॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
भूतभौतिक विषयजात । हें अखिल विश्व निजांतर्गत । दर्पणीं नगरीसें प्रतिबिंबित । मायाविजृंभित मायिक ॥१॥
वस्तुगत्या अनुद्भत । आत्मस्वरूपीं अनुस्यूत । तें हें विश्व स्वरूपीं स्थित । दिसे उद्भूत चराचर” ॥२॥
जें जें कांहीं आरिसां दिसे । तें तें वास्तव तेथें नसे । जैसें वासनामय निद्रेंत आभासे । परी तें नासे प्रबोधीं ॥३॥
जागृदवस्था प्राप्तकाळें । स्वप्नोपलब्ध प्रपंच वितळे । अद्वयानंदप्रकाश विवळे । महावाक्यमेळें सद्नुरूच्या ॥४॥
विश्वाचें जें सत्ता - स्फुरण । तयाचें अन्यनिरपेक्ष अधिष्ठान । तो गुर्वात्मा ईश्वर जैं प्रसन्न । तयींच साक्षात्करण हें ॥५॥
स्वप्रकाश सदात्मक । तें हें आत्मस्वरूप देख । तेथें हें विश्व भूतभौतिक । मायाकौतुक हा खेळ ॥६॥
आब्रम्हास्तंबपर्यत । भूतभौतिक हें सर्व कल्पित । ऐसें हें विस्तारलें जगत । मायाविजृंभित केवळ ॥७॥
सर्प - माला - दंड - धारा । स्वंरूपाज्ञानें मानिती दोरा । तैसाचि हा सकळ जगत्पसारा । स्वरूपीं थारा नाहीं या ॥८॥
हें द्दश्यजात मायामय । तत्त्वज्ञानें यासी लय । गुरुवाक्य - प्रबोधसमय । प्राप्त हो त्या काळीं ॥९॥
तृतीय पुरुष एकवचनी । “गृणाति” रूपार्थ धरितां मनीं । शिष्यास तत्त्वोपदेशदानीं । गुरु एक जनीं समर्थ ॥१०॥
म्हणवूनि प्रार्थूं कीं बाबांप्रत । करावी बुद्धि अंतरासक्त । नित्यानित्यविवेकयुक्त । वैराग्यरत मज करीं ॥११॥
मी तों सदा अविवेकी मूढ । आहें अविद्याव्यवधाननिगूढ । बुद्धि सर्वदा कुतर्कारूढ । तेणेंचि हें गूढ पडलें मज ॥१२॥
गुरुवेदान्तवचनीं भरंवसा । ठेवीन मी अढळ ऐसा । करीं मन जैसा आरसा । निजबोधठसा प्रकटेल ॥१३॥
वरी सद्नुरो साईसमर्था । करवीं या ज्ञानाची अन्वर्थता । विनाअनुभव वाचाविग्लापनता । काय परमार्था साधील ॥१४॥
म्ह्णोनि बाबा आपुल्या प्रभावें । हें ज्ञान अंगें अनुभवावें । सहज सायुज्य पद पावावें । दान हें द्यावें कृपेनें ॥१५॥
तदर्थ देवा सद्नुरुसाई । देहाहंता वाहतों पायीं । आतां येथून तुझें तूं पाहीं । मीपण नाहींच मजमाजीं ॥१६॥
घेईं माझा देहाभिमान । नलगे सुखदु:खाची जाण । इच्छेनुसार निजसूत्रा चालन । देऊनि मन्मन आवरीं ॥१७॥
अथवा माझें जें मीपण । तेंचि स्वयें तूं होऊनि आपण । घेईं सुखदु:खाचें भोक्तेपण । नको विवंचन मज त्याचें ॥१८॥
जय जयाजी पूर्णकामा । जडो तुझियाठायीं प्रेमा । मन हें चंचल मंगलधामा । पावो उपरमा तव पायीं ॥१९॥
तुजवांचूनि दुज कोण । सांगेल आम्हांस हितवचन । करील आमुचें दु:खनिरसन । समाधान मनाचें ॥२०॥
दैव शिरडीचें, म्हणूनि झालें । बाबा तेथें आगमन आपुलें । पुढें तेथेंच वास्तव्य केलें । क्षेत्रत्व आणिलें त्या स्थाना ॥२१॥
धन्य शिरडीचें सुकृत । कीं हा साई कृपावंत । करी या स्थळा भाग्यवंत । अलंकृत निजवास्तव्यें ॥२२॥
