचें ॥१६९॥
अत्यंत हित अति प्रीती । अत्यंत लीन श्रोतयांप्रती । कथितों मी तें धरा चित्तीं । करितों विनंती सलगीची ॥१७०॥
लंपट गुळाचिये गोडी । सांडी न मुंगी तुटतां मुंडी । तैसी द्या साईचरणीं दडी । कृपापरवडी रक्षील तो ॥१७१॥
गुरु - भक्त हे नाहीं वेगळे । दोघेही एकांग आगळे । प्रयत्नें वेगळे करितां बळें । अभिमान गळे कर्त्याचा ॥१७२॥
एकावांचून एक ठेला । कच्चा गुरु तो कच्चाही चेला । परी जो पक्क्या गुरूचा केला । द्वैतीं अबोला तयासी ॥१७३॥
गुरु राही एक्या गावीं । शिष्य तयाचा इतर गांवीं । ऐसें जयाचें मन भावी । ते मानभावी उभयही ॥१७४॥
मुळींच जरी नाहींत दोन । वेगळीक मग ती कुठून । एक न राहे एकावीण । इतुके अनन्य ते दोघे ॥१७५॥
गुरुभक्तांत नाहीं अंतर । ऐसें वास्तव्य निरंतर । गुरुपदावरी भक्तशिर । हाही उपचार स्थूलाचा ॥१७६॥
भक्त अद्वैतभजनपर । गुरुही अद्वैतभक्तपर । ऐसे न मीनतां परस्पर । केवळ तो व्यवहार नांवाचा ॥१७७॥
कैसें लाधेल अन्नाच्छादन । क्षणमात्रही न करा चिंतन । हें तों सर्व प्रारब्धाधीन । प्रयत्नावीण आपाद्य ॥१७८॥
करूं जाल प्रयत्नें संपादन । तरी तो होईल व्यर्थ शीण । प्रयत्नें व्हा परमार्थसंपन्न । चिंतन रात्रंदिन हें करा ॥१७९॥
‘उत्तिष्ठत’ आणि ‘जाग्रत’ । गाढ निद्रेंत पडतां कां घोरत । श्रुतिमाय तारस्वरें गर्जत । प्रेमें जागवीत भक्तांस ॥१८०॥
सर्वानर्थबीजभूत । अविद्यानिद्रेंत जे जे लोळत । तयांनीं वेळीं होऊनि जागृत । गुरुज्ञानामृत सेवावें ॥१८१॥
तदर्थ होऊनि अति विनीत । व्हा गुरुचरणीं शरणागत । तो एक जाणे विइताविहित । आम्ही तों नेणत लेंकुरें ॥१८२॥
साहंकार किंचिज्ज्ञ जीव । निरहंकार सर्वज्ञ शिव । दोघांठायीं अभेदभाव । व्हावया उपाव गुरु एक ॥१८३॥
अविद्योपाधि आत्मा ‘जीव’ । मायोपाधि आत्मा ‘शिव’ । जाणे घालवूं हा भेदभाव । समर्थ गुरुराव एकला ॥१८४॥
मन संकल्पविकल्पाधीन । करा साईपायीं समर्पण । मग तेथून पावे जें स्फुरण । त्याचें अहंपण त्याजवळ ॥१८५॥
तैसीच सकल क्रियाशक्ती । तीही समर्पा साईप्रती । मग तो आज्ञापी जैसिया रीतीं । तैसिये स्थितीं वर्तावें ॥१८६॥
जाणा सकल साईंची सत्ता । भार घालोनि तयांवरता । कार्य करितां निरभिमानता । सिद्धि ये हाता अविकळ ॥१८७॥
परी म्हणाल मी हें करीन । धराल अत्यल्पही अभिमान । फळ येईल तात्काळ दिसोन । विलंब क्षणही न लागेल ॥१८८॥
मायामोह - निशीस । या कुशीचे त्या कुशीस । हेमाड असतां देतां आळस । हरिगुरुकृपेस लाधला ॥१८९॥
तेंही केवळ अद्दष्टवशें । निवाअभ्यास वा सायासें । त्यांनींच केवळ निजोद्देशें । गौरविलें ऐसें वाटतें ॥१९०॥
करावया भक्तोद्धार । करोनि निजचरित्र - निर्धार । बळेंच त्याचा धरोनि कर । ग्रंथ सविस्तर लिहविला ॥१९१॥
अखंडानुसंधान - सूत्र । अनन्यप्रेमपुष्पीं विचित्र । गुंफोनियां हार मनोहर । अर्पूं सादर साईंस ॥१९२॥
मिळवूं स्वराज्यसिंहासन । होऊं स्वपदीं विराजमान । भोगूं स्वानंद निरभिमान । सुखायमान निजांतरीं ॥१९३॥
ऐसें अगाध साईचरित्र ।  पुढील कथा याहून विचित्र । दत्तावधान व्हा क्षणमात्र । श्रवण पवित्र करावया ॥१९४॥
पुढें येईल अध्यायत्रयी । बाबा बैसूनि ठायींचें ठायीं । द्दष्टांताची अपूर्वाई । पहा नवलाई दावितील ॥१९५॥
त्यांतील आरंभींचा अध्याय । लाला लखमीचंदाचा विषय । प्रेमसूत्रें बांधून पाय । दाविला निजठाय तयास ॥१९६॥
बर्‍हाणपुरस्थ बाई एक ।  तिचिया खिचडीलागीं कामुक । होऊनि केलें दर्शनोत्सुक । दाविलें कौतुक प्रेमाचें ॥१९७॥
पुढें मेघाचिया स्वप्नांत । त्रिशूळ काढाया झाला द्दष्टान्त । तयापाठीं अकस्मात । लिंग हो प्राप्त शंकराचें ॥१९८॥
ऐसऐसिया अनेक कथा । तेथून पुढें येतील आतां । भक्तिपूर्वक ऐकतां श्रोतां । श्रवणसार्थकता होईल ॥१९९॥
सैंधव सिंधुनिमज्जन । तैसा हेमाड साईंस शरण । सोहंभावाचें अभिन्नपण । त्या अनन्यपणें करी ॥२००॥
वरी करी प्रेमें विनवण । लागो अहर्निश साईंचे ध्यान । त्यावीण ध्यानीं न रिघो आन । मन सावधान असावें ॥२०१॥
होवो मागील परिहार । पुढील निर्दळून जावा पार । अवशेष जें मध्यंतर । राहो निरंतर गुरुपायीं ॥२०२॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । दीक्षानुग्रहदानं नाम सप्तविंशतितमोऽध्याय: संपूर्ण: ॥
 
 
॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