शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Updated : शनिवार, 2 सप्टेंबर 2023 (22:36 IST)

दुष्काळ म्हणजे काय ? राज्यातील पूर्वीचे दुष्काळ कारणे काय असावीत

farmer
स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत महाराष्ट्राने अनेक दुष्काळ पाहिले आहेत. पण या वर्षीच्या दुष्काळाने कहर केला आहे. पिण्यासाठी पाण्याचा अभाव, जनावरांना चारा छावणीत नेऊन ठेवण्याची पाळी, ग्रामीण भागात रोजगारीचा अभाव व त्यामुळे जवळच्या शहरांकडे ग्रामस्थांची होणारी वाटचाल ही या वर्षीच्या दुष्काळाची ठळक वैशिष्ट्ये दिसून येतात. 1972 साली पण असाच मोठा दुष्काळ पडला होता. दोन वाईट गोष्टींची तुलना करू नये पण 1972 चा दुष्काळ या दुष्काळाच्या मानाने सुसह्य होता.कारण त्या दुष्काळात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती आजच्या मानाने बरी होती.
 
याचे प्रमुख कारण म्हणजे स्वत:चे पोट भरण्याच्या हव्यासापोटी मानवाने जमिनीचे पोट आजच्या सारखे रिकामे करून ठेवले नव्हते. 60 वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा शिकत होतो त्यावेळी आम्हाला शिकविले गेले की पाच वर्षातून एक हंगाम चांगला, एक बरा व तीन कष्टदायक अशी परिस्थिती असते. आजही साठ वर्ष उलटून गेल्यावर सुध्दा या परिस्थितीत काहीही बदल झालेला दिसत नाही. हे केव्हा तर सिंचनावर लाख करोड रूपये खर्च केल्यावर. आपल्या नियोजनात काही चुकत तर नाही ना अशी शंका यावयास दाट जागा निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आल्याला दुष्काळ निवारणाबद्दल विचार करायचा आहे.
 
पाणी अडविण्यातील हयगय, पाण्याचा चुकीचा वापर व चुकीची पिक पध्दती ही या वर्षीच्या दुष्काळाची प्रमुख कारणे दाखविता येतील. या तीनही कारणांची मीमांसा सदर लेखात करण्यात आली आहे.
 
गेल्या काही वर्षांपासून पावसाचा स्वभाव बदलला आहे. तो उशीरा सुरू होतो, लवकर संपतो, पावसाचे दिवस कमी होत चालले आहेत, पावसाच्या प्रमाणात मात्र म्हणावा तसा फरक पडलेला नाही व म्हणूनच पावसाचा वेग खूपच वाढला आहे ही या नवीन पाऊस पध्दतीची वैशिष्टये आहेत. वेगाने पडणारा पाऊस पाणी जमिनीत मुरण्याच प्रतिबंध करतो, तो वेगाने पडतो व वेगाने वाहून जातो.
 
जमिनीत पाणी मुरण्यासाठी त्याचा वेगावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. आणि आपले नेमके येथेच चुकत आहे. धावते पाणी चालते करा, चालते पाणी रांगते करा, रांगते पाणी थांबते करा व थांबते पाणी जिरते करा हा जलसंवर्धनाचा सोपा मार्ग आहे. आपल्याला पावसात बदल होत आहे याची जाणीव नाही, व ती असली तरी हे थांबवण्यासाठी काय करायचे याची माहिती नाही या संभ्रमात आपण सापडलो आहेत.
 
पावसाचा वेग कमी करण्यात वृक्षराजी आपल्याला मदत करत असते व त्याची गती आणखी कमी करण्यासाठी कुरणे अथवा गवत मदत करत असते. पण आपण इतके कपाळकरंटे आहोत की मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून आपण मोकळे झालो आहोत.
 
वृक्षांचा अणखी एक मोठा लाभ असतो. तो म्हणजे जेव्हा झाडांची मुळे जमिनीत प्रवेश करतात तेव्हा ती जमिनीतील खडकांना फोडण्याचे काम करित असतात. त्यामुळे दगडांमध्ये ज्या अगणित फटी निर्माण होतात त्यातून पाण्याचा जमिनीत प्रवेश होतो व भूजल पातळी वाढण्यास मदत होते. एका माणसाला जगण्यासाठी जेवढा प्राणवायू आवश्यक असतो, तो मिळविण्यासाठी त्याला किमान 7 झाडांची आवश्यकता असते. आज झाडे कमी झाल्यामुळे वातावरणात निर्माण झालेला कर्बवायू शोषण्यात आपण कमी पडत आहोत. त्याचा विपरित परिणाम पर्यावरणावर झालेला आढळतो. वृक्षराजी वाढल्यास पर्यावरण संतुलन साधून, आज जो पावसात अनियमितपणा आला आहे तो घालवून, पावसात स्थैर्य आणण्याच्या दृष्टीने आपण वाटचाल करू शकू.
 
सध्यातरी पावसात जो अनियमितपणा आला आहे तो आपण थांबवू शकत नाही ही वस्तूस्थिती आहे. या नव्या पाऊस पध्दतीत बदल घडवून आणणे आपल्या हातात नाही. यासाठी आपल्याजवळ फक्त एकच पर्याय उरतो. तो म्हणजे आपण आपल्यात बदल घडवून आणणे. हे मात्र आपल्या हातात आहे. पाऊस केव्हा पडेल याचा भरवसा राहिलेला नाही. तो पडेल तेव्हा पडू देत. हा पडलेला पाऊस आपण जास्तीत जास्त प्रमाणात कसा अडवू शकू यातच आपली ठाकूरकी आहे. माहाराष्ट्रात सध्या आपण पडलेल्या पावसापैकी फक्त 10 ते 12 टक्के पाऊस अडवितो असे आकडेवारी सांगते. सर्वच्यासर्व पाऊस आपण जरी अडवू शकलो नाही तरी जास्तीत जास्त पाऊस अडविण्यास कोणती हरकत आहे ? हे पावसाचे पाणी कृत्रिम पध्दतीने जमिनीत मुरविणे यावर आपल्याला विचार करण्याची गरज आहे.
 
गावातील प्रत्येक शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात शेततळे खणल्यास संपूर्ण गावात पाण्याचा किती मोठा संग्रह होऊ शकेल ? बीज मिळविण्यास, रासायनिक खते मिळविण्यास, कीटकनाशके मिळविण्यास शेतकरी जेवढा प्रयत्न करतो तेवढा प्रयत्न तो पाणी अडविण्यासाठी करतो काय हा खरा प्रश्न आहे. पाणी नसेल तर वरील सर्व प्रयत्न विफल ठरतात हे त्याला कुणी समजावून सांगावे? प्रत्येक गावात पाणी चळवळ सुरू व्हावयास हवी. पाण्याची साठवणूक ही शेती विकासाची गुरूकिल्ली आहे याची जाणीव शेतकऱ्याला करून देणे गरजेचे आहे. त्यांने पाण्याचा योग्य साठा केल्यास वर्षातून दोन पिके काढणे त्याला सहज शक्य आहे.
 
शेततळे खणणे हा पाणी अडवण्याचा व साठवण्याचा एक मार्ग झाला. या शिवाय शेतात नाल्यांमधून वाहणाऱ्या पाण्याला थांबविण्यासाठी दगडी व मातीचे बंधारे बांधणे, शेतातील उताराला आडवी नांगरट व पेरणी करणे, गावातील तलावांमधील गाळ काढून त्यांना अधिक खोल करणे, सार्वजनिक ठिकाणी नवीन तलावांचे खोदकाम करणे यासारखेही कार्यक्रम हाती घेतले जावू शकतात.
 
या संदर्भात शिरपूर पॅटर्न चा खास उल्लेख करणे गरजेचे ठरते. श्री.अमरीशभाई पटेल व त्यांचे सहकारी श्री.सुरेश खानापूरकर यांनी धुळे जिल्ह्यात केलेला प्रयोग अफलातून आहे. नाले खोल करणे, रूंद करणे व प्रत्येक नाल्यांवर 15 ते 20 बंधारे बांधणे हे काम त्यांनी 35 गावांत पूर्ण केले असून त्या ठिकाणी भूजलाची पातळी वाढत वाढत 15 ते 20 फूटांवर आलेली आहे. हा प्रयोग 150 गावापर्यंत पोहोचविणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वेगाने त्यांचे काम सुरू आहे. त्यांचे प्रयोग शास्त्राला धरून नाहीत अशी टिका सरकारी खाते करीत आहेत. पण त्यांचा कामाचा प्रत्यक्ष लाभ दिसत असतांना त्याकडे डोळे झाकणेही योग्य नाही. त्यांनी तर मला 10 कोटी रूपये द्या, मी जालना परिसराचा पाणीप्रश्न एका वर्षात सोडून दाखवितो असा विडा उचललेला आहे. मागील वर्षी मी काही मित्रांबरोबर गुजराथ राज्याचा अभ्यास केला त्यावेळी तिथे सुध्दा असाच प्रयोग यशस्वी झालेला बघितला आहे.
 
सध्या शेतकऱ्यांना शेतात बोअर खणण्याचा छंदच लागला आहे. त्यांची अशी समजूत आहे की जमिनीच्या आत भरपूर पाणी साठलेले आहे, बोअर खणणे म्हणजे आपण त्या साठ्यापर्यंत सहज पोहोचू शकू. लातूर जिल्ह्यातील उदाहरण तर डोळे पांढरे करणारे आहे. दररोज 1000 ते 1200 फूट खोल 150 बोअर खोदण्याचे काम वेगाने सुरू असून इतक्या खोल पातळीतून पाणी उपसण्याचा वेडेपणा शेतकरी करित आहेत. हे पाणी शेकडो वर्षांपूर्वी जमा झालेले असून उपसा सुरू झाल्यावर काही काळ फक्त हा पाणी पुरवठा चालू रहाणार आहे. तो संपला म्हणजे नवीन बोअर खोदण्यास शेतकरी मोकळे.
 
या संदर्भात गुजराथ मधील एक बोलके उदाहरण देण्याचा मोह होत आहे. राजकोट परिसरात एक व्यापारी डिटोनेटर्सच्या व्यवसाय करतो. त्याच्याकडे एक शेतकरी विहीर खोल करण्यासाठी तोटे खरेदी करण्यास आला. त्याचा चेहरा व्यापाऱ्याच्या लक्षात राहिला. दोन वर्षांनंतर तोच शेतकरी पुन्हा तोटे विकत घेण्यासाठी जेव्हा आला त्यावेळी तो व्यापारी संभ्रमात पडला. पाणी मिळविण्यासाठी विहीर खोल करणे हा मार्ग नसून विहीरीत पावसाचे पाणी जमा करणे हा सोपा मार्ग असून त्याचा वापर करणे देशाच्या दृष्टीने आवश्यक आहे ही गोष्ट त्याच्या लक्षात आली व परिसरात त्याने जलपुनर्भरणाची चळवळ सुरू करून शेकडो शेतकऱ्यांना पाणी प्रश्नावर मात करण्याचा गुरूमंत्र दिला.

