मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2023
  3. तेलंगणा विधानसभा निवडणूक 2023
Written By
Last Modified: रविवार, 3 डिसेंबर 2023 (19:37 IST)

बरेलअक्का : खात्यावर दीड हजार रुपये, तरीही केसीआर आणि रेवंत रेड्डींविरोधात लढणारी ही तरुणी कोण?

BARELAKKA CREATIONS
BARELAKKA CREATIONS
BARELAKKA CREATIONS
तेलंगणाच्या निवडणुकीत एकीकडे केसीआर आणि दुसरीकडे काँग्रेसचे रेवंत रेड्डी यांच्यात लढाई सुरु असताना एका पंचवीस वर्षाच्या मुलीनेही सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय.
 
करोडपती नेत्यांच्या लढाईत म्हशी राखणाऱ्या या मुलीने आमदारकीची निवडणूक का लढवली?
 
अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या बरेलअक्काने स्वतःच्या जाहीरनाम्यात कोणकोणती आश्वासनं दिलीयत आणि मतदारांनी तिथे कुणाला कौल दिलाय?
 
बरेलअक्काच्या विरोधकांनी तिच्याबाबत अनेक टोमणे मारले असले तरी सोशल मीडियावर मात्र तिने या सगळ्या नेत्यांना कडवी झुंज दिली आहे.
 
कोण आहे बरेलअक्का ?
तेलंगणाच्या नागरकुर्नुल जिल्ह्यातल्या मरिकल नावाच्या गावात जन्मलेली 'कर्णे शिरिषा' म्हणजेच ही बरेलअक्का.
 
काही वर्षांपूर्वी हैदराबादमध्ये राहून ती सरकारी नोकरीची तयारी करत होती. पण पेपर फुटल्यामुळे परीक्षा पुढे ढकलली गेली आणि पैसे संपले म्हणूनच शिरीषाला तिच्या गावी परत यावं लागलं.
 
गावात म्हशी राखायला गेल्यावर तिने सहज एक व्हिडिओ करून सोशल मीडियावर पोस्ट केला आणि तिचं संपूर्ण आयुष्यच बदललं.
त्या व्हिडिओत ती म्हणाली होती की, "तेलंगणात तुम्ही कितीही पदव्या मिळवल्या तरी त्याला काही अर्थ नाही, तुम्हाला नोकरी मिळत नाही आणि अशा म्हशी राखाव्या लागतात."
 
हा व्हीडिओ सोशल मीडियावर एवढा व्हायरल झाला की तेलंगणा पोलिसांनी तिच्यावर कलम 505(2) अंतर्गत गुन्हाच दाखल केला. शिरीषाने बीबीसीला सांगितलं की हा व्हिडिओ व्हायरल झाला पण गुन्हा दाखल झाल्यामुळे तिला तिच्या म्हशी विकाव्या लागल्या आणि ती डिप्रेशनमध्येही गेली.
 
निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला?
बरेलअक्काने तेलंगणातील बेरोजगारीविरुद्ध लढण्यासाठी विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आणि नागरकुर्नुल जिल्ह्यातल्या कोल्लापूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
 
त्या जागेवर सध्या काँग्रेसचे जुपल्ली कृष्णराव आघाडीवर असले तरी बरेलअक्काच्या उमेदवारीची सगळ्यांनाच दखल घ्यावी लागली होती.
 
काही तेलगू फिल्मस्टार्सनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून बरेलअक्काला पाठिंबा दिला होता. सोशल मीडियावर तरुणांनीही तिचा प्रचार उचलून धरला होता.
 
उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासूनच सोशल मीडियावर बरेलअक्काच्या उमेदवारीची चर्चा सुरु झाली. निवडणूक आयोगाने तिला 'शिट्टी' हे चिन्ह दिलं होतं.
 
बरेलअक्काच्या जाहीरनाम्यात काय होतं?
बरोजगारीच्या मुद्द्यावर निवडणुकीत उतरलेल्या बरेलअक्काने मी निवडून आले तर सरकारला बेरोजगारीबाबत जाब विचारेन असं आश्वासन दिलं होतं.
 
यासोबतच तिच्या जाहीरनाम्यात पुढील आश्वासनही दिलेली होती :
 
1. वेळेवर नोकरभरती होण्यासाठी प्रयत्न.
 
2. गरिबांना घरं देणार
 
3. प्रत्येक गावाला जोडणारे रस्ते बनवणार
 
4. बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळवून देणार
 
5. बेरोजगारांना मोफत शिक्षण, वैद्यकीय आणि इतर कोर्सेस सुरु करणार
 
शपथपत्रात काय होतं?
तेलंगणाच्या डॉ. आंबेडकर मुक्त विद्यापीठातून बरेलअक्काने बीकॉमची पदवी मिळवल्याचे माहिती तिने शपथपत्रात दिलीय.
 
त्याच अर्जात दिलेल्या संपत्तीचं विवरणही व्हायरल झालंय. तिच्या खात्यावर दीड हजार रुपये आहेत आणि रोख पाच हजार रुपयांची ती मालकीण असल्याची माहिती त्या विवरणात दिलीय.
 
बरेलअक्काचे फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर अकाउंट आहे. इन्स्टाग्रामवर 5.73 लाख, फेसबुकवर 1.07 लाख आन युट्युबवर 1.59 फॉलोवर असल्याची माहिती बरेलअक्काने तिच्या शपथपत्रात दिलीय.
 
साडेसहा हजार रुपये सोडले तर तिच्याकडे कसलीही संपत्ती नसल्याची माहिती तिने सांगितलं आहे.
कोट्यवधींची मालमत्ता असणाऱ्या नेत्यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या बरेलअक्काच्या शपथपत्राची सोशल मीडियावर चर्चा तर झाली पण निवडणुकीत मात्र तिला विजय मिळाला नाही असं दिसतंय.
 
सध्या जाहीर होत असलेल्या तेलंगणा विधानसभेच्या निकालात काँग्रेसने बीआरएसला हरवून सत्ता हस्तगत केल्याचा दिसतंय.
 
कोल्लापूर विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. बरेलअक्काला तिची निवडणूक जिंकता आलेली नसली तरीही तिची चर्चा मात्र खूप झाली.
 
Published By- Priya Dixit