शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By wd|
Last Modified: मुंबई , बुधवार, 17 सप्टेंबर 2014 (10:54 IST)

महायुतीबाबत आज गडकरी-शहा यांच्यात चर्चा?

विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना  शिवसेना आणि भाजपमध्ये अद्याप जागावाटपाचा घोळ सुटलेला नाही. जागावाटपाबाबत आपले म्हणणे कायम ठेवावे की शिवसेनेच्या कलानुसार पुढे जायचे याबाबत कोणता निर्णय घ्यावा याची विचारपूस करण्यासाठी व ठोस निर्णय घेण्यासाठी प्रदेश भाजपचे नेत्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक घेऊन खलबते केली. मात्र कोणताही ठोस तोडगा निघाला नाही.

शिवसेनेसोबत युती करायची की नाही या महत्त्वाच्या मुद्यावर आज (बुधवारी) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा  आणि ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्यात चर्चा होणार आहे. या चर्चेला राज्यातील प्रमुख नेतेही उपस्थित राहाणार आहेत. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे  विरोधीपक्ष नेते विनोद तावडे हे देखील या चर्चेला उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, शिवसेनेने भाजपला 135 जागा देणे केवळ अशक्य असल्याचे सांगत निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्यामुळे भाजपने आखलेल्या रणनितीनुसार शिवसेना जागावाटपाला तयार नसल्याने भाजपची पुढील रणनिती काय असावी यासाठी राज्यातील बडे नेते नितीन गडकरींशी चर्चा केली.