मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. साईबाबा
Written By

श्री साईसच्चरित - उपोद्धात

Sri Sai Satcharita upoddhant marathi
श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीसद्रुरुम्यो नम: ॥
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वर: । गुरु: साक्षात्‌ परब्रम्हा तस्मै श्रीगुरवे नम: ॥१॥
ब्रम्हानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति । द्वंद्वातीतं गगनसद्दशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्‌ ॥
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं । भावातीतं त्रिगुणरहितं सद्नुरुं तं नमामि ॥२॥
 
उपोद्धात
 
श्रीसाईनाथ महाराज सुमारे पन्नास वर्षांपूर्वीं शिरडीस प्रथम आले. शिर्डी हा गांव अहमदनगर जिल्ह्यांत कोपरगांव तालुक्यांत आहे. महाराज मूळ कोठील रहाणारे व त्यांची मातापितरे कोण, याविषयीं खात्रीलापयक माहिती मिळत नाही. एवढें मात्र खचित दिसतें कीं, महाराजांचा मोंगलाईशीं संबंध बराच असावा. महाराजांचे बोलण्यांत शेलू, जालना, माणवद, पाथरी, परभणी, नौरंगाबाद (म्ह० औरंगाबाद), बीड, बेदर या मोंगलाईच्या गांवांचा वारंवार उल्लेख येत असे. एकदां एक पाथरीचा गृहस्थ महाराजांचे दर्शनास आला होता. त्याला महाराजांनीं पाथरीची हकीकत विचारून तेथील बहुतेक ठळक ठळक गृहस्थांचीं नांवें घेऊन त्यांचेविषयीं चौकशी केली. यावरून महाराजांना पाथरीची विशेष माहिती होती असें मानतां येईल; पण त्यांचा जन्म तेथलाच असावा असें खात्रीलायक म्हणतां येत नाहीं.
 
तसेंच, महाराज मूळचे ब्राम्हाण होते, कीं ते जन्मत:च मुसलमान होते हें निश्वयात्मक सांगती येत नाहीं. किंबहुना त्यांच्या कित्येक भक्तांच्या मानण्याप्रमाणें ते ‘अयोनिज’ होते कीं काय हेंहि सांगतां येत नाहीं. महाराजांना अयोनिज मानणें हें भक्तेतरांच्या  द्दष्टीला अशक्य वाटेल, पण तसें प्रस्तुत लेखकाला वाटत नाहीं. या लेखकाजवळ महाराजांनीं स्वत: एकदां असें उद्नार काढले होते कीं, ‘आतां आपण जाऊं ते आठ वर्षांचे होऊन येऊं.’ श्रीकृश्णमूर्ति देवकीमातेजवळ प्रकटली तेव्हां आठ वर्षांचीच होती असें पुराणांतरीं वर्णन आहे. ‘आठा वर्षांची मूर्ती । असंभाव्य पडिली दीप्ति । तेजें दशदिशा उजळती । तेथें लपती शशिसूर्य ॥’ (हरिविजय अ. ३, ओ. १२६). महाराजांचे पुष्कळ भक्त, त्यांना हे साधकाचे सिद्ध झालेले मानीत नसून प्रत्यक्ष अवतार मानतात, व महाराजांच्या लीला व त्यांची अद्भुत शक्ति पाहून त्यांना श्रीकृष्णाचा अवतार मानणारे पुष्कळ आहेत. महाराज मात्र स्वत: आपल्याकडे तो अधिकार घेत नसत. ते बोलतांना आपल्याला परमेश्वराचा सेवक ‘बंदा’ म्हणून घेत. आपल्या गुरूचा आशीर्वाद आपल्याला पूर्ण आहे व त्यांचेच कृपेनें भक्तांचीं संकटें दूर होऊन त्यांचें कल्याण होतें, असें ते म्हणत. भक्तांना आशीर्वाद देतांना प्राय: ‘अल्ला भला करेगा’ हेच शब्द असत. स्वत:कडे कधींहि मोठेपणा घेत नसत. ते कधींहि ‘अनल हक्क’ म्हणजे ‘मीच परमीश्वर’ सें म्हणत नसत. पण त्यांचा उच्चार वारंवार ‘यादे हक्क’ म्हणजे ‘मी परमेश्वराची याद म्हणजे स्मरण करतों’ हा असे.
 
महाराज शिर्डीस आले ते एका मुसलमान गृहस्थाकडील वरीतीबरोबर आले. त्याचें नांव चांदभाई, तो धूपखेडें नांवाच्या गांवचा पाटील होता. एक दिवस त्याचा घोडा चुकला म्हणून त्याला शोधावयाला तो रानांत चालल होता. तों तेथें एका झाडाखालीं त्याला महाराज बसलेले दिसले. महाराजांना त्यानें पूर्वीं कधीं पाहिलें नव्हतें. महाराजानीं त्याला हांक मारली व चिलीम पिऊन जा असें म्हटलें. तो म्हणाला. माझा घोडा चुकला आहे व मी त्याच्या शोधासाठीं निघालों आहें. महाराज म्हणाले, ‘त्यासाठीं लांब कशाला जावयाला पाहिजे ? तो पलीकडच्या कुंपणाच्या आड आहे.’ त्याबरोबर चांदभाई, महाराजांनीं सांगितलेल्या कुंपणाकडे गेला. तों तेथें घोडा खरोखरच चरत होता. चांदभाईनें घोड घेतला व तो महाराजांकडे आला. महाराजांनीं त्याला चिलीम पाजल्यावर तो महाराजांना आपल्या घरीं येण्याबद्दल आग्रह करूं लागला. महाराज म्हणाले, ‘मी उद्यां येईन.’ त्याप्रमाणें महाराज दुसरे दिवशीं त्याचे घरीं गेले. चांदभाईला चिलीम पाजली तेथें रानांत विस्तव नव्हता. महाराजांनीं आपल्या हातांत असलेला चिमटा जमिनीवर आपटून विस्तव उत्पन्न केला व आपलें काम करून घेतलें.
 
