बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: न्यूयॉर्क , शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017 (12:18 IST)

अमेरिकन ओपनमध्ये शारापोव्हा, व्हीनस, मुगुरुझा तिसऱ्या फेरीत

माजी विम्बल्डन विजेती मारिया शारापोव्हा, माजी विजेती व्हीनस विल्यम्स आणि ग्रॅंड स्लॅम विजेती गार्बिन मुगुरुझा या प्रमुख मानांकितांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर वेगवेगळ्या शैलीत मात करताना अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीत तिसरी फेरी गाठली. तसेच 13वी मानांकित पेट्रा क्‍विटोव्हा, 18वी मानांकित कॅरोलिन गार्सिया, 16वी मानांकित ऍनेस्तेशिया सेवास्तोव्हा आणि 31वी मानांकित मॅग्दालेना रिबारिकोव्हा या मानांकितांनीही चमकदार विजयांसह तिसरी फेरी गाठली.
 
मात्र पाचवी मानांकित कॅरोलिन वोझ्नियाकी, 11वी मानांकित डॉमिनिका सिबुल्कोव्हा, 22वी मानांकित शुआई पेंग आणि 29वी मानांकित मिरजाना ल्युकिक बॅरोनी या मानांकितांचे आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले. एकेटेरिना माकारोव्हाने वोझ्नियाकीला 6-2, 7-8, 6-1 असे चकित केले. तर स्लोन स्टीफन्सने सिबुल्कोव्हावर 6-2, 5-7, 6-3 अशी झुंजार मात केली. डोना वेकिकने शुआई पेंगला 6-0, 6-2 असे चकित करीत आगेकूच केली.
 
मारिया शारापोव्हाला सलग दुसऱ्या फेरीत तीन सेटपर्यंत झुंज द्यावी लागली. पहिल्याच फेरीत द्वितीय मानांकित सिमोना हालेपला पराभूत करणाऱ्या शारापोव्हानो तिमिया बाबोलसवर 6-7, 6-4, 6-1 अशी मात केली. तर व्हीनसने ओसीन डॉडिनला 7-5, 6-4 असे पराभूत केले. मुगुरुझाने यिंग यिंग दुआनचा 6-4, 6-0 असा फडशा पाडला. तर पेट्रा क्‍विटोव्हाने ऍलिझ कॉर्नेटचा 6-1, 6-2 असा धुव्वा उडवीत तिसरी फेरी गाटली.
 
त्याआधी सहावा मानांकित डॉमिनिक थिएम, सातवा मानांकित ग्रिगोर दिमित्रोव्ह, नववा मानांकित डेव्हिड गॉफिन, 15वा मानांकित टॉमस बर्डिच या प्रमुख मानांकितांनी चमकदार विजयाची नोंद करताना पुरुष एकेरीत विजयी सलामी दिली. तर चतुर्थ मानांकित एलिना स्विटोलिना, आठवी मानांकित स्वेतलाना कुझ्नेत्सोव्हा, 10वी मानांकित ऍग्नेस्का रॅडवान्स्का, 17वी मानांकित एलेना व्हेस्निना, विसावी मानांकित कोको वान्डेवाघे आणि 25वी मानांकित दारिया गाव्हरिलोव्हा या मानांकितांनीही आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना नमविताना महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.