पाण्याचा चुकीचा वापर
पाणी नसणे हे जितके वाईट, त्याहीपेक्षा असलेल्या पाण्याचा चुकीच्या मार्गाने वापर करणे त्याही पेक्षा वाईट ठरते. सध्या आपण ज्या पध्दतीने जलसिंचन करतो ती प्रवाही सिंचन पध्दती तर मूर्खपणाची परिसीमा आहे. या पध्दतीत आपण पिकाला पाणी न देता जमिनीला पाणी देत आहोत व पाण्याचा नासोडा करीत आहोत. प्रत्येक पिकाची पाण्याची गरज ठरलेली असते. त्यापेक्षा जास्त पाणी पिकाला देणे हानीकारक ठरते. शेतकऱ्याची सर्वसाधारण समजूत असते की जास्त पाणी म्हणजे जास्त उत्पादन. या चुकीच्या समजूतीतून त्याला आपण बाहेर काढले पाहिजे.
 
जगात सिंचनासाठी ठिबक सिंचनाचा वापर सुरू आहे. या पध्दतीत पिकाच्या मुळांना पाणी मिळते व तेवढे पाणी त्यांच्या विकासासाठी पुरेसे ठरते. जास्त पाणी दिले गेल्यास मुळांसाठी जी खेळती हवा पाहिजे असते ती त्यांना मिळत नाही व त्यामुळे पिक जोम पकडत नाही. शेवटी पाणी जास्त देवून नुकसान आपलेच झालेले दिसून येते.
 
आज ऊस, केळी, द्राक्षे या सारखी जास्त पाणी लागणारी पिके घेण्याचा हव्यास वाढत चालला आहे. ही पिके भूजलावरील एक मोठे संकट ठरत आहेत. सगळ्यात अडचणीची बाब ही आहे की ही पिके प्रामुख्याने वर्षा छायेत जे जिल्हे येतात त्यातच या पिकांचे प्राबल्य जास्त आहे. पडणारा पाऊस 500 ते 700 मीमी एवढा असून हा वर्षाछायेचा पट्टा उत्तरेत धुळे जिल्ह्यापासून सुरू होवून खाली सांगली जिल्ह्यापर्यंत पसरला आहे. पूर्ण विदर्भ व कोकण पाण्याचे बाबतीत समृध्द असूनसुध्दा त्या प्रदेशात या पिकांनी व्याप्त जमीन तुलनात्मकदृष्ट्या कमी आहे. दुर्दैव एवढ्यावरच संपत नाही. याच पट्ट्यात कमीतकमी नवीन 100 चे वर साखर कारखाने उघडण्यासाठी अर्ज प्रलंबित आहेत असे कळते. याला लालसा म्हणावयाचे की बौध्दिक दिवाळखोरी म्हणावयाचे ?
 
ऊस उत्पादन हा महाराष्ट्राच्या शेतीला लागलेला कर्करोग होय. शेती, राजकारण, आमदार वा खासदार पद, मंत्री मंडळात समावेश या सर्व गोष्टींची इतकी सरमिसळ होवून गेली आहे की कशामुळे काय होत आहे हे समजतच नाही. साखर उद्योग हे एक बांडगूळ आपण पोसत आहोत. सरकार टिकवण्यासाठी या उद्योगाला जगविणे ही एक अपरिहार्यता होवून बसली आहे.

या उद्योगाचे वैशिष्ट्य म्हणजे हा उद्योग तरूण होण्याचे आधीच म्हातारा झाला आहे. याला मदतीचे डोज दिल्याशिवाय हा जगणेच अशक्य होवून बसले आहे. कारखाने चालविणारे तेच, सरकारही त्यांचेच व या उद्योगाला मदत देणारेही तेच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या सहकारी साखर कारखान्यांना आयकर लावण्यात यावा याबद्दल वारे वाहत आहेत, यामुळे घबराट उडाली आहे. पण लवकरच हा कर लावण्यात येवू नये असा निर्णय झाल्याशिवाय राहणार नाही याबद्दल खात्री बाळगा. पाणी म्हणजे ऊस हे समीकरण महाराष्ट्राला घातक ठरणार आहे. महाराष्ट्रात उपलब्ध असणाऱ्या सिंचन सोयीपैकी 75 टक्के सोयी एकाच पिकासाठी वापरणे इतर पिकांना अन्यायकारक ठरत आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor