मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 जुलै 2021 (23:22 IST)

टोकियो ऑलिंपिक 2020: कराटे, स्केटबोर्डिंग आणि सर्फिंग वाढवणार ऑलिंपिकची धमाल

ऑलिंपिक ही क्रीडाविश्वातली सर्वोच्च स्पर्धा काही दिवसातच सुरू होणार आहे.
 
ऑलिंपिकमध्ये प्रत्येकाला कोणता ना कोणता आवडीचा खेळ आणि खेळाडू पाहायचे असतात. स्पर्धेचा तो दिवस चाहते जराही चुकवत नाहीत.
 
यंदा तर ऑलिंपिक संयोजन समितीने क्रीडाप्रेमींना खूशखबर दिली आहे. कारण यंदा अनेक नवे खेळ, खेळांच्या कुंभमेळ्यात पहिल्यांदाच असणार आहेत.
 
याव्यतिरिक्त काही पारंपरिक खेळांच्या प्रकारांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने एकूण पाच नव्या खेळांचा समावेश केला आहे तर विविध खेळ मिळून 34 नव्या प्रकारांना मान्यता दिली आहे. खेळांचं शहरीकरण लक्षात घेऊन आणि अधिकाअधिक युवा वर्गाला आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
नवीन काय काय असणार आहे हे जाणून घेऊया.
 
कराटे
जपानमधल्या ओकिनावा बेटावर कराटे या खेळाचा उगम झाला आहे. टोकियोत कराटेचे दोन प्रकार खेळले जातात. काटा आणि क्युमिटे.
 
काटाचा अर्थ होतो आकार. हा एकेरी खेळाचा प्रकार आहे. यामध्ये कराटेकास म्हणजे स्पर्धक पूर्वपरवानगी असलेल्या, कोरियाग्राफ अशा आक्रमण आणि बचावाच्या पद्धती सादर करतात.
 
क्युमिटे हा लढाऊ पद्धतीचा प्रकार आहे. तीन मिनिटांच्या लढतीत प्रतिस्पर्धी एकमेकांविरुद्ध उभे ठाकतात. तीन वजनी गटात स्पर्धा होते आणि त्यांनी वापरलेल्या तंत्रासाठी गुण मिळतात.
 
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत कराटे प्रकारात 80 खेळाडू खेळतात. क्युमिटे मध्ये 60 तर काटा मध्ये 20 खेळाडू सहभागी होतील. पुरुष आणि महिला खेळाडूंची संख्या सारखी असेल.
 
जपानने कराटेच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत वर्चस्व गाजवलं आहे. रायो कियाना ही ओकिनावा बेटावरची खेळाडू काटा प्रकारात तीन वेळा विश्वविजेती आहे.
 
स्पेनही या खेळात अग्रेसर आहे. डमिअन क्विंटिरो आणि साँड्रा सँचेझ या काटा प्रकारातील अव्वल खेळाडू आहेत.
 
डमिअन क्विंटेरो ही एरोनॉटिकल इंजिनिअर होती मात्र कराटेचा ऑलिंपिकमध्ये समावेश होणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर तिने नोकरी सोडली आणि खेळावर संपूर्ण लक्ष केंद्रित केलं.
 
स्केटबोर्डिंग
स्केटबोर्डिंगचे स्ट्रीट आणि पार्क असे दोन प्रकार आहेत. स्पर्धकांना वैयक्तिकरीत्या सादरीकरण करावं लागतं. काठिण्यपातळी आणि त्यांनी निवडलेल्या मार्गातील खरेपणा यानुसार गुण मिळतात.
 
स्ट्रीट प्रकारात, स्पर्धकाला निर्धारित वेळेत रेल्स, स्टेअर्स, कर्ब्स, बेंचेस, वॉल्स अँड स्लोप्स या अडथळ्यांना पार करत गंतव्य स्थान गाठावं लागतं.
 
पार्क प्रकारात, नागमोडी वळणांचा रस्ता आखलेला असतो. हवेत संगीताच्या तालावर चित्तथरारक कसरती करत मार्गक्रमण करणे अपेक्षित असते.
 
चार पदक प्रकारात मिळून 80 खेळाडू सहभागी होत आहेत. दोन्ही प्रकारात पुरुष आणि महिला खेळाडू सहभागी होत आहेत.
ब्रिटनची स्काय ब्राऊन ही पार्क प्रकारात पदकाची संभाव्य दावेदार आहे. 2019मध्ये तिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकली होती. ती फक्त 13 वर्षांची आहे आणि ब्रिटनच्या संघातली सगळ्यांत लहान वयाची स्पर्धक आहे.
 
