बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 8 नोव्हेंबर 2017 (11:00 IST)

मेरी कोमची अंतिम फेरीत धडक

मेरी कोम आणि सानिया लाथेर या भारतीय खेळाडूंनी महिलांच्या आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेतील अनुक्रमे 48 किलो व 57 किलो गटातील अंतिम फेरीत धडक मारताना सुवर्णासाठी आपले आव्हान कायम राखले. भारताची पाच वेळची माजी जगज्जेती मेरी कोमने आपल्या जपानच्या त्सुबासा कोमुरावर एकतर्फी विजयाची नोंद करताना 48 किलो गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली. तर सोनिया लाथेरने उझबेकिस्तानच्या योदगोरॉय मिर्झाएव्हावर अत्यंत रंगतदार लढतीत मात करीत अंतिम फेरी गाठली.

रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या 35 वर्षीय मेरी कोमने या विजयामुळे आशियाई स्तरावरील पाचव्या सुवर्णपदकासाठी आपली घोडदौड कायम राखली आहे. मेरी कोमने याआधी पाच आशियाई स्पर्धांमध्ये सहभागी होताना चार सुवर्ण व एक रौप्यपदकाची कमाई केली आहे. मेरी कोमने 48 किलो वजनगटाच्या उपान्त्य लढतीत जपानच्या त्सुबासा कोमुराचे आव्हान 5-0 अशा गुणविभागणीच्या आधारावर मोडून काढताना सहजगत्या अंतिम फेरी गाठली. विजेतेपदासाठी मेरीसमोर कोरियाच्या किम हयांग मी हिचे आव्हान आहे. मेरी कोमने त्याआधी उपान्त्यपूर्व फेरीच्या लढतीत तैपेई चीनच्या मेंग चिह पिंगचे आव्हान गुणविभागणीच्या निर्णयाच्या आधारे संपुष्टात आणताना 48 किलो गटाची उपान्त्य फेरी गाठली होती.