शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By wd|
Last Modified: मुंबई , सोमवार, 22 सप्टेंबर 2014 (12:19 IST)

महाराष्ट्राला क्रमांक एकचे राज्य बनवू : उध्दव

शिवसेनेच्या नेतृत्वाखाली येणारे सरकार महाराष्ट्राला देशामधील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवेल. आम्हाला सत्ता हवी आहे आणि वाटेल ती किंमत मोजून आम्ही ती मिळवू असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. 
 
गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या जातीय दंगली भयंकर होत्या. परंतु मोदी यांच्या सरकारने खंबीर उपायोजना करून मोडून काढल्या. असे कणखर नेतृत्व मोदी यांच्यारूपाने देशाला लाभल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. हिंदुत्वाची भूमिका पुढे चालविण्यासाठी मोदी हेच देशाचे पंतप्रधानपदी असले पाहिजेत असेही ठाकरे यांनी नमूद केले आहे.
 
2002 साली गुजरातमध्ये झालेल्या जातीय दंगलीच्यावेळी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांना संपूर्ण पाठिंबा दिला होता याची आठवण उध्दव यांनी त्यांना करून दिली आहे. महायुती एकसंध राहवी असाच शिवसेनेचा प्रयत्न राहणार आहे. शिवसेनेने अगोदर 160 जागा मागितल्या होत्या. परंतु आता त्यापैकी नऊ जागा सोडण्याची आम्ही तयारी दर्शविली आहे. इतर 18 जागा महायुतीमधील इतर पक्षांना दिल्या जातील असे त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेना आता 151 जागांवर लढेल; तर भाजपला 119 जागा दिल्या जातील असे त्यांनी नमूद केले आहे. यापेक्षा जास्त जागा आम्ही भाजपला देऊ शकणार नाही असे त्यांनी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना स्पष्ट केले आहे.
 
महायुती एकसंध राहिल्यास  मुख्यमंत्री आमच्याच होईल आणि हिंदुत्वाचा नारा बुलंद होईल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली आहे. भाजपच्या नेत्यांनी आता शिवसेनेचे उणेदुणे काढणे बंद केले पाहिजे. या भांडणाचा फायदा काँग्रेस आघाडीला होण्याची शक्यता आहे. महायुतीचे हित लक्षात घेऊन त्यांनी निष्कारण एकमेकावर टीका करण्याचे टाळले पाहिजे, असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे.