बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By

Ashadh Deep Amavasya 2023 दिव्यांच्या अवसेला या प्रकारे पूजा आणि कथा करा

Ashadh Deep Amavasya 2023
Ashadh Deep Amavasya 2023 दिव्याची अमावास्या म्हणजेच आषाढ महिन्यातील अमावास्या होय. आषाढ अमावस्येचा दिवस हा दीप अमावस्या म्हणून साजरी करण्याची प्रथा आहे.
 
दीप अमावस्या 2023 तारीख, तिथी वेळ Deep Amavasya 2023 Date timing
यंदा 16 जुलै रोजी रात्री 10:06 मिनिटांनी अमावस्येची तिथी सुरु होत आहे. तर सूर्योदय तिथी म्हणून आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्या ही 17 जुलै रोजी साजरी केली जाई. 17 जुलै 2023 रोजी अर्धरात्रौ 12 वाजता अमावस्या संपत आहे.
 
यंदा आषाढ अमावस्या सोमवारी आल्याने दीप अमावस्या सोमवती अमावस्या सुद्धा असल्याने ही अमावस्या खास आहे. महादेवाच्या उपासनेसाठही हा दिवस श्रेष्ठ असेल.
 
दीप अमावस्या पूजा पद्धत Deep Amavasya Puja Vidhi
दीप अमावस्येला घरातील दिवे स्वच्छ करून एकत्र मांडतात.
या दिवशी घरातले सर्व दिवे, कंदिल, निरांजने, समया वगैरे स्वच्छ करतात.
दिव्यांभोवती रांगोळी घालून ते प्रज्वलित करतात.
त्यांची पूजा करतात. पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात
‘‘दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्‌| गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥’’
अर्थ:
‘‘हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजा मध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.’’.
दीपपूजन केल्याने घरात धन धान्य व लक्ष्मीचा वास राहतो अशी श्रद्धा आहे.
या दिवशी कणकेचे गूळ घालून केलेले उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली दिंडे पक्वान्न म्हणून खातात.
अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात ठेवून तो देवापुढे ठेवतात.
आषाढ महिन्यातील अमावस्येला काही ठिकाणी पितृ तर्पण दिलं जातं.
या दिवशी पितरांना तर्पण देऊन पुरणाचा नैवेद्य दाखवतात.
पितरांच्या स्मरणार्थ दीप प्रज्ज्वलित करतात.
अमावस्येला हा विधी केल्याने पितरांन मुक्ती मिळते असे मानले जाते.
त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते आयुरारोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती यामुळे होते, असं धार्मिक ग्रंथात सांगितले आहे.
 
पूर्वीच्या काळी विद्युत दिवे नसल्याने पावसाळयात घरात जास्त अंधार होतो अशात घरातील दिवे सुस्थितीत असावे, त्यांची देखभाल केली जावी म्हणून ही रीत पाळली जात असावी. अशात अमावास्येच्या रात्री प्रकाशाचे विशेष महत्त्व असते कारण त्या काळात अंधारी रात्रीसाठी कृत्रिम प्रकाशाची पुरेशी सोय नव्हती.
दीप अमावस्या व्रत कथा Deep Amvasya Vrat Katha
तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी दोन मुले होती. लहानपणीच दोघांनी असं ठरविले की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या. पुढे गौरीला तीन मुली व विनीताला तीन मुले झाली. गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते. गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती. परंतु विनीताचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला. भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या दोन मुलींची लग्न श्रीमंतांच्या घरात केली. नंतर सगुणेचा विचार करू लागली. गौरीने (आईने) भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुणेला वाईट वाटले. तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरविले. गौरी तिच्यावर संतापली. परंतु तिने हेका सोडला नाही. लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली. गरिबीतच संसार सांभाळू लागली. एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्यांची रत्नजडीत अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली. अंगठी घेऊन घार सगुणेच्या घराच्या छपरावर येऊन बसली. ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच टाकून उडून गेली. नंतर ती सगुणेला मिळाली. ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली. राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे तर माग, असे सांगितले. सगुणेने मागितले की, ‘फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसर्‍या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नयेत असा हुकूम काढा.’’ राजाने तसे केले. मग शुक्रवारी सगुणेने सर्व घरभर दिवे लावले. तिने उपवास केला. राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते. आपल्या दोन्ही दिरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणार्‍या सवाष्ण बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणार्‍या बाईकडून परत येणार नाही, अशी शपथ घाल. त्याप्रमाणे त्यांनी केले. अशारितीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अवदसा घरातून निघून गेली. या घटनेमुळे सगुणेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य खूप झाले. राज्यातले लोक सगुणेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले. अशी ही कथा दीप अमावास्येसाठी सांगितली आहे.