सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 21 जून 2021 (16:04 IST)

Tokyo Olympic : टोकियो ऑलिंपिकमध्येही कोरोनाचा शिरकाव

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक वर्ष पुढे ढकलण्यात आलेल्या टोकियो ऑलिंपिकचं आयोजन पुढील महिन्यात होणार आहे. स्पर्धेसाठी विविध देशांचे संघ टोकियोमध्ये दाखल होत आहेत. त्यामध्ये कोरोना संसर्गाचं पहिलं प्रकरण समोर आलं आहे.
 
युगांडाच्या संघातील एक खेळाडू नुकताच जपानला पोहोचला. पण त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ माजली आहे.
 
टोकियो ऑलिंपिक येत्या 23 जुलैपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेचं आयोजन गेल्या वर्षी होणार होतं. मात्र, कोरोना व्हायरस साथीने ही स्पर्धा स्थगित करण्यात आली. पुढे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर यंदाच्या वर्षी जुलै महिन्यात स्पर्धेचं आयोजन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
 
पुढे काही देशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या, तिसऱ्या लाटा आल्या. मात्र कोणत्याही परिस्थितीत ऑलिंपिक स्पर्धेचं आयोजन करण्याचं जागतिक ऑलिंपिक संघटनेने ठरवलं आहे. त्यानुसार 23 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान ही स्पर्धा होणार आहे.
युगांडामध्ये कोरोना व्हायरसची रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून पुन्हा वाढत असल्याचं दिसून येतं. या पार्श्वभूमीवर युगांडा सरकारने लॉकडाऊनचे निर्बंध आणखी कडक केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या खेळाडूने लशीचे दोन डोसही घेतले होते. युगांडाच्या नऊ खेळाडूंच्या पथकातील तो एक सदस्य आहे. या पथकात बॉक्सर, कोच आणि अधिकारी यांचा समावेश आहे.
 
युगांडा सोडताना निगेटिव्ह होता रिपोर्ट
पथक युगांडाहून जपानकडे रवाना होत असताना सर्वांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी सर्व सदस्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह होते. मात्र टोकियोमध्ये संघ दाखल झाल्यानंतर नियमानुसार त्यांची तिथं पुन्हा चाचणी घेण्यात आली. यावेळी पथकातील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं.
 
या खेळाडूला सध्या सरकारी क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती जपान प्रशासनातील अधिकाऱ्यांनी स्थानिक माध्यमांना दिली.
 
संघातील बाकीच्या सदस्यांना विशेष बसने जपानच्या पश्चिम भागातील ओसाका येथे नेण्यात आलं. तिथं या संघाच्या सराव सत्रांचं नियोजन करण्यात आलं आहे.
 
टोकियो ऑलिंपिकसाठी जपानमध्ये दाखल होणारा युगांडा हा फक्त दुसराच संघ आहे. त्यांच्याआधी ऑस्ट्रेलियाचा सॉफ्टबॉल खेळप्रकारातील महिला संघ 1 जूनला जपानमध्ये दाखल झाला होता.
 
ऑलिंपिकबाबत संशयाचं वातावरण
जपानमधील आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ऑलिंपक स्पर्धेदरम्यान स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येऊ नये. स्टेडियम रिकामी ठेवणं हेच सर्वांच्या दृष्टीने हिताचं असेल, असं मत व्यक्त केलं जात आहे.
 
मात्र, जपान प्रशासनाने घरगुती प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्याचे संकेत दिले आहेत.
 
असाही शिंबून वृत्तपत्रातील एका बातमीनुसार, टोकियोमध्ये 20 जून रोजी कोरोनाचे 376 नवे रुग्ण आढळून आले. तर एका व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत रुग्णसंख्येत 72 ने वाढ झाली आहे.
 
स्थानिक माध्यमांनुसार, संथ गतीने होणाऱ्या लसीकरणामुळे ऑलिंपिक स्पर्धेच्या आयोजनाबाबत संशयाचं वातावरण आहे. जपानमध्ये आजपर्यंत फक्त 16 टक्के लोकसंख्येचंच लसीकरण करण्यात सरकारला यश आलं.
तर युगांडाचे राष्ट्राध्यक्ष युवेरी मुसेविनी यांनी पर्यटक आणि अत्यावश्यक सेवा वगळता देशातील रस्ते वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत.
 
तसंच शाळा, महाविद्यालय आणि धार्मिक ठिकाणंही 42 दिवसांकरिता बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे.
 
गेल्या एका आठवड्यात युगांडातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 100 वरून वाढून 1700 वर गेल्याची माहिती मुसेविनी यांनी दिली.