सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Updated : मंगळवार, 28 जुलै 2020 (11:39 IST)

माहेरवाशीण

बघता बघता आला की श्रावण 
श्रावणात तसेच मन प्रफुल्ल असते ..... आवडणारा पाऊसही हवा तसा बरसतो एकेका थेंबाने येणारी शिरशिरी गात्रांना सुखावून जाते .....
खळखळ वाहणार्याव पाण्याची ओढ अंतरातल्या उर्मिला उधाण आणते, वाहणाऱ्या पाण्यालाहि मग अनोळखी वाटांना भेट द्यावीशी वाटते .वाट फुटेल तिकडे सैरावैरा पळणारे पाणी सर्वांना चिंब भिजवते ........
हिरवे हिरवे अंकुर मग टवटवीत होऊन डोलू लागतात
ताठ माना करून कोवळी पानं उंच उंच झेपावू  पाहतात 
मंद धुंदवणारा  पारिजातही ओलेत्या सृष्टीला फुलांनी सजवतो .....टपटप पडणाऱ्या फुलांनी जमीन पांढऱ्या केशरी रंगाने झाकली जाते .....
हलकेच पाणी झटकून एक एक फुल वेचताना सुवास धुंद करतो 
ओंजळ भरून फुले उचलली की मनाला तृप्त त्याची जाणीव होते 
हळूच कुठेतरी आरतीचा आणि घंटीच्या किणकिणाटाचा आवाज कानी येतो ......
आणि माहेरवाशिणीचे मन भानावर येते.....
पटापट परडीभर फुले वेचून, पत्री तोडून, मंगळागौरीच्या पूजेसाठी नेली जातात 
देवालाही त्या सृष्टीचा फुलांच्या कोमलतेचा, पत्रीच्या हिरवाईचा मोह व्हावा अशी आरास केली जाऊन सजावट होते  ..... घंटानाद तीव्र  होत होत पूजा संपते आणि प्रसादाचा दरवळ सगळीकडे पसरतो लहानथोर सर्व हात पुढे सरसावतात 
प्रसादाची मुद अलगद उदरात सामावते ........आणि जिव्हा रसना जागृत होते 
वेगवेगळ्या खमंग वासाने भूक आणिकच खवळते 
......... हिरवेकंच केळीचे पान, पहिल्या वाफेचा पांढरा भात, 
पिवळीधम्मक वरण, साजुक तुपाची धार, पक्वान्ने आणि 
पानातली डावी उजवी बाजू परिपूर्णतेने नटलेली पान पाहताक्षणी मन सुखावते 
उदराग्नि शांत होतो 
सगळे मोठे जराशाने लवंडतात, तर सान मात्र परसदारीच्या मोठ्या झाडाला बांधलेल्या झोपाळ्याकडे वळतात....
झोका आकाशात नेण्याची जणू स्पर्धाच सुरू होते .....
परकराचे ओचे करून केसातला गजरा सांभाळत ...पायाने रेटा देत झोका उंच-उंच नेला जातो 
हातावर रंगलेली मेंदी असते 
प्रत्येकीचे रंग नव्याने न्याहाळले जातात .............
तिकडे जमलेल्या सगळ्या माहेरवाशिणी शांततेने तृप्ततेने थोड्या सैलावतात..... 
थोडीशी नवलाई असते ना त्याची देवाण घेवाण होते 
मग संध्याकाळी आरतीची  तयारी आणि नंतरचे खेळ, जागरण याचे बेत ठरू लागतात 
माहेरी आल्याचा आनंद मात्र मनात मावेना असतो  
सततच चेहर्याचवरच्या हावभावात डोकावत असतो 
जिवलगा पासून दूर असण्याची हुरहूरही कुठेतरी लपलेली असते...... 
जिवाभावाच्या सख्या मात्र आता 
कधीतरी भेटणाऱ्या झाल्याने त्यांच्यात खूप आनंद वाटतो 
ओल्या शेंगा भाजलेल्या कणसांचा खमंग वास 
आणि आटीव दुधाचे पेले भरत जागरणाची तयारी सुरू होते 
आणि नंतर सुरु होतो तो एकेक खेळ .......हळूहळू रात्रीचे प्रहर लोटतात .....खेळही आता टिपेला पोहोचलेला ,पण थकण्याची जाणीव करून देणारा झालेला असतो 

कुठेतरी थोडेसे उजाडते न उजाडते तोच .....
गौरी विसर्जनाची तयारी सुरू होते ........आणि माहेरवाशिणींना मग मात्र आपल्या घराची ओढ लागते. 
माहेरची आस मनात ठेवून जड पावलाने मग ती सासरची वाट धरते.. 
साथीला असतो ना तोच पुन्हा धुंद करत  .....सोबत करणारा हवाहवासा पाऊस ..............
आता तीच सृष्टी कुंद वातावरणात भारावलेली वाटते..... जडवलेली वाटते 
कारण मन भरून आलेले असते 
ओल्या वाटा हळूच अश्रुचा ओलेपणा सामावून घेतात आणि माहेरचा प्राजक्ता गंध गाठीशी बांधून घेतात........
सासरची वेस येईपर्यंत ती पुन्हा भानावर येते .......घरची ओढ मनात दाटलेली असते 
नव्या हुरहुरीने आसुसल्या मनाने 
ती आपल्या घरी परतते 
आपल्या घराकडून .....आपल्या घराकडचा .......हा प्रवास प्रत्येकच माहेरवाशिणीला माहित असणारा ......
पण प्रत्येकवेळी नवीन अनुभव देणारा असतो ....
यात मात्र काही शंका नाही........
- माधवी...