तूंचि माझा चेतवित । तूंचि माझी वाचा चालिता । तैं मी कोण तव गुण गाता । कर्ता - करविता तूं एक ॥२३॥
तुझा नित्य समागम । हाचि आम्हां आगम - निगम । तुझें नित्य चरित्रश्रवण । हेंचि पारायण आमुतें ॥२४॥
अनिमेष तुझें नामावर्तन । हेंचि आम्हां कथाकीर्तन । हेंचि आमुचें नित्यानुसंधान । हेंचि समाधान आम्हांतें ॥२५॥
नलगे आम्हां ऐसें सुख । जेणें होऊं भजनविन्मुख । याहूनि अध:पतन तें अधिक । परमार्थबाधक काय असे ॥२६॥
आनंदाश्रू उष्ण जीवन । करूं तेणें चरणक्षालन । शुद्धप्रेम चंदनचर्चन । करवूं परिधान अच्छ्र्द्धा ॥२७॥
हें अंतरंग पूजाविधान । बाम्होपचार पूजेहून । येणें तुज सुप्रसन्न ॥ सुखसंपन्न करूं कीं ॥२८॥
सात्विक अष्टभाव - कमल । अष्टदल अतीव निर्मल । मन करूनि एकाग्र अविकल । वाहू, निजफल संपादूं ॥२९॥
लावूं भावार्थ - बुका भाळा । बांधूं द्दढभक्तीची मेखळा । वाहूं पादांगुष्ठीं गळा । भोगूं सोहला अलोलिक ॥३०॥
प्रीतिरत्नालंकार्मंडण । करूं सर्वस्व निंबलोण । करूं पंचप्राण चामरांदोलन । तापनिवारण तन्मय छत्रें ॥३१॥
समर्पूं ऐसी स्वानंदपूजा । अष्टांग गंध - अर्गजा । ऐसे आम्ही आमुच्या काजा । साईराजा पूजूं तुज ॥३२॥
अभीतिप्सितार्थसिद्धयर्थ । स्मरूं नित्य “साईसमर्थ” । याच मंत्रें साधूं परमार्थ । होऊं कृतार्थ निजनिष्ठा ॥३३॥
पूर्वील अध्यायीं कथन । साईसमर्थ दयाघन । साधावयास निजभक्तकल्याण । कैसें शिक्षण देत ते ॥३४॥
आतां ये अध्यायीं निरूपण । भक्तां स्वगुरुपदीं स्थापन । कवणेपरी करीत जाण । कथाविंदान तें परिसा ॥३५॥
गताध्यायांतीं निदर्शित । भक्तपंतकथामृत । श्रोतां परिसिजे दत्तचित्त । तत्त्व निश्चित व्हावया ॥३६॥
कैसे कैसे अनुभव दाविले । कैसें नेत्रीं निष्ठांजन सूदिलें । कैसें स्वगुरुपदीं अढळ केलें । मन निवालें कैसेनी ॥३७॥
एकदां एक बहुत श्रमें । भक्त एक पंत नामें । गेले शिरडीस मित्रसमागमें । दर्शनकामें साईंच्या ॥३८॥
ते पूर्वील अनुगृहीत । होते निजगुरुपदीं स्थित । शिरडीस जावें किंनिमित्त । झाले शंकित मानसीं ॥३९॥
तथापि जयाचा जैसा योग । तैसा अकल्पित घडतो भोग । आला साईदर्शनाचा ओघ । जाहला अमोघ सुखदायी ॥४०॥
आपण कल्पावी एक योजना । ईश्वराच्या आणीकचि मना । अद्दष्टापुढें कांहीं चालेना । तें स्वस्थ मना परिसिजे ॥४१॥
ठेवूनियां शिरडीचें प्रस्थान । कित्येक जन निजस्थानाहून । निघाले अग्निरथीं बैसून । सकळ मिळून आनंदें ॥४२॥
गाडींत जैं हे चढळे अवचित । तेथेंच होते स्थित हे पंत । शिरडीस जाण्याचा तयांचा बेत । झाला अवगत पंतांस ॥४३॥
मंडळींत कांहीं पंतांचे स्नेही । त्यांतचि कांहीं विहिणी व्याही । पंतांचे मनांत जाणें नसतांही । बळेंच आग्रहीं सांपडले ॥४४॥
आरंभीं पंतांचा विचार । जाणें होतें जेथवर । तिकीटही तयांचें तेथवर । पुढें तो विचार बदलला ॥४५॥
