रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Updated : मंगळवार, 17 ऑगस्ट 2021 (08:04 IST)

मंगळागौरी संपूर्ण पूजा विधी, पूजा साहित्य, आरती आणि कथा

मंगळागौर श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रियांनी लग्नानंतर पहिली पाच वर्षे करावयाचे असते. यासाठी अशाच अर्थात लग्नाला पाच वर्ष पूर्ण न झालेल्या किमान पाच नवविवाहितांनाही बोलावून एकत्र पूजा केली जाते. नंतर रात्री जागरण करतात.
 
पूजा साहित्य:
या पूजेसाठी अन्नपूर्णा देवीची मूर्ती, नित्य पूजेचं साहित्य, बुक्का, अक्षता, 5 खारका, 5 सुपार्‍या, 5 बदाम, 4 खोबर्‍याच्या वाटया, सोळा प्रकारची पत्री, दोन वस्त्र, आठ वाती, कापूर, गुलाल, बेल, फुले, दुर्वा, सोळा काडवाती, तुळशीची पाने, केळी, पंचामृत, नैवेद्यासाठी दूध, जानवे, सोळा विडयाची पाने, गणपतीसाठी सुपारी, अत्तर, केवड्याचे कणीस, एक नारळ, कापड, हळद-कुंकू इतर साहित्याची गरज असते.
 
पत्रीपूजा:
वेगवेगळ्या झाडांच्या पत्री व फुले वापरली जातात तसंच पूजा करताना 16 प्रकारच्या पत्री वहाव्यात.
 
अर्जुनसादडा, आघाडा, कण्हेर, चमेली, जाई, डाळिंब, डोरली, तुळस, दुर्वा, धोत्रा, बेल, बोर, माका, मोगरा, रुई, विष्णुक्रांता, शमी, शेवंती अशा झाडांची पत्री पूजेला वापरली जातात. या पूजेच्या निमित्ताने सर्व प्रकारच्या औषधी झाडांची ओळख व्हावी म्हणून ही पद्धत असावी.
 
नवविवाहित स्त्रिया या दिवशी सकाळी स्नान करून, सोवळे नेसून पूजेला बसतात. मंगळागौर म्हणजे लग्नात अन्नपूर्णाची धातूची मूर्ती मांडण्यात येते. शेजारी महादेवाची पिंडही ठेवतात. भटजींना बोलावून मंगळागौरीची षोडषोपचारपूजा करतात. पूजेनंतर पिठाच्या किंवा पुरणाच्या दिव्यांनी आरती करुन सर्वजणी एकत्र बसून मंगळागौरीची कहाणी वाचतात. नंतर पूजेसाठी आलेल्या सवाष्णींचे भोजन होते. शक्यतो मुक्याने जेवायचे असते. जेवणानंतर तुळशीचे पान खातात. या सवाष्णींना काही वस्तूंचे वाण दिलं जातं.
 
नवविवाहित मुली श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीचे पूजन करत 'गौरी गौरी सौभाग्य दे ' अशी प्रार्थना करतात. सामूहिकरीत्या ही पूजा केली जाते. ज्या घरी मंगळागौरीची पूजा करतात तेथे संध्याकाळी महिलांना हळदी कुंकवासाठी बोलावतात. हळद-कुंकू, विडयाची पाने, सुपारी व हातावर साखर देतात. सवाष्णींची गव्हाने ओटी भरतात. रात्री फराळाचे जिन्नस करतात. रात्री पुन्हा मंगळागौरीची आरती करतात.
मंगळागौरीची आरती
ओवाळू आरतीला मंगळागौरी तुजला ।
सौभाग्या देई आम्हा हिच विनंती तुला ॥ धृ. ॥
 
श्रावण मंगळवारी जमु सगळ्या आम्ही नारी ॥
अर्पूवसन जरतारी तुजला बहुत प्रकारी ।
माला या सुमनांच्या अर्पूनी पुजनाला ॥ १ ॥
 
षोडस परीची पत्री ठेवुनी या सत्पात्री ।
आनंदे आम्ही युवती वाहू तुज अति प्रिती ।
स्विकारी पुजेला वंदीत तव चरणा ॥ २ ॥
 
वंदन करितो तुजला भक्तीने आम्ही बाला ।
दावीन सन्मार्गाला यास्तव नमू चरणाला ।
अज्ञानी आम्ही बाला तारिया सकला ॥ ३ ॥
 
प्रार्थी सुशी तभया ही चीर सौभाग्या देई ।
मागत नच तव काहीं ह्यावीण अंबाबाई प्रेमाने परिसावे हिच विनंती तुला ॥ ४ ॥
 
मंगळागौरीच्या वेळी खेळण्यात येणारे खेळ
वटवाघूळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी, आगोटापागोटा, साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा, घोडा हाट, करवंटी झिम्मा, टिपऱ्या, गोफ, सासू-सून भांडण, अडवळ घुम पडवळ घुम, सवतीचे भांडण, दिंड, घोडा - इत्यादी. असे साधारणतः ११० प्रकारचे खेळ यात खेळले जातात.यात सुमारे २१ प्रकारच्या फुगड्या, ६ प्रकार आगोटा पागोट्याचे असतात.
 
या सर्व खेळ प्रकारांमुळे शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम होतो हा हे खेळ खेळण्याचा मुख्य उपयोग सांगता येईल. पूर्वीच्या काळी केवळ घरातील कामे करणा-या महिलांना या खेळातून आनंदही मिळे. हे खेळ खेळताना महिला त्याजोडीने गाणीही म्हणतात.