मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Updated : सोमवार, 18 ऑगस्ट 2025 (08:04 IST)

Shravan 2025 : श्रावण सोमवारी शिवामूठ कशी व्हावी, पद्धत जाणून घ्या

Shivamuth 2025 dates vrat vidhi and mantra
श्रावण महिन्यातील दर सोमवारी शंकराच्या देवळात जाऊन पूजा करावी. निराहार उपवास करावा किंवा नक्त व्रत करावे. यामुळे महादेव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात.
 
शिवामूठ व्रत
विवाहानंतर पहिली पाच वर्षे श्रावण सोमवारी शिवामूठ व्रत केलं जातं. श्रावण मासात येणार्‍या चार सोमवारी 4 प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केले जातात. 
 
व्रत करण्याची पद्धत
विवाहानंतरची पहिली पाच वर्षे क्रमवार हे व्रत केलं जातं. यात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एकभुक्त राहून शिवलिंगाची पूजा करावी. प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस आणि सातू (पाचवा सोमवार आल्यास) या धान्याच्या पाच मुठी देवावर वाहाव्या.
 
यात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एकभुक्त राहून महादेवाला बेलाची पाने, तांदूळ, सुपारी, गन्ध, फूल वाहून पूजा करावी. आणि या क्रमाने धान्याच्या एक-एक मूठ देवावर वाहव्या. धान्यमूठ उभी धरून वाहावी. या मुठी वाहताना पुढील मंत्र म्हणावा-
 
नमः शिवाय शांताय पंचवक्‍त्राय शूलिने ।
शृंगिभृंगिमहाकालगणयुक्ताय शंभवे।।
 
किंवा "शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या ईच्छा पूर्ण कर रे देवा" असे तीन वेळा म्हणावे.
प्रथम सोमवारी तांदूळ
दुसर्‍या सोमवारी पांढरे तीळ
तिसर्‍या सोमवारी मूग
चौथ्या सोमवारी जवस
आणि पाचवा सोमवार आल्यास सातू अर्पित करावे.
 
दिवसभर उपास करावा व संध्याकाळी देवाला बेल वाहून उपास सोडावा. पाच वर्षांनंतर या व्रताचे उद्यापन करावे. यथाविधी शिवलिंगाची पूजा करावी. नंतर ब्राह्मणांना तसेच आप्तेष्टांना यथाशक्ती भोजन, भेटवस्तू, दक्षिणा देऊन व्रताची सांगता करावी.
Edited By - Priya Dixit