स्नेही व्याही म्हणती चला । जाऊं समवेत कीं शिरडीला । मनीं नसतांही आग्रहाला । होकार दिधला पंतांनीं ॥४६॥
पंत उतरले विरारास । मंडळी गेली मुंबईस । उसने घेऊनि खर्चवयास । पंतही मुंबईस मग गेले ॥४७॥
मोडवेना मित्रांचें मन । मिळविलें निजगुर्वनुमोदन । आले मग ते शिरडीलागून । सकल मिळून आनंदें ॥४८॥
गेले सर्व मशिदीस । सकाळीं अकरांचे समयास । दाटी भक्तांची पूजनास । पाहूनि उल्हास वाटला ॥४९॥
पाहूनि बाबांचें ध्यान । जाहले सकळ आनंदसंपन्न । इतुक्यांत पंतांस झीट येऊन । बेशुद्ध होऊन ते पडले ॥५०॥
पातली जीवास विकलता । पावले सबळ निचेष्टता । सांगातियां उद्भवली चिंता । अति व्यग्रता मानसीं ॥५१॥
मंडळीची मदत मोठी । साईबाबांची कृपाद्दष्टी । करितां मस्तकीं उदकवृष्टी । गेली निचेष्टितता समूळ ॥५२॥
होऊनियां सावधान । उठूनि बैसले खडबडोन । वाटलें जणूं झोंपेंतून । आतांच उठून बैसले ॥५३॥
बाबा पूर्ण अंतर्ज्ञानी । तयांची गुरुपुत्रता जाणुनी । तयांस अभयता आश्वासुनी । निजगुरुभजनीं स्थापिती ॥५४॥
येवो म्हणती प्रसंग कांहीं । “अपना तकिया छोडना नहीं । सदासर्वदा निश्चळ राहीं । अनन्य पाहीं एकत्वीं” ॥५५॥
पंतांना ती पटली खूण । निजगुरूचें जाहलें स्मरण । साईबाबांचें कनवाळूपण । राहिलें स्मरण जन्माचें ॥५६॥
तैसेच एक मुंबापुरस्थ । हरिश्चंद्र नामें गृहस्थ । पुत्र अपस्मारव्यथाग्रस्त । तेणें अति त्रस्त जाहले ॥५७॥
देशी विदेशी वैद्य झाले । कांही एक उपाय न चले । पाहूनि सर्वांचे प्रयत्न हरले । राहतां राहिले साधुसंत ॥५८॥
सन एकोणीसशें दहा सालीं । दासगणूंचीं कीर्तनें झालीं । श्रीसाईनाथांची कीर्ति पसरली । यात्रा वाढली शिरडीची ॥५९॥
कुग्राम परी भाग्यें थोर । शिरडी झाली पंढरपूर । महिमा वाढला अपरंपार । यात्रा अपार लोटली ॥६०॥
रोग घालविती केवळ दर्शनें । अथवा केवळ हस्तस्पर्शनें । अथवा शुद्ध कृपावलोकनें । आले अनेकां अनुभव ॥६१॥
होतां अनन्यशरणागत । कृतकल्याण पावत भक्त । जाणूनि सकळांचें मनोगत । पुरवीत मनोरथ सर्वांचे ॥६२॥
उदीधारणें पिशाचें पळती । आशीर्वचनें पीडा टळती । कृपानिरीक्षणें बाधा चुकती । लोक येती धांवोनि ॥६३॥
ऐसें माहात्म्य कथाकीर्तनीं । दासगणूंच्या ग्रंथांतुनी । ऐकोनियां कर्णोपकर्णीं । उत्कंठा दर्शनीं उदेली ॥६४॥
सवें घेऊनि मुलेंबाळें । नानाविध उपायनें फळें । आले शिरडी ग्रामास पितळे । पूर्वार्जितबळें दर्शना ॥६५॥
मुलास पायांवरी घातलें । स्वयें बाबांस लोटांगणीं आले । तों तेथ एक विपरीत वर्तलें । पितळे गडबडले अत्यंत ॥६६॥
द्दष्टाद्दष्ट साईंची होतां । मुलगा पावला बेशुद्धावस्था । डोळे फिरविले पडला अवचिता । मातापिता गडबडले ॥६७॥
पडिला विसंज्ञ भूमीसी । तोंडासी आली उदंड खरसी । चिंता ओढवली मातापित्यांसी । काय दैवासी करावें ॥६८॥