पुरुषांमध्ये अमेरिकेचा हेइमना रेनॉल्ड्स आणि टॉम स्शार हे पदकासाठी शर्यतीत आहेत. टॉमने अमेरिकेच्या नायजा ह्यूस्टनने स्ट्रीट प्रकारात शेवटची तीन जागतिक अजिंक्यपदं पटकावली आहेत. जपानला युटो होरिगोमकडून आशा आहेत.
 
महिलांमध्ये स्ट्रीट प्रकारात ब्राझीलची लेटिसिआ ब्युफोनी पदकासाठी चर्चेत आहे. पामेला रोसा आणि रायसा लील या ब्राझीलच्या युवा खेळाडूंकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. जपानची स्केटर ओरी निशिमुराचं नावही चर्चेत आहे.
 
जपान या खेळात निम्म्याहून अधिक पदकं पटकावेल असं चित्र आहे. मात्र जपानमध्ये या खेळाकडे उडाणटप्पू मुलांचा खेळप्रकार म्हणून पाहिलं जातं, असं जपान संघाचे प्रशिक्षक डायसुके हायाकावा यांनी सांगितलं.
 
स्पोर्ट क्लाइंबिंग
या खेळात स्पीड, बोल्डरिंग आणि लीड प्रकारात खेळाडू आपलं कौशल्य सादर करतील. स्पीड प्रकारात, दोन स्पर्धक पंधरा मीटर उंच भिंत चढून जातील. त्यांचे मार्ग समांतर असले तरी सारखेच असतील. जो सगळ्यात आधी पोहोचेल तो जिंकेल.
 
बोल्डरिंग प्रकारात, स्पर्धकांना काही मार्ग आखून दिले जातील. वळणदार पद्धतीचे 4.5 मीटर उंचीचे बोल्डर्स पार करून जिंकणे अपेक्षित आहे.
 
लीड प्रकार म्हणजे काहीसा इन्डोअर क्लाइंबिंगसारखा आहे. सहा मिनिटात पंधरा मिनिटांची भिंत सर करतील.
 
स्पर्धकांच्या मानांकनांचा गुणाकार करून अंतिम आकडेवारी सादर केली जाईल. अव्वल आठजण अंतिम फेरीत दाखल होतील. त्यातून विजेता स्पष्ट होईल.
 
टोकियो ऑलिम्पिकमध्ये 40 क्लाइंबर्स असणार आहेत. पुरुष प्रकारात वीस तर महिलांमध्येही वीस असतील.
बोल्डरिंग विशेषज्ञ शौना कोक्से ही ब्रिटनचं प्रतिनिधित्व करेल. 2019 जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिने कांस्यपदक पटकावलं होतं.
 
स्लोव्हेनियाच्या जंजा गार्नब्रेटने सहा वेळा या खेळात जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. इटलीची लौरा रोगोरा हीही पदकाच्या शर्यतीत आहे.
 
पुरुषांमध्ये चेक प्रजासत्ताकचा अडम ओंड्रा पदकाचा प्रमुख दावेदार आहे. मिकाइल आणि बासा मावेम ही भावांची जोडी एकमेकांविरुद्ध खेळणार आहे.
 
स्पेनचा अठरावर्षीय अल्बर्टो गीन्स याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. एक्स्ट्रेमौद्रा या सपाट प्रदेशात राहणाऱ्या गीन्सने ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला आहे.
 
सर्फिंग
सर्फिंगची स्पर्धा टोकियोपासून शंभर किलोमीटर अंतरावरच्या स्यूरिगास्की किनाऱ्यावर होणार आहे. अर्धा तासाच्या हिट म्हणजे फेरीदरम्यान सर्फर सर्वसाधारणपणे दहा ते बारा लाटांवर स्वार होण्याचा प्रयत्न करतील. सर्वाधिक उंचीच्या लाटेवरची आकडेवारी ग्राह्य धरली जाईल.
 
पाच जणांचं पथक या सर्फर्सच्या कामगिरीचं मूल्यमापन करेल. सर्फरच्या प्रदर्शनाच्या आधारे त्यांना गुण मिळतील. अडथळ्यांची तीव्रता, वेगळेपण, वेग, ताकद आणि प्रवाह या मुद्यांचा विचार करून गुण दिले जातील.
स्पर्धा बाद फेरी पद्धतीने खेळवण्यात येईल. प्राथमिक फेरीत कोणताही स्पर्धक बाद होणार नाही.
 
सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये चार ते पाच स्पर्ध एकत्र खेळताना दिसतील. काठिण्यपातळी वाढत जाईल तसं स्पर्धा वैयक्तिक स्वरूपाची होत जाईल.
 
वीस पुरुष आणि वीस महिला स्पर्धक सहभागी होतील.
 
अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाचे स्पर्धक या खेळात पदकासाठी शर्यतीत आहेत मात्र ब्राझीलच्या खेळाडूंकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सहापैकी चार जागतिक जेतेपदं त्यांच्याकडे आहेत.
 
दोनवेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचा मानकरी जॉन जॉन फ्लोरेन्स अमेरिकासाठी हुकूमी एक्का आहे. महिलांमध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची चार जेतेपदं नावावर असणारी कॅरिसा मूर टोकियासाठी रवाना झाली आहे.
 
ऑस्ट्रेलियाच्या स्टेफानी गिलमूरकडे लक्ष द्यावं लागेल. त्याच्या नावावर सात विश्व अजिंक्यपद स्पर्धेची जेतेपदं आहेत.
 
सर्फिंगची स्पर्धा ऑलिम्पिक सर्फिंग फेस्टिव्हलदरम्यान म्हणजेच 25जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. चांगल्या पद्धतीच्या लाटा स्पर्धेदरम्यान असाव्यात यादृष्टीने या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.
 
बेसबॉल/सॉफ्टबॉल
ऑलिंपिकसाठी हे दोन्ही खेळ नवीन नाहीत. मात्र बीजिंग ऑलिंपिकनंतर या दोन खेळांना खेळांच्या सर्वोच्च स्पर्धेत स्थान मिळालेलं नाही.
 
या दोन्ही खेळांचं तत्त्व सोपं आहे. बॉल तटवून जास्तीतजास्त धावा करणे. बेसबॉलमध्ये पिचर ओव्हरआर्म चेंडू टाकतो तर सॉफ्टबॉलमध्ये अंडरआर्म.
 
राऊंड रॉबिन फॉरमॅटनुसार प्राथमिक फेरी होईल. बेसबॉलमध्ये त्यानंतर बाद फेरी असेल तर सॉफ्टबॉलमध्ये पदकासाठीचे सामने असतील.
 
दोन्ही खेळांमध्ये सहा संघ असतील. बेसबॉलची स्पर्धा पुरुष स्पर्धकांसाठी तर सॉफ्टबॉल स्पर्धा महिला गटासाठी आहे.
 
ऑलिंपिकच्या तारखा मेजर लीग बेसबॉल या लोकप्रिय स्पर्धेशी मेळ खात असल्याने अमेरिकेचे खेळाडू टोकियोत नसतील.
 
अमेरिकने शेवटच्या दोन सॉफ्टबॉल जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आहे. जपानविरुद्ध 2008 साली झालेला पराभव मागे टाकत पदक पटकावण्याचा अमेरिकचा प्रयत्न असेल.
 
बेसबॉलमध्ये जपानने प्रीमिअर-12 ही स्पर्धा जिंकली. घरच्या मैदानावर पदक पटकावण्यासाठी यजमान संघ उत्सुक आहे.
 
जपानमध्ये बेसबॉल अतिशय लोकप्रिय खेळ आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेचे सैनिक जपानमध्ये होते. तेव्हापासून बेसबॉल इथे रुजला. 2018 मध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार जपानमधल्या 48 टक्के लोकांना बेसबॉल आवडतं.
 
याव्यतिरिक्त नवीन काय?
ऑलिम्पिकमध्ये मिक्स्ड जेंडर इव्हेंट अनेक खेळांमध्ये असणार आहेत.
 
तिरंदाजी
अॅथलेटिक्स
ज्युडो
शूटिंग-10 मीटर एअर रायफल, एअर पिस्तूल, ट्रॅप
स्विमिंग- 4*100 मेडल रिले
टेबल टेनिस-
ट्रायलथॉन
आणखी काही खेळ टोकियोत ऑलिंपिकमध्ये पदार्पण करणार आहे.
 
बॉक्सिंग- महिला फिदरवेट, महिला वेल्टरवेट
कॅनन स्लालोम- वुमन्स सी-1
कॅनन स्प्रिंट- वुमन्स सी1, वुमन्स सी-2 500मी
सायकलिंग- महिला मॅडिसन, बीएमएक्स फ्रीस्टाईल पार्क
रोइंग-वुमन्स कॉक्सलेस फोर
स्विमिंग- पुरुष 800 मीटर फ्रीस्टाईल, महिला 1500 फ्रीस्टाईल