महाराज चांदभाईचे घरीं कांहीं दिवस राहिले. नंतर चांदभाईचे बायकोच्या भाच्याची सोयरीक शिर्डीच्या एका मुलीशी झाली व त्या लग्नाचे वरातीबरोबर महाराज शिर्डीस आले. वरात गांवाबाहेर खंडोबाचे देवाजवळ एका मळ्यांत उतरली होती. महाराज खंडोबाचे देवळांत गेले तों तेथें त्यांना म्हाळसापती या नांवाचे गृहस्थ भेटले. हे म्हाळसापती शिर्डीचे राहणारे असून जातीनें दैवज्ञ होते. हे खंडोबाचे भक्त असून खंडेरायाची वारी त्यांच्याकडे कित्येक पिढयांपासून असे. महाराज खंडोबाचे देवळांत गेले तेव्हां कफनी, टोपी व अंगावर धोतर असा पोषाख होता. त्यांना पाहिल्याबरोबर म्हाळसापतींनीं ‘आवो सांईबाबा’ या शब्दांनीं त्यांचें स्वागत केलें, व तेंच नांव म्हणजे ‘सांईबाबा’ महाराजांनी’ अखेरपर्यंत धारण केलें. महाराजांची बहुतेक भक्तमंडळी त्यांना साईबाबा किंवा बाबा असें म्हणत. महाराजांची एकदां एका कामांत कमिशनवर साक्ष झाली. तेव्हां महाराजांना नांव विचारलें असतां ‘मला सांईबाबा म्हणतात’ असें उत्तर दिलें. म्हाळसापती महाराजांना गांवांत घेऊन आले व तेथें त्यांनीं महाराजांची व आपले सोबती काशीराम शिंपी व आप्पा जागले यांची गांठ घालून दिली. हे तिघेहि गांवांत येणार्‍या साधुसंतांची, गोसावी-बैराग्यांची, फकीर-फुकर्‍यांची आपल्या शक्तीप्रमाणें सेवा करीत, व त्यांचा परामर्ष घेत. शिर्डी गांव फार रहदारीचा असल्यामुळें येथें वारंवार अशी मंडळी येत व त्यांची थोडीबहुत संभावना, वर लिहिलेल्या तिघांकडून होत असे. हे तिघेहि (काशीराम, आप्पा व म्हाळसापती) महाराजांचे पूर्ण भक्त बनले. यांपैकीं काशीराम व आप्पा हे पुढें कांहीं वर्षांनी वारले. काशीरामांनीं आधीं देह ठेवला व त्यानंतर कांहीं वर्षांनीं आप्पांनीं देह ठेवला. पण दोघांनाहि मरणसमयीं एकादशी लाभली. हरिभक्तांचें मरण हरिदिनींच होणें योग्य व त्याप्रमाणेंच या दोघांचेंहि झालें. काशीरामांनीं महाराजांची सेवा अति उत्तम तर्‍हेनें म्हणजे खरोखरच तनमनधनानें केली. महाराजांची कफनी पूर्वीं भगवी किंवा पांढरी असे. काशीरामानें हिरवी कफनी व हिरवी टोपी महाराजांना शिवून दिली; पण प्राय; महाराज पांढरीच कफनी घालीत व डोक्यास धोतर बांधीत. तसेंच महाराजांना चिलीम तंबाकू पुरवून त्यांच्या धुनीला सर्पणहि पुरवावयाचें व जरूर पडल्यास पैसेहि द्यावयाचे, हें ब्रत काशीरामांनीं चालविलें. पुढें पुढें तर आपली पैशांची थैलीच महाराजांपुढें ठेवावयाची व महाराजांनीं इच्छेस येईल तितके पैसे घ्यावे अशी विनंती करावयाची. महाराज त्या वेळेस दक्षिणा घेत नंसत, तरी पण काशीरामाकडून पैसा दोन पैसे नेहमीं घेत. महाराजांनीं आपल्याकडून वाईट वाटून डोळ्यांतून अश्रूहि यावयाचे. अशा प्रकारें वाईट सुद्धां परमार्थाला विघातक आहे. कारण त्यांत माझी देण्याची शक्ति आहे अशा तर्‍हेचा अभिमान शिरतो. अर्थांत्‌ भक्तांच्या परमार्थाला विघातक गोष्टी असतील त्या काढून टाकण्याचा देवाचा नित्ससंकल्प असतो. त्याप्रमाणें काशीरामासही झालें. कांहीं दिवसांनीं त्याची पैशांसंबंधानें ओढाताण होऊं लागली, आणि महाराजांनीं त्याच्याजवळ दक्षिणा मागण्याचा सपाटा चालविला. पैसे संपले असें त्याला मोठया कष्टानें म्हणावें लागलें. मग ‘वाण्याजवळ मागून मला आणून दे’ असें महाराजांनीं म्हटलें. त्याप्रमाणें कांहीं दिवस वाण्याकडून मागून आपण्याचा क्रम चालू ठेवला. पुढें वाणीहि पैसे देईनासा झाला. अर्थात्‌ सगळी लीला काशीरामाचा अभिमान दूर करण्यासाठींच होती. त्याची अशी खात्री झाली कीं, आपली देण्याची शक्ति नाहीं, व हें त्याला पटल्याबरोबर त्याची सांपत्तिक स्थिति सुधारत चालली आणि तो पूर्वीप्रमाणें सुखवस्तु झाला. महाराजांनीं आपल्याकडून दक्षिणा नित्य घ्यावी ही तळमळ पार नाहींशी झाली.
 
काशीराम कापड विकण्याचा धंदा करीत असे व निरनिराळ्या गांवीं बाजारचे दिवशीं दुकान घाली. एकदां नाऊरच्या बाजाराहून परत येतांना कांहीं लुटारू भिल्लांशीं त्याची गांठ पडली. काशीराम घोडयावर होता. तिकडे लुटारू प्रथम गेले नाहींत पण त्याच्या बरोबरच्या गाडया रस्त्यानें चालल्या होत्या त्या त्यांनीं अडविल्या. नंतर काशीरामाकडे त्यांचें लक्ष गेल्याबरोबर ते तिकडे धांवून गेले. चोरांनीं काशीरामाला लुटण्याची तयारी केली व त्याप्रमाणें कांहीं सामान घेतलेंहि. त्याला काशीरामानें हरकत केली नाहीं. पुढें त्या चोरांनीं त्याचेजवळ एक लहानशी गांठोडी होती तिला हात घातला. चोरांना वाटलें. त्यांतच कांहीं डबोलें आहे. खरोखरच त्यांत नुसती पिठीसाखर होती. काशीरामाला जानकीदासबाबा या नांवाच्या सत्पुरुषानें मुंग्यांना साखर घालीत जावी असा उपदेश केल्यापासून काशीराम नेहमीं साखर जवळ बाळगीत असे; अर्थात्‌ ती गठडी त्याला अत्यंत प्रिय होती, व काय वाटेल तें होवो पण ती गठडी जाऊं द्यावयाची नाहीं, असा त्यानें निश्चय केला. तितक्यांत त्या चोरांपैकीं एकाची तरवार पडली होती तिकडे काशीरामाचें लक्ष जाऊन त्यानें ती उचलली व त्या चोरांपैकीं दोघांना त्यानें ठार केलें. इतक्यां तिसर्‍या चोरानें मागाहून येऊन कुर्‍हाडीचा घाव त्याचे डोक्यावर घातला. त्याबरोबर काशीराम बेशुद्ध होऊन प्रेतवत्‌ पडला. राहिलेल्या चोरांना काशीरामाचा प्राणान्त झाला असें वाटून ते त्याला तेथेंच टाकून चालते झाले. पण वस्तुत: त्याचा प्राणान्त झाला नव्हता. पुढें कांहीं वेळानें तो शुद्धीवर आला व कांहीं दिवसांनीं बरा झाला. त्याची महाराजावर पूर्ण श्रद्धा असल्यामुळें त्यानें इस्पितळांत जाण्याचें नाकारलें व मला शिर्डीस घेऊन चला असा आग्रह धरला. त्य्राप्रमाणें त्याला तेथें आणलें आणि महाराजांच्या सांगण्यावरून तेथेंच माधवराव देशापांडयांकडून औषधोपचार करविला. अर्थात्‌ महाराजांच्या कृपेनें काशीरामाची प्रकृति चांगली झाली.
 
या शूर कृत्याबद्दल मुंबई सरकारकडून काशीरामास एक तलवार बक्षीस मिळाली. काशीरामाची चोरांशीं झटापट चालली असतांना इकडे शिरडीस महाराजांनीं आकान्त करून सोडला. एकसारख्या शिव्या, बोंबा मारणें व इतर क्षोभाचे प्रकार चालले. जवळ असलेल्या मंडळींनीं ताबडतोब ओळखिलें कीं कोणत्या तरी प्रिय भक्तावर अति महत्संकट आलें आहे; व हा सगळा आकान्त त्या संकटांतून भक्ताला रक्षण करण्यासाठींच आहे आणि तसाच प्रकार झाला. चोर पुष्कळ असून हत्यारबंद होते. त्यांचे तडाक्यांतून काशीरामानें जिवंत सुटणें कोणालाहि शक्य वाटलें नसतें; पण तारणार्‍याचें काय चालतें ? असो. काशीराम यानंतर कांहीं वर्षें वांचला व शके  १८३० च्या चैत्र शुद्ध ११ ला वारला.
 
वर लिहिलेल्या तिघांपैकीं म्हाळसापती बरचे दिवस हयात होते, आणि ते भाद्रपद शेक १८४४ त वारले. त्यांचा व महाराजांचा अति निकट संबंध होता. महाराजांचें बसणें मशिदींत असे व निजणें एक रात्र मशिदींत व एक रात्र चावडींत असे. महाराज मशिदींत निजत त्या रात्री म्हाळसापति उजाडेपर्यंत महारांजवळ बसूना असत, व मधूनमधून दोघांच्या अति प्रेमाच्या गोष्टी चालत. म्हाळसापतींचें देहावसान होईपर्यंत त्यांचा एक दिव्स आड मशिदींत रात्रभर बसण्याचा क्रम चालू असे. हे चांगले अधिकारी असून पूर्ण निरपेक्ष असत व यांचेपासून महाराजांचे भक्तांना बोध व आनंद नित्य मिळत असे; किंबहुना महाराजांच्या पश्चात्‌ त्यांच्या भक्तांना हें एक विश्रांतिस्थानच होतें.
 
महाराज येथें आल्यापासून प्राय: येथील मशिदींत वास करूं लागले. ती मशीद त्या वेळेला अगदीं पडक्या स्थितींत असे. महाराज दिवसा इकडे तिकडे जात, पण रात्रीं मशिदींतच राहात. कोणीं जेवावयास नेलें तर जात; लोकांस औषधपाणी सांगत व देत. त्यासाठीं कधींहि पैसा घेत नसत. इतकेंच नव्हे, पण रोग्यांची शुश्रूषा योग्य होत नसली तर स्वत: आपण जाऊन करीत व अशा तर्‍हेनें  महाराजांनीं ज्यांना औषधोपचार केला व ज्यांची शुश्रूषा केली अशी पुष्कळ मंडळी अजून येथें आहेत. पुढें औषधपाणी देण्याचें महाराजांनीं बंद केलें व नुसती उदी म्हणजे अंगारा देऊं लागले. पूर्वीहि अंगारा देत असत व त्यापासून लोकांना गुण येई.
 
आपण पूर्वी लोकांना औषधपाणी करीत होतों, अशाविषयीं उल्लेख महाराजांनीं एकदां प्रस्तुत लेखकाजवळ केला होता. ते म्हणाले. “ काका, (प्रस्तुत लेखकाला ते काका म्हणून हांक मारीत.) मी पूर्वीं लोकांना औषधदेत असें. पुढें औषध देणें सोडलें आणि ‘हरि हरि’ करूं लागलों आणि हरि हरि करतां करतां हरि भेटला.”
 
महाराज येथें प्रथम आले तेव्हां येथें एक देवीदास नांवाचे साधु असत व त्यांचेकडे निरनिराळे साधु निरनिराळे वेळीं येत. तसेंच रामेश्वर, पंढरपूर व इतर दक्षिणेकडील क्षेत्रांना पायवाटेनें जाणार्‍या यात्रेकरूंचा हा रस्ताच असल्यामुळें पुष्कळ सत्पुरुषांचे पाय येथें वेळोवेळीं लागत. त्यांपैकीं एक जानकीदास नांवाचे साधु येथें बरेच दिवस होते. ते उत्तम अधिकारी होते असें सांगतात. त्यांची व महाराजांची फार बैठक असे. तसेंच सुप्रसिद्ध गंगागीरबाबाहि येथें येत असत. महाराज येथें आल्यानंतर जेव्हां गंगागीर येथें प्रथम आले, तेव्हां महाराज दोन हातांत दोन मातीच्या घागरी विहिरीवरून भरून नेत होते. त्यांना पाहिल्याबरोबर गंगागीरबाबा जवळ असलेल्या गांवकरी मंडळींना म्हणाले, ‘ही मूर्ति येथें कधीं आली ? हें केवळ रत्न आहे. यांची योग्यता फारच मोठी आहे. गांवचें फार मोठें भाग्य कीं, हें रत्न तुम्हांला लाभलें.’ नंतर गंगागरिबाबा महाराजांचे दर्शनास गेले व दोघांच्या मोठया प्रेमाच्या गोष्टी झाल्या. असेच उद्नार महाराजांसंबंधानें अक्कलकोटच्या आनंदनाथमहाराजांनीं काढले होते. हे आनंदनाथमहाराज अक्कलकोटच्या सुप्रसिद्ध स्वामींचे शिष्य होते. ते येवल्याजवळ सावरगांव येथें एकदां गेले असतां शिर्डीचे माधवराव बळवंत देशपांडे, दगडू भाऊ गायके, नंदराम शिवराम मारवाडी व भागचंद मारवाडी, त्यांचे दर्शनास गेले होते. दर्शन झाल्यावर ही मंडळी शिर्डीस यावयाला निघाली, तों आनंदनाथमहाराज एकाएकीं धांवत येउण त्यांचे गाडींत बसले व म्हणाले, मी तुमच्याबरोबर येतों. नेवरगांवाच्या व येवल्याच्या मंडळींनीं य अमहाराजंना अडविण्याचा प्रयत्न केला पण तो व्यर्थ गेला. आनंदनाथमहाराज तेथें आले तेव्हां त्यांनीं महाराजांसंबंधानें शब्द काढले ते असे, “हा हिरा आहे. याची खरी किंमत तुम्हांला नाहीं. हा जरी उकिरडयावर असला तरी प्रत्यक्ष हिरा आहे, हें घ्यानांत ठेवा.” या वेळीं महाराज प्रसिद्धीस आले नव्हते व गांवांतले लोक त्यांना एक साधारण किंबहुना वेडा फकीर मानीत.
 