निघूनि गेला वाटे श्वास । तोंडावाटे चालला फेंस । फुटला घाम सर्वांगास । सरली आस जीविताची ॥६९॥
ऐसे झटके अनेक वेळां । पूर्वीं येऊनि गेले मुलाला । परीन इतुका विलंब झाला । प्रसंगाला एकाही ॥७०॥
हा न भूतो न भविष्यति । यानें आणिली प्राणांतिक गति । मातेच्या डोळां अश्रू न खलती । पाहूनि स्थिति बाळाची ॥७१॥
आलों किमर्थ झालें काय । उपाय तो झाला अपाय । ऐसे घातुक व्हावे हे पाय । व्यर्थ व्यवसाय झाला कीं ॥७२॥
घरांत रिघावें चोराभेणें । तों घरचि अंगावरी कोसळणें । तैसेंचि कीं हें आमुचें येणें । झालें म्हणे ती बाई ॥७३॥
व्याघ्र भक्षील म्हणूनि गाई । जीवभेणें पळूनि जाई । तिजला मार्गांत भेटे कसाई । तैसेंच पाहीं जाहलें ॥७४॥
उन्हांत तापला पांथस्थ । वृक्षच्छायेस जों विसावत । तों वृक्षचि उन्मळूनि पडत । झाली ते गत तयांसी ॥७५॥
भाव ठेवूनि देवावरी । पूजेस जातां देउळाभीतरीं । देऊळचि कोसळे अंगावरी । तैसीच परी हे झाली ॥७६॥
बाबा मग तयां आश्वासिती । “धीर धरावा थोडा चित्तीं । मुलास उचलूनि न्या निगुती । निजावगती तो लाधेल ॥७७॥
मुलास घेऊनि जा बिर्हाडीं । आणीक एक भरतां घडी । सजीव होईल तयाची कुडी । उगीच तांतडी करूं नका” ॥७८॥
असो पुढें तैसें केलें । बोल बाबांचे खरे झाले । पितळे सह्कुटुंब आनंदले । कुतर्क गेले विरोन ॥७९॥
वाडियांत नेतां तो कुमर । तात्काळ आला शुद्धीवर । मातपितयांचा फिटला घोर । आनंद थोर जाहला ॥८०॥
मग पितळे स्रियेसहित । बाबांचिया दर्शना येत । करीत साष्टांग प्रणिपात । अति विनीत होउनी ॥८१॥
उठला पाहूनि आपुला सुत । साभार मानसीं आनंदित । बसले बाबांचे चरण चुरीत । बाबा सस्मित पूसती ॥८२॥
“कां त्या संकल्पविकल्पलहरी । शांत झाल्या कां आतां तरी । ठेवील निष्ठा धरील सबूरी । तयासी श्रीहरी रक्षील” ॥८३॥
पितळे मूळचेच श्रीमंत । घरंदाज लौकिकवंत । मेवामिठाई लुटवीत । बाबास अर्पित फळ पान ॥८४॥
कुटुंब तयांचें फार सात्त्विक । प्रेमळ श्रद्धाळू भाविक । बाबांकडेस लावूनि टक । खांबानिकट बैसतसे ॥८५॥
पहातां पहातां डोळे भरावे । ऐसें तिनें नित्य करावें । पाहूनि तत्प्रेमाचे नवलावे । अत्यंत भुलावें बाबांनीं ॥८६॥
जैसे देव तैसेच संत । भक्तपराधीन ते अत्यंत । अनन्यत्वें तयां जे भजत । कृपावंत तयांवरी ॥८७॥
असो ही मंडळी जावया निघाली । मशिदीस दर्शनार्थ आली । बाबांची अनुज्ञा उदी घेतली । तयारी केली निघावया ॥८८॥
इतुक्यांत बाबा काढिती तीन । रुपये आपुले शिशांतून । पितळ्यांस निकट बोलावून । बोलती वचन तें परिसा ॥८९॥
“बापू तुजला पूर्वीं दोन । दिधलेती म्यां त्यांत हे तीन । ठेवूनि यांचें करीं पूजन । कृतकल्याण होसील” ॥९०॥
पितळे रुपये घेती करीं । प्रसाद जाणोनि आनंदें स्वीकारी । लोटांगणीं येत पायांवरी । म्हणती कृपा करीं महाराजा ॥९१॥
मनीं उदेली विचारलहरी । माझी तों ही प्रथम फेरी । बाबा हें वदती काय तरी । हें मज निर्धारीं कळेना ॥९२॥
बाबांस पूर्वीं नाहीं देखिलें । पूर्वीं दोन कैसे दिधले । अर्थावबोध कांहींच न कळे । विस्मित पितळे मनीं झाले ॥९३॥
कैसी व्हावी परिस्फुटता । वाढली मनाची जिज्ञासुता । बाबा न लागूं देत पत्ता । राहिली मुग्धता तैसीच ॥९४॥
संत सहज उद्नारले जरी । तरी ते वाणी होणार खरी । जाणीव ही पितळ्यांचे अंतरीं । म्हणूनि विचारीं ते पडले ॥९५॥
परी पुढें हे मुंबापुरीं । गेले जेव्हां आपुले घरीं । होती घरांत एक म्हातारी । जिज्ञासा पुरी ती करी ॥९६॥
म्हातारी पितळ्यांची माता । सहज शिरडीचा वृत्तांत पुसतां । निघाली तीन रुपयांची वार्ता । संबंध कथा जुळेना ॥९७॥
विचार करितां स्मरण झालें । मग म्हातारी पितळ्यांस बोले । आतां मज यथार्थ आठवेलें । बाबा बोलले सत्य तें ॥९८॥
आतां त्वां तुझ्या मुलास नेलें । शिरडीस साईंचें दर्शन करविलें । तैसेंच पूर्वीं तुज पित्यानें वहिलें । होतें नेलें अक्कलकोटीं ॥९९॥
तेथील महाराजही सिद्ध । परोपकारी महाप्रसिद्ध । अंतर्ज्ञानी योगी प्रबुद्ध । पिताही शुद्ध आचारणीं ॥१००॥
घेवोनि तव पित्याची पूजा । प्रसन्न झाला योगीराजा । दोन रुपये प्रसादकाजा । दिधले पूजा कराया ॥१०१॥
हेही पूर्वील रुपये दोन । स्वमींनीं बाळा तुजलागोन । दिधले होते प्रसाद म्हणून । पूजनार्चन करावया ॥१०२॥
तुमचें देवदेवतार्चन । त्यांत हे होते रुपये दोन । करीत असत नेमें पूजन । अति निष्ठेनें वडील तुझे ॥१०३॥
तयांची निष्ठा मी एक जाणें । वागत गेले निष्ठेप्रमाणें । तयांच्या पश्चात पूजाउपकरणें । जाहलीं खेळणीं मुलांची ॥१०४॥
निष्ठा उडाली देवांवरची । लाज वाटूं लागली पूजेची । पूजेसी योजना झाली मुलांची । दाद रुपयांची कोण घेई ॥१०५॥
ऐसीं कित्येक वर्षें लोटलीं । रुपयांची त्या बेदाद झाली । आठवणही साफ बुजाली । जोडी हरवली रुपयांची ॥१०६॥
असो तुमचें भाग्य मोठें । साईमिषें महाराजचि भेटे । पुसावया विस्मरणांचीं पुटें । तैसींच संकटें निरसाया ॥१०७॥
तरी आतां येथूनि पुढें । सोडूनि द्यावे तर्क कुडे । पहा आपल्या पूर्वजांकडे । नको वांकडे व्यवहार ॥१०८॥
करीत जा रुपयांचें पूजन । संतप्रसाद माना भूषण । समर्थसाईंनीं ही पटविली खूण । पुनरुज्जीवन भक्तीचें ॥१०९॥
ऐकतां ही मातेची कथा । परमानंद पितळ्यांचे चित्ता । ठसली साईंची व्यापकता । आणि सार्थकता दर्शनाची ॥११०॥
मातेचें तें शब्दामृत । नष्ट भावना करी जागृत । देई पश्चात्ताप - प्रायश्चित्त । भावी हित दर्शवी ॥१११॥
असो होणार होऊनि गेलें । पुढें कार्यार्था संतीं जागविलें । मानूनि तयांचे उपकार भले । सावध राहिले निजकार्या ॥११२॥
ऐसीच एक आणिक प्रचीती । कथितों परियेसा स्वस्थ चित्तीं । भक्तांच्या उच्छृंखल मनोवृत्ती । बाबा आवरिती कैशा तें ॥११३॥
