शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 (07:28 IST)

कोल्हापूरचा अनिकेत ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबशी करारबद्ध

football
देश-विदेशातील फुटबॉल मैदानात सासत्याने दमदार खेळी करुन प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेला कोल्हापूरचा स्टार फुटबॉल खेळाडू अनिकेत जाधवला देशातील नामवंत ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबमधून खेळण्याची संधी मिळाली आहे. दोनच दिवसांपूर्वी क्लबने अनिकेतला करारबद्ध केले आहे. दोन वर्षासाठीच्या या करारानुसार अनिकेतला आता 2 कोटी 35 लाख रुपये क्लबकडून मिळणार आहेत. व्यावसायिक संघासाठी करारबद्ध होऊन कोटय़वधीच्या घरात मानधन मिळणारा अनिकेत हा पश्चिम महाराष्ट्रातील पहिला फुटबॉलस्टार ठरला आहे.
 
17 वर्षाखालील मुलांच्या वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेत अनिकेतने भारतीय संघातून खेळताना शानदार खेळ करुन देशवासियांची शाब्बासकी मिळवली. त्याची दखल घेऊन भारतीय फुटबॉल महासंघाने आपल्या ऑरेंज संघात त्याला स्थान देऊन महिना 50 हजार रुपये मानधन सुरु केले. अनिकेत हा त्याकाळी मैदानात स्ट्रायकर म्हणून खेळत होता. विविध स्पर्धांमधील त्याचा खेळ पाहून खुष झालेल्या जमशेदपूर फुटबॉल क्लबने 90 लाख रुपयांचा करार करुन अनिकेतला संघात स्थान दिले. या संघातून खेळतानाही दाखवलेल्या कौशल्याची दखल थेट जर्मनीतील ब्लॅक बर्न रोव्हर्स संघाने घेऊन त्याला आधुनिक प्रशिक्षण घेण्यासाठी निमंत्रित केले. येथे झालेल्या सराव शिबिरात त्याला नावाजलेल्या प्रशिक्षकांकडून फुटबॉलचे आधुनिक धडे तर मिळालेच शिवाय जगप्रसिद्ध फुटबॉलपटूंसोबत सामने खेळताना भावी काळात आपल्याला फुटबॉल कसा खेळावा लागेल याचा अनुभव मिळाला.