महाराजांची स्थिति या वेळेला “फाटकें तुटकें नेसतो रे । मन मानेल तेथें बसतो रे । वेडया वेडयापरि दिसतो रे । परी ब्रम्हांड गिळुनी असतो रे ॥” अशी होती. महाराज कधीं ओढयावर जाऊन बसत; कधीं गांवकुसाजवळ असलेल्या एका लिंबाखालीं बसत, कधीं कोणाच्या मळ्यांत जाऊन बसत; अंगावरील कपडे फाटके असत, कधीं कधीं उग्ररूप धारण करीत. या व अशाच वर्तनामुळें साधारण जनसमाजाला ते वेडेच वाटत. पण लौकरच लोकंचा भ्रम दूर झाला व महाराजांची योग्यता शिर्डीच्या लोकांना कळून आली. तो प्रकार असा घडून आला :---
 
महाराजांना मशिदींत व देवळांतूनहि पुष्कळ दिवे लावण्याची हौस असे. अर्थात्‌ ‘हौस असे’ हें व्यावहारिक द्दष्टीचें बोलणें आहे. खरोभर पाहिलें तर त्यांचें करणें कोणतीच हौस पुरविण्याकरितां नसे. (कारण त्यांना हौस अशी उरलीच नव्हती.) तर त्यांत कांहीं तरी अन्य हेतु म्हणजे लोकांचे हित करण्याचाच असावयाचा. असो. या दिव्यांसाठीं महाराज तेली व वाणी यांचे घरोघर जाऊन तेल मागून आणीत. कांहीं दिवस त्यांनीं महाराजांना तेल दिलें. अर्थात्‌ तीं व्यावहारिक माणसें किती दिवस तेल देणार ? त्यांनीं एक दिवस महाराजांना तेल नाहीं म्हणून सांगितलें. त्यामुळें महाराजांच्या नित्यक्रमांत थोडाच फरक पडणार होता ! महाराजांनीं पणत्यांमध्यें तेलाऐवजीं पाणी घातलें आणि नेहमींप्रमाणें काकडे घालून काडी ओढून ते पेटविले. महाराज ही तयारी करीत असतांना लोकांना त्यांच्या वेडेपणाविषयीं खात्री वाटूं लागली; पण जेव्हां काडी ओढून काकडयांस लावल्याबरोबर ते पेटले व रात्रभर जळत राहिले, तेव्हां अर्थातच लोक थक्क झाले. ते महाराजांना शरण गेले व महाराजांची अवहेलना केल्याबद्दल क्षमा मागूं लागले. कित्येकांनीं तर महाराजांना निरनिराळ्या तर्‍हेनें थोडें थोडें छळलें होतें. ते तर फारच घाबरले. पण महाराज पूर्ण दयाळू, अपकार करणार्‍यांची सुद्धां उपेक्षा करावयाची नाहीं तर त्यांच्यावरहि उपकारच करावयाचा हें महाराजांचें ब्रीद ! तेव्हां अर्थातच कोणालाहि  भिण्याचें कारण नव्हतें. सर्व लोकांवर महाराजांचें प्रेम असून त्यांचें पुत्रवत्‌ प्रतिपालन महाराज करीत. गांवावर कोणतेंहि संकट यावयाचें असलें कीं महाराजांनीं त्याची आगाऊ सूचना द्यावयाची व महारजांचे सांगण्याप्रमाणें जे वागत ते निर्भय होत.
 
सगळ्या गांवची जरी महारजांवर श्रद्धा बसली, तरी महाराजांशीं निकट संबंध फारच थोडया लोकांचा असे. महाराजांच्या प्रखर वृत्तीमुळें त्यांच्याशीं फाजील सलगी करण्याची कोणाची हिंमत होत नसे; आणि मशिर्दीत लोकांचें जाणें-येणें फार कमी असे. या वेळेला येथील देशापांडे घराण्यापैकीं माधवराव बळवंत यांचे जाणें-येणें विशेष होऊं लागलें. मशिदीच्या आवाराला लागूनच एक लहानसें घर होतें, तेथें त्या वेळीं मराठी शाळा असे. त्या शाळेंत माधवराव हे मास्तर होते व त्यानीं वेळोवेळी शाळेंतून मशिदींत जाण्याचा पाठ पाडला. तेथें गेले म्हणजे चिलीम भरून आपण ओढावयाची आणि महाराजांना ओढावयाला द्यावयाची. कोणत्या कारणानें कां होईना, माधवरावांची महाराजांशीं सलगी होऊं छागली आणि माधवरावांचें मन महाराज आकर्षण करूं लागले. कांहीं वर्षांनीं मधवरावांनीं सर्व धंदे सोडून केवळ महाराजांची व त्यांचे दर्शनास येणार्‍या मंडळीची सेवा हाच एक धंदा पत्करला. या सेवेबद्दल मोबदला म्हणून माधवरावांनीं कधींहि मागितला नाहीं. अजूनहि यांचा आणि महाराजांच्या भक्तांचा निकट संबंध आहे आणि त्यांचा पुष्कळ मंडळींना आधार वाटतो; व कित्येक भक्त तर अधिक उणें कांहीं निघाल्यास माधवरावांचे सल्लयाशिवाय पुढें पाऊल टाकीत नाहींत.
 