गोपाळ नारायण आंबडेकर । नामें एक भक्तप्रवर । आहे बाबांचा पुणेंकर । परिसा सादर तत्कथा ॥११४॥
आंग्लभौम - सरकारपदरीं । अबकारी-खात्यांत होती नोकरी । दहा वर्षें भरतां पुरीं । बैसले घरीं सोडूनि ॥११५॥
दैव फिरलें झालें पारखें । सर्व दिवस नाहींत सारखे । आले ग्रहदशेचे गरके । कोण फरके न भोगितां ॥११६॥
आरंभीं ठाणें जिल्ह्यांत नोकर । पुढें नशीबीं आलें जव्हार । होते जेथें अम्मलदार । तेथेंच बेकार जाहले ॥११७॥
नोकरी आळवावरचें पाणी । पुनश्च पडावें कैसें ठिकाणीं । प्रयत्नांची शिकस्त त्यांनीं । पाहिली करूनि त्या वेळीं ॥११८॥
परी न आलें तयांही यश । निश्चय ठरला रहावें स्ववश । आपत्तीचा झाला कळस । जाहले हताश सर्वांपरी ॥११९॥
वर्षानुवर्ष खालीं खालीं । सांपत्तिक स्थिति खालावली । आपत्तीवर आपत्ती आली । दु:सह झाली गृहस्थिति ॥१२०॥
ऐसीं गेलीं वर्षें सात । सालोसात शिरडीस जात । बाबांपुढें गार्हाणें गात । लोटांगणीं येत दिनरात्र ॥१२१॥
एकोणीसशॆं सोळा सालांत । वैतागूनि गेले अत्यंत । वाटलें करावा प्राणघात । शिरडी क्षेत्रांत जाऊनि ॥१२२॥
कुटुंबसमवेत या समयास । राहिले शिरडीस दोन मास । काय वर्तलें एके निशीस । तया वार्तेस परियेसा ॥१२३॥
दीक्षितांचे वाडयासमोर । एका बैलाचे गाडीवर । बसले असतां आंबडेकर । चालले विचारतरंग ॥१२४॥
कंटाळले ते जीवितास । वृत्ति झाली अत्यंत उदास । पुरे आतां हा नको त्रास । सोडिली आस जीविताची ॥१२५॥
करूनियां ऐसा विचार । होऊनियां जिवावरी उदार । विहिरींत उडी घालावया तत्पर । आंबडेकर जाहले ॥१२६॥
दुसरें कोणी नाहीं जवळा । साधूनियां ऐसी निवांत वेळा । पुरवीन आपुले मनाचा सोहळा । दु:खावेगळा होईन ॥१२७॥
आत्महत्येचें पाप दुर्धर । तरी हा द्दढ केला विचार । परी बाबा साई सूत्रधार । तेणें हा अविचार टाळिला ॥१२८॥
तेथेंचि चार पावलांवर । एका खाणावळवाल्याचें घर । तयासही बाबांचा आधार । तोही परिचारक बाबांचा ॥१२९॥
सगुण येऊनि उंबर्यावरती । पुसे आंबडेकरांस ते वक्तीं । ही अक्कलकोट महाराजांची पोथी । वाचिली होती का कधीं ॥१३०॥
पाहूं पाहूं काय ती पोथी । म्हणूनि आंबडेकर हातीं घेती । सहज पानें चाळूनि पाहती । वाचूं लागती मध्येंच ॥१३१॥
कर्मधर्मसंयोग कैसा । विषयही वाचावया आला तैसा । अंतर्वृत्तींत वाचण्यासरिसा । उमटला ठसा तात्काळ ॥१३२॥
सहजासहजीं आली जी कथा । निवेदितों मी श्रोतियां समस्तां । तात्पर्यार्थें अति संक्षेपता । ग्रंथविस्तरताभयार्थ ॥१३३॥
अक्कलकोटीं संतवरिष्ठ । असतां महाराज अंतर्निष्ठ । भक्त एक बहु व्याधिष्ट । दु:सह कष्ट पावला ॥१३४॥
सेवा केली बहुत दिन । व्याधिविहीन होईन म्हणून । होईनात ते कष्ट सहन । अति उद्विग्न जाहला ॥१३५॥
करूनि आत्महत्येचा निर्धार । पाहूनियां रात्रीचा प्रहर । जाऊनि एका विहिरीवर । केला शरीरपात तेणें ॥१३६॥
इतुक्यांत महाराज तेथें आले । स्वहस्तूं तयास बाहेर काढिलें । भोक्तृत्व सारें पाहिजे भोगिलें । उपदेशिलें तयास ॥१३७॥
आपुल्या पूर्वकर्माजोग । व्याधि कुष्ठ क्लेश वा रोग । जाहल्यावीण पूर्ण भोग । हत्यायोग काय करी ॥१३८॥
हा भोग राहतां अपुरा । जन्म घ्यावा लागे दुसरा । म्हणूनि तैसेच साहें कष्ट जरा । आत्महत्यारा होऊं नको ॥१३९॥
वाचूनि ही समयोचित कथा । थक्क जाहले आंबडेकर चित्ता । जागींच वरमले अवचिता । बाबांची व्यापकता पाहूनि ॥१४०॥
आंबडेकर मनीं तरकले । पूर्व अद्दष्ट पाहिजे भोगिलें । हेंच योग्य प्रसंगीं सुचविलें । साहस योजिलें न भलें तें ॥१४१॥
जैसी वाचा अशरीरिणी । तैसीच या द्दष्टांताची करणी । हेत जडला साईंचे चरणीं । अघटित घटणी साईंची ॥१४२॥
सगुणमुखें साईंचा इशारा । ह अकल्पित पुस्तकद्वारा । यावया विलंब लागता जरा । होता मातेरा जन्माचा ॥१४३॥
मुकलों असतों निजजीविता । करितों दुर्धर कुटुंबघाता । स्त्रियेवरी ओढवितों अनर्था । स्वार्था परमार्था नागवतों ॥१४४॥
पोथीचें करूनियां निमित्त । बाबांनीं केलें सगुणास प्रवृत्त । आत्मघातापासाव चित्त । परावृत्त केलें कीं ॥१४५॥
प्रकार ऐसा जरी न घडता । बिचारा व्यर्थ जिवास मुकाता । परी जेथें साईंसम तारिता । काय तो मारिता मारील ॥१४६॥
अक्कलकोटस्वामींची भक्ती । या भक्ताचे वडिलांस होती । तीच पुढें चालवा ही प्रचीती । आणूनि देती त्या बाबा ॥१४७॥
असो पुढें बरवें झालें । हेही दिवस निघून गेले । ज्योतिर्विद्येंत परिश्रम केले । फळही आलें उदयाला ॥१४८॥
साईकृपाप्रसाद पावले । पुढें आले दिवस चांगले । ज्योतिर्विद्येंत प्रावीण्य संपादिलें । दैन्य निरसलें पूर्वील ॥१४९॥
वाढलें गुरुपदीं प्रेम । जाहलें सुख कुशल क्षेम । लाधलें गृहसौख्य आराम । आनंद परम पावले ॥१५०॥
ऐसे अगणित चमत्कार । एकाहूनि एक थोर । कथितां होईल ग्रंथविस्तर । तदर्थ सार कथियेलें ॥१५१॥
हेमाड साईपदीं शरण । पुढील अध्यायीं गोड कथन । विष्णुसहस्रनामदान । शामयालागून दीधलें ॥१५२॥
नको नको म्हणतां शामा । बाबांस अनिवार तयांचा प्रेमा । बळेंच देतील सहस्रनामा । सुंदर माहात्म्या वर्णून ॥१५३॥
आतां सादर परिसा ती कथा । अनुग्रहाचा समय येतां । शिष्याची इच्छा मुळींही नसतां । बाबा तो देतां दिसतील ॥१५४॥
अनुग्रहाची अलौकिक परी । कैसी असते सद्नुरुघरीं । दिसूनि येईल अध्यायांपरीं । श्रोतां आदरीं परिसिजे ॥१५५॥
कल्याणाचें जें कल्याण । तो हा साई गुणनिधान । सभाग्य पुण्यश्रवणकीर्तन । चरित्र पावन जयाचें ॥१५६॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । अपस्मारात्महत्यानिवारणं तथा निजगुरुपदस्थिरीकरणं नाम षड्विंशतितमोऽध्याय: संपूर्ण: ॥
॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