- जान्हवी मुळे
ती अजून अठरा वर्षांचीही नाही आणि तिची बारावीची परीक्षाही व्हायची आहे. पण एवढ्या लहान वयातच आदिती स्वामीनं तिरंदाजीचं विश्व गाजवलं आहे.
ऑगस्ट 2023 मध्ये आदिती तिरंदाजीच्या कंपाऊंड प्रकारात वर्ल्ड चॅम्पियन बनली. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय आणि कुठल्याही खेळातली भारताची सर्वांत तरूण वर्ल्ड चॅम्पियनही ठरली.
या कामगिरीसाठीच आदितीला 9 जानेवारी 2024 रोजी दिल्लीत राष्ट्रपती भवनात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी अर्जुन पुरस्कारानं सन्मानित केलं.
“हे तिनं आजवर केलेल्या संघर्षाचं फळ आहे. सुरुवातीपासूनच आदितीनं स्वप्न पाहिलं होतं की मी एक दिवस अर्जुन पुरस्कार मिळवेनच. तो दिवस आज आला आहे,” या सोहळ्यानंतर आदितीच्या वडिलांनी, गोपीचंद स्वामी यांनी, बीबीसी मराठीशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
खरंतर आदितीला मिळणारा पुरस्कार स्वीकारण्यासाठी गोपीचंद दिल्लीत आले, तेव्हा त्यांनी फॉर्मल कपडे आणले नव्हते, याच्या बातम्या काही ठिकाणी प्रसिद्ध झाल्या.
गोपीचंद त्याविषयी सांगतात, “काय झालं, आम्ही गडबडीत आलो तिकडून. नेमकं कसा सोहळा आहे, याचा अंदाज नव्हता. आपल्याकडे साताऱ्याला काही सूट वगैरे घालत नाही. इकडे बघितलं तर सगळेजण सूटबूटात. मी आपलं साधं चप्पल, शर्ट पँट घालून आलो होतो. मग चांगलं नाही दिसणार, म्हणून इथे बाजारात गेलो आणि कपडे घेतले. तर त्याची बातमीच लागली.“
“आदितीची आई म्हणते, तुम्ही लग्नात तरी एवढे भारी कपडे घेतले होते का?”
मुलीच्या लग्नात सगळेच कपडे घेतात पण मुलीच्या पुरस्कारासाठी कपडे घेण्याचा आनंद गोपीचंद यांच्या आवाजात झळकतो.
ते सांगतात, “हा आनंद वेगळाच आहे, हा आनंद शब्दांत सांगूच शकत नाही.”
साताऱ्याची लेक तिरंदाजीची जगज्जेती
गोपीचंद पेशानं शिक्षक आणि आदितीची आई शैला ग्रामसेवक आहेत. त्यांचं मूळ गाव शेरेवाडी साताऱ्यापासून साधारण पंधरा किलोमीटरवर.
गोपीचंद यांना खेळाची पहिल्यापासून आवड होती पण फारशी संधी मिळाली नाही. मग आपल्या मुलीनं अभ्यासाबरोबर खेळायला हवं हा त्यांचा आग्रह होता. आदिती साधारण दहा वर्षांची असताना वडिलांसोबत साताऱ्यातल्या शाहू स्टेडियममध्ये गेली.
तिथे तिरंदाजी प्रशिक्षक प्रवीण सावंत तिरंदाजीचा सराव करून घेत होते. आदितीला हा खेळ आवडला आणि तेव्हापासून सरांनी तिला मार्दर्शन करायला सुरुवात केली.
गोपीचंद सांगतात, “सुरुवातीला आर्थिक ताणापेक्षा आमची धावपळच प्रचंड व्हायची. आमचं आटपायचं, तिचं आटपायचं. तिला वेळेत ग्राऊंडवर सोडायचं. आमच्या नोकरीच्या वेळा सांभाळायच्या. शाळा सुटली की परत ग्राऊंडला न्यायचं, परत घरी यायचं, अशी कसरतीचे दिवस असायचे.”
आदितीचा खेळ पाहून प्रवीण सरांनी तिला चांगलं धनुष्य घेण्याच सांगितलं. त्यावेळी गोपीचंद यांनी कर्ज काढलं.
“धनुष्याची किंमत अडीच-तीन लाख, त्यामुळे कर्जाशिवाय पर्यायच नव्हता. सुरुवातीला तिची उंची वाढली की धनुष्य बदलावं लागलं. तेव्हा पुन्हा कर्ज काढावी लागली. बाण तुटायचे, त्याची किंमतही जास्त असायची. एकावेळी बारा बाणांचा सेट घ्यावा लागयचा.
“आदिती चांगली खेळतेय म्हटल्यावर आम्ही विचार नाही केला. पालक म्हणून तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं ठरवलं. आमचं काही कमी झालं, तरी तिला खेळात कमी पडू द्यायची नाही कुठलीच गोष्ट.”
त्यावेळी लोकांना आर्चरी किंवा तिरंदाजीचा खेळही फारसा माहिती नव्हता. मुलीला हे असं काही का शिकवताय, असा प्रश्नही लोकांनी गोपीचंद आणि शैला यांना विचारला.
“लोक बोलायचे, कशाला उगाच तीरकामठ्याचा खेळ, डोळ्यात बिळ्यात गेलं तर? मुलींना कशाला हे शिकवणं बरोबर आहे का? तुम्ही शिक्षक आहात तुमची मुलगी डॉक्टर इंजिनियर व्हायला पाहिजे तर इकडे खेळात कशाला? शाळा बुडते तिची. असंही बोलायचे.
“ती एकटी कशी बाहेर स्पर्धेला जाणार, तुम्हाला तिची काळजी आहे का नाही, असंही विचारायचे.
“पण आम्ही ठरवलं होतं, आपण लोकांचं या कानानं ऐकायचं, या कानानं सोडून द्यायचं आणि आपल्या कामावर लागायचं. आता तेच लोक अभिनंदन करतात, कौतुक करतात की तुमचा निर्णय खूपच बरोबर होता.
आदितीच्या कष्टांना आता फळ लागलं आहे.
2023 मध्ये तिनं आधी तिनं युवा जागतिक तिरंदाजीतही सुवर्ण पदक पटकावलं. मग जागतिक तिरंदाजी स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवलं.
दोन्ही स्पर्धांमध्ये तिनं सांघिक सुवर्णपदकं मिळवली होती तर एशियाडमध्येही सांघिक सुवर्ण आणि वैयक्तिक कांस्य पदक मिळवलं.
खरं तर ऑलिंपिकमध्ये कंपाऊंड तिरंदाजीचा समावेश नाहीये, पण आदितीनं बजावलेली कामगिरी देशात तिरंदाजीला आणि महिला खेळाडूंना अत्यंत आवश्यक असलेलं नवं बळ देणारी ठरलीआहे.
आदितीच्या यशानं तिचे प्रशिक्षक प्रवीण सावंत यांनाही अतिशय आनंद झाला आहे.
अगदी प्रतिकूल परिस्थितीतही प्रवीण सावंत यांनी खेळावरचं प्रेम जागं ठेवलं आणि साताऱ्यात दृष्टी तिरंदाजी अकादमी सुरू केली. ऊसाच्या शेतातच इथल्या मुलांचा तिरंदाजीचा सराव चालायचा.
आज त्यातली आदितीच नाही, तर ओजस देवतळेलाही अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. मूळचा नागपूरच्या असलेल्या ओजसनं 2023 च्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कंपाऊंड तिरंदाजीचं सुवर्णपदक जिंकलं होतं.
“ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. एकाच अकादमीतली दोघंजणं एकाच वेळी अर्जुन पुरस्कार जिंकतात, याचा किती आनंद वाटतो मी सांगू शकणार नाही,” प्रवीण सांगतात.
भविष्यातही आदिती आणि ओजसनं असंच यश मिळवत राहावं अशी आशा त्यांना वाटते.