महाराज शिर्डी सोडून बहुतकरून कोठें जात नसत. मात्र कधीं कधीं निमगांवास बाबासाहेब डेंगळे या नांवाचे महाराजांचे भक्त असत तिकडे जात व कधीं राहत्यास चंद्रभानशेट मारवाडी यांचेकडे जात. चंद्रभानशेट वारल्यावर त्यांचे दुकानाचा कारभार खुशालचंदशेट पाहात असत. या खुशालचंदजींना महाराज वारंवार बोलावणें धाडीत व कोणी राहात्याचा माणूस आला कीं त्याला खुशालचंद्र भेटला होता का, म्हणून विचारीत. असो.
 
बाबासाहेब डेंगळे यांचे बंधु नानासाहेब डेंगळे जाळी-निमगांव येथें राहात असत. त्यांना मुलगा नव्हता. प्रथम कुटुंबास मुलगा होईना म्हणून दुसरें लग्न केलें; तरीसुद्धां कांहीं उपयोग झाला नाहीं. मग बाबासाहेबांनीं त्यांना महाराजांचे दर्शनास पाठविलें. महाराजांचे दर्शनास नानासाहेब डेंगळे आले तेव्हां महाराजांनीं मुलगा होईल असा आशीर्वाद दिला व योग्य वेळीं तो आशीर्वाद फलद्रूप होऊन त्यांना मुलगा झाला. अर्थातच त्यामुळें नानसाहेबांची श्रद्धा महाराजांवर बसली व ते महाराजांकडे वारंवार येऊं लागले. त्याचें सरकारी कामगारांशीं बरेंच दळणवळण असल्यामुळें त्यांनीं साहजिकच महाराजांचे गुण कामगार मंडळी जवळ गाइले आणि त्यामुळें लवकरच कलेक्टराचे चिटणीस रा. चिदंबर केशव ऊर्फ अण्णासाहेब गाडगीळ कांहीं मडळींना घेऊन महाराजांचे दर्शनास आले. अण्णासाहेब गाडगिळांची महाराजांवरील श्रद्धा उत्तरोत्तर वाढत जाऊन ते महाराजांचे पूर्ण भक्त बनले.
 
महाराज ज्या मशिदींत बसत व निजत, ती पूर्ण मोडकळीस आलेली असून खालीं धुरळा अतिशय, व वरूनहि माती पडावयाची अशी स्थिति असल्यामुळें नानसाहेब डेंगळ्यांनीं महाराजांना एक जाड फळी निजण्यासाठीं म्हणून आणून दिली. त्यांचा हेतु हा कीं, महाराजांनीं नुसत्या जमिनीवर न निजतां ती फळी खालीं टाकून तिच्यावर निजावें. महाराजांनीं त्य फळीचा उपयोग निजण्यासाठीं केला, पण प्रकार निराळा केला. ती फळी जमिनीवर न टांकतां ती मशिदीच्या आढयाला जुन्या चिंध्या बांधून टांगली व तिच्यावर निजूं लागले. त्या चिंध्यांकडे पाहिलें तर फळीचें सुद्धां ओझें सहन करण्यासारख्या त्या नव्हात्या. पण महाराजांच्या प्रभावामुळें त्या फळीचेंच काय, पण महाराजांच्या शरीराचेंहि ओझें त्या सहन करूं लागल्या. निजतांना चार बाजूंना चार जळत्या पणत्या महाराज ठेवीत. त्या फळीवर महाजांना पांहाण्याचें ज्याला त्याला मोठें कौतुक वाटे व पुष्कळ मंडळी लाब उभे राहून तें कौतुक पाहात; मात्र महाराजांना फळीवर चढतांना किंवा उतरतांना कोणीं पाहिलें नाहीं. पुष्कळदां मंडळींनीं पाळती ठेविल्या पण महाराजांचें चढणें-उतरणें कोणालाहि दिसलें नाहीं. वरील कौतुक पाहाण्यासाठीं मंडळी फर जमूं लागली, तेव्हां ही उपाधी दूर होण्यासाठीं महाराजांनीं ती फळी एके दिवशीं तोडून टाकली.
 
नानासाहेब डेंगळे ज्या कारणासाठीं महाराजांचे दर्शनास प्रथम आले, त्याच कारणासाठीं कोपरगांवचे मुलकी सर्कल इन्स्पेक्टर गोपाळराव गुंड हेहि दर्शनास आले. यांना तीन कुटुंबें असून मुलगा नव्हता. यांनाहि महाराजांचे आशीर्वादानें मुलगा झाला. हेहि महाराजांचे पूर्ण भक्त बनले. त्यांच्या मनांत एकादां असें आलें कीं, मधीद मोडकळीस आली आहे. ती आपण फिरून बांधवावी; व त्यासाठी त्यांनीं बरेचसे दगड गोळ केले. पण महाराजांनीं.त्यांना मशीद बांधण्याची परवानगी दिली नाहीं. तें काम दुसर्‍या एका भक्ताकडून करवून घ्यावयाचें होतें. ती हकीकत पुढें दिली आहे. गोपाळरावांनीं जमविलेल्या दगडांचा विनियोग महाराजांच्याच आज्ञेनें तेथील शनीचें देऊळ बांधण्यांत व गांवांतील दुसर्‍या देवळांचा जीर्णीद्धार  करण्यांत झाला. महाराजांचें सर्व देवळांकडे लक्ष असे. येथील मारुतीच्या देवळाचाहि महारांनींच जीर्णोद्धार करविला व तें देऊळ मोठेंहि करविलें. जसें गांवांतील देवळांकडे महाराजांचें लक्ष असे. तसेंच येथील तुरबतीकडे सुद्धां महाराजांचें लक्ष असे. गांवकुसाजवळील निंबाच्या झाडाखालीं महाराज कधीं कधीं बसत म्हणून वर सांगितलें आहे. तेथेंच एक पीराची तुरबत आहे असें महाराजांनीं एकदां म्हटलें व तेथें खणून पाहिलें तों तेथें खरोखरच तुरबत निघाली. मग त्या दिवशीं मंडळळींनीं महाराजांची वाजत गाजत मिरवणूक काढली. या तुरबतीबद्दलचा उल्लेख महाराजांनीं प्रस्तुत लेखकाजवळहि केला होता. महाराज म्हणाले, ही आपल्या वडिलांची जागा आहे. येथें दर गुरूवारीं व शुक्रवारीं ऊद जाळीत जावा म्हणजे त्यांत आपलेंच कल्याण आहे. एकदां गोपाळराव गुंडांच्या मनांत असें आलें कीं, येथें महाराजांप्रीत्यर्थ वार्षिक जत्रा ऊर्फ उरूस भरवावा. तो विचार त्यानें गांवांतील तात्या पाटील, दादा कोते पाटील, माधवराव देशपांडे वगैरे वगैरे मंडळींपुढें ठेवला व त्यांना तो रुचून त्यांनीं त्यासाठीं जमवाजमव करण्याचें मनावर घेतलें. पण तेथें तेव्हां असलेल्या कुळ्कर्ण्याकडून आडकाठी झाली व तिचा परिणाम हा झाला कीं, कलेक्टरानें जत्रा भरवूं नये म्हणून हुकूम दिला. पण जत्रा भरविण्यासंबंधानें महाराजांचा आशीर्वाद पूर्ण होता. म्हणून वरील मंडळींनीं फिरून कलेक्टराकडे अर्ज करून, पहिला हुकूम रद्द ‘करवून जत्रा भरविण्याचा हुकूम आणला. ती जत्रा महाराजांच्या आज्ञेनें रामनवमीला भरवावयाचें ठरलें, व तेव्हांपासून ती सूरू झाली ती अजूनहि दर रामनवमीला भरत असते.
 
या जत्रेची व्यवस्था पहिल्यापासून शिर्डी येथील तात्या गणपती पाटील कोते हे पाहात असतात. त्यांच्यावर महाराजांचें अत्यंत प्रेम असे. हे महाराजांना ‘मामा’ म्हणत. यांची आई सौ. बायजाबाई यांनीं महाराजांची फार सेवा केली आणि ती अशा वेळेला कीं, जेव्हां गांवांतील बहुजनसमाज महाराजांना वेडयांत काढी. महाराज पूर्वी दिवसांतून चारपांच वेळां गांवांत भिक्षेल जात. पण सौ. बायजाबाईंनीं त्यांना कधींहि विन्मुख लाविलें नाहीं. अर्थात्‌ या सेवेचें फळ बाईंना तर मिळालेंच, पण त्यांच्या सर्व कुटुंबाला व विशेषत: तात्यांना मिळालें. तात्यांना महाराज पैसे देत इतकेंच नव्हे, तर त्यांचे सर्व तर्‍हेनें लाड करीत. संध्याकाळीं रोज तात्या हे महाराजांकडे जात त्या वेळचा मामा-भाच्यांचा प्रेमाचा सोहळा पाहाण्यासारखा व प्रेमाचीं भाषणें ऐकण्यासारखीं असत. तसेंच मशिदींतील व चावडींतील सर्व व्यवस्था तात्यांकडेच असे. तात्यांनीं येऊन उठविल्याशिवाय महाराज उठत नसत; व तात्यांनीं महाराजांना हातीं धरून नेऊन तेथें महाराजांसाठीं आसन घालावयाचें व त्यावर महाराजांनीं बसावयाचें असा क्रम असे. चिलीमहि तात्यांनींच भरून द्यावयाची.
 
रामनवमीच्या जत्रेच्या वेळीं म्हणजे खुद्द रामनवमीचेच दिवशीं दोन मोठया निशाणांची थाटाची मिरवणूक निघून मशिदींत जात असे; व तेथें तीं दोन निशाणें दोन टोंकांना बांधलीं जात. त्यांपैकीं एक निशाण रा. शंकरराव रघुनाथ देशापांडे ऊर्फ नानासाहेब निमोणकर यांजकडून येत असे, व दुसरें नगरचे दामूशेट कासार यांचेकडून येत असे. नानासाहेब निमोणकर हे निमोणचे देशपांडे होते. निमोण गांव संगमनेर तालुक्यांत आहे. नानसाहेब तालुक्यांत पुढारी गृहस्थांमध्यें मोडत असून सरकारनें त्यांना ऑनररी मँजिस्ट्रेट नेमिलें होतें व तें काम त्यांनीं पुष्कळ वर्षें केलें. शेवटीं वृद्धापकाळ झाला म्हणून तें स्यांनीं सोडलें. त्यांचे चुलते येथें राहात असत व ते कधीं कधीं येथें येत. येथें आले म्हणजे चुलत्याचे सांगण्यावरून महाराजांचे दर्शनास जात. हळू हळू महाराजांवर त्यांची श्रद्धा वाढत चालली आणि शेवटलीं तीन वर्षें तर त्यांनीं महाराजांच्या अखंड सेवेंतच घातलीं. फक्त स्नानसंध्यादि नित्य कर्म उरकण्यापुरते घरीं जात. बाकी सारा वेळ महाराजांचे सेवेंत तत्पर असत. साठी उलटून गेली होती, तरी महाराजांची सेवा करतांना आळस किंबा विश्रांतीची इच्छाहि कधीं त्यांना शिवली नाहीं. महाराज त्यांना ‘काका’ म्हणून हांक मारीत. महाराजांच्या पश्चात्‌ हे फार दिवस राहिले नाहींत. लौकरच त्यांना महाराजांनीं आपल्या पायापाशीं नेलें. महाराजांचे कृपेनें त्यांचा अंत उत्तम झाला. शेवटचे तीन दिवस त्यांना जिकडे तिकडे महाराज दिसत, व जो जवळ येई त्याला सांईबाबा (महाराजांना ‘बाबा’ म्हणत तें वर सांगितलेंच आहे) म्हणत. स्वत:च्या कुटुंबालाहि “या सांईबाबा” असें म्हणत. कुटुंबाला वाटलें. त्यांना कांहीं भ्रम झाला असेल आणि म्हणून कुटुंबानें म्हटलें, “मी बाबा नव्हे, मी आपली पत्नी आहें.” त्यावर ते म्हणाले, “तुझ्यांत कोण, बाबाच आहेत. तूं बाबाच आहेस.” अशा तर्‍हेनें महाराजांचे अखंड स्मरणांत त्यांचा अंत झाला.
 
रामनवमीचे वेळीं दुसरें निशाण येतें तें दामोदर सावळाराम ऊर्फ दामूशेट कासाराचें हे वर सांगितलेंच आहे. यांना दोन कुटुंबें असून एकापासूनहि पुत्रसंतति नव्हती व त्यामुळें ते फार खत करीत असत. त्यांना एकदां माधवराव देशापांडयांचे सासरे रा. गोविंदाराव सापकर यांनीं येथें येऊन महाराजांचा आशीर्वाद घ्यावा असें सुचविलें. त्याप्रमाणें ते आले. महाराजांनीं आशीर्वाद दिला व त्या आशीर्वादाप्रमाणें त्यांना मुलगा झाला. अर्थात्‌ त्यांची निष्ठा महाराजांवर बसली; व तेव्हांपासून रामनवमीला नवीन निशाण आणावयाचें व त्या दिवशीं येथें फकीर जमले असतील त्या सगळ्यांना जेवूं घालावयाचें हा नेम त्यांनीं धरला: व तो त्यांचा नेम अजून चालू आहे.
 
रामनवमीची जत्रा सुरू होण्याचे पूर्वीं कांहीं वर्षें महाराजांनीं एका निष्काम भक्ताला आपल्याकडे ओढून घेतलें होतें. ते भक्त म्हणजे रा. नारायण गोविंद ऊर्फ नानासाहेब चांदोरकर. हे कल्याणचे राहाणारे असून त्या वेळेला नगरच्या कलेक्टरचे चिटणीस होते. यांना एके दिवशीं येथील कुळकर्णी रा. केशव अनंत ऊर्फ आप्पा यांनीं सांगितलें कीं, आपल्याला महाराजांनीं बोलाविलें आहे. नामासाहेबांना हें आप्पांचें बोलणे प्रथम खरें वाटलें नाहीं, व त्यांनीं त्याला म्हटलें; उगीच महाराजांचें नांव कशाला सांगतोस ? तुझें माझ्याशीं कांहीं काम असेल तर तसें स्पष्ट सांग. त्यावर आप्पानें खरोखर महाराजांनीं बोंलावलें आहे असें निश्चयानें सांगितल्यावरून नानसाहेब महाराजांचे दर्शनास आले व लौकरच त्यांची श्रद्धा महाराजांवर बसली. मग ते तेथें वारंवार येऊन महाराजांच्या बोधामृताचा लाभ घेऊं लागले. महाराजांच्या व त्यांच्या तासच्या तास बैठकी होत. “तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया । उपदेक्ष्यंति तेऽज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिन: ॥” या श्रीभगवदुक्तीप्रमाणें नानासाहेबांचे प्रणिपात, परिप्रश्न व सेवा असत आणि महाराज त्यांना उपदेश करीत. एकदां तर याच श्लोकाचें विवेचन महाराज सुमारें एक तास करीत होते. त्या विवेचनावरून नानासाहेबांची खात्री झाली कीं, महाराजांना संस्कृत उत्तम येत असलें पाहिजे. नानासाहेबांनीं महारजांची सेवा अति उत्तम केली. त्यांत विशेषत: दोन गोष्टींमुळें तर ते महाराजांच्या भक्तांना चिरस्मरणीय राहातील. एक तर महाराजांची जुनी मशीद होती ती त्यांनीं मोडून फिरून बांधली व मोठी केली. ननासाहेबांना हें काम स्वत: करून घेण्याला सवड नव्हती, म्हणून त्यांचे विनंतीवरून नानासाहेब निमोणकरांनीं येथें राहून स्वत: देखरेख करण्याचें पत्करलें व तें काम त्यांनीं उत्तम तर्‍हेनें पार पडलें. मशीद बांधण्याला महाराजांची परवानगी म्हाळसापतींचे द्वारें मागितली व ती महाराजांनीं दिली. तरी पण काम चालू असतांना महाराजांनीं वेळोवेळीं काम पाडून ट