बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017 (10:31 IST)

रामकुमारची विजयी सलामी, युकीचे आव्हान संपुष्टात

भारताचा युवा खेळाडू रामकुमार रामानथनने अमेरिकेच्या सेकू बांगोरावर सरळ सेटमध्ये मात करताना कोलंबस चॅलेंजर टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीत विजयी सलामी दिली. परंतु भारताचा अव्वल पुरुष खेळाडू युकी भांब्रीला जोस फर्नांडेझविरुद्धचा पहिल्या फेरीचा सामना दुखापतीमुळे सोडून द्यावा लागल्यामुळे त्याचे आव्हान सलामीलाच संपुष्टात आले.
 
या स्पर्धेत द्वितीय मानांकन देण्यात आलेल्या रामकुमार रामनाथनने अमेरिकेच्या सेकू बांगोराचे आव्हान 7-6, 6-4 असे सरळ सेटमध्ये मोडून काढताना दुसरी फेरी गाठली. दोन तास सहा मिनिटे रंगलेल्या या सामन्यात रामकुमारने संपूर्ण वर्चस्व गाजविले. नुकत्याच पार पडलेल्या डेव्हिस करंडक आशिया ओशनिया गटसाखळी लढतीत रामकुमारने भारताकडून चमकदार कामगिरी करताना पहिल्या दिवशी कॅनडाच्या ब्रेडन श्‍नुरविरुद्ध एकेरी सामना जिंकून भारताला 1-1 अशी बरोबरी साधून दिली होती.
 
त्यानंतर पुरुष एकेरीतील आणखी एका सामन्यात भारताचा युरी बांब्री जोस फर्नांडेझ-हर्नांडेझ यांच्याविरुद्ध पहिला सेट जिंकल्यानंतर 6-4, 6-7, 0-2 असा पिछाडीवर पडला होता. परंतु अचानक कंबरदुखीचा त्रास सुरू झाल्यामुळे युकीने हा सामना सोडून देण्याचा निर्णय घेतला. त्याआधी कॅनडाविरुद्धच्या डेव्हिस करंडक लढतीत युकीला डेनिस शापोव्हालोव्हविरुद्ध पहिल्या दिवशीचा एकेरी सामना गमवावा लागल्यामुळे भारताची आघाडीची संधी हुकली होती.
दरम्यान भारताचा युवा खेळाडू प्रज्ञेश गुणेश्‍वरनचे आव्हानही पहिल्याच फेरीत संपुष्टात आल्यामुळे 75 हजार डॉलर्स पारितोषिक रकमेच्या या स्पर्धेत भारताचे आव्हान एकट्या रामकुमार रामनाथनवरच अवलंबून आहे.