शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By
Last Modified: गुरूवार, 25 जून 2020 (11:54 IST)

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी...

तुकोबांना विटेवरचे विठ्ठलाचे ते रूप सुंदर भासले, मनाला भावले आणि तुकोबा म्हणून गेले, सुंदर तें ध्यान उभे विटेवरी। पण मुळात तुकोबांना विठ्ठलाचे हे ध्यान सुंदर वाटण्याचे एक कारण म्हणजे ते ध्यान स्थिर आहे, शांत आहे. ते विटेवर स्थिरपणे उभे आहे. ते हालत-डुलत नाही. ते निश्चल आहे. विटेवरच्या दोन पायांपैकी एक पाय मध्येच वर घेत नाही. कंटाळा आला म्हणून इकडे तिकडे वळून बघत नाही. उभे राहून राहून पायांना मुंग्या आल्या, म्हणून मध्येच विटेवरून खाली उतरत नाही. भक्तांची वाट पाहून पाहून आणि आलेल्या भक्तांना दर्शन देऊन देऊन दमल्यामुळे जरा विश्रांती हवी म्हणून खाली बसत नाही आणि हे असे किती वेळ निश्चल उभे राहाणे ? तर अठ्ठावीस युगे ! म्हणूनच जेवढय़ा कौतुकाने तुकोबा त्याचे सुंदर तें ध्यान। असे वर्णन करतात, तेवढय़ाच कौतुकोन तटस्थ तें ध्यान विटेवरी । असेही सांगतात. 
 
त्यांच्या डोळ्यांना आता विठ्ठलाच्या या तटस्थ ध्यानाची इतकी सवय झाली आहे की, देवाचे इतर रूप आता ते ओळखतच नाहीत. तुकोबा तन-मनाने विठोबाशी आता इतके एकरूप झाले आहेत, विठ्ठलभक्तीत एवढे रंगून गेले आहेत की, इतर कामे करण्याचे त्यांना सुचतच नाही. तुकोबा सांगतात, आणिक दुसरें, मज नाहीं आतां। नेमिलें या चित्ता। पासूनियां।। पांडुरंग ध्यानीं, पांडुरंग मनीं। जागृतीं स्वप्नीं। पांडुरंग।। पडिलें वळण, इंद्रियां सकळां। भाव तो निराळा। नाहीं कोणा।। तुका म्हणे नेत्रीं, केली ओळखण। तटस्थ तें ध्यान। विटेवरी।। पांडुरंगाच्या स्वरुपी माझ्या चित्ताची स्थापना केल्यापासून दुसरी कुठलीच गोष्ट मला माझी वाटत नाही. मोलाची, महत्त्वाची वाटत नाही. जागृतावस्थेत ध्यान करू लागलो की मला पांडुरंगच दिसतो, झोपलो की स्वप्नातही मला पांडुरंगच दिसतो. माझ्या सगळ्याच इंद्रियांना आता त्याच्याकउ। धाव घेण्याची सवय लागली आहे. माझ्या डोळ्यांनीच तर मला त्या विटेवरच्या शांतचित्त पांडुरंगाची ओळख करून दिली. हे ध्यान किती शांत आहे ?
 
इतर देव काही ना काही कारणाने रागावतात, कोपतात, पण हा पांडुरंग ? भक्तमंडळी सलगीने ह्याला हवे ते बोलतात, ह्याचे उणे-दुणे काढतात, प्रसंगी ह्याच्याशी भांडतात, ह्याच्यावर रुसतात, ह्याला वाटेल तसा वेठीला धरतात, पण हा कधी त्यांच्यावर रागावत नाही. वडीलकीच्या नात्याने कधी त्यांना उपदेशाचे कडू घोट पाजत नाही. कोपणे, थयथयाट करणे तर दूरच. एका अर्थी हा एवढय़ाशा विटेवर उभा राहून शरीराचा तोल सावरतो आणि त्याच वेळी मनाचाही. रागावणार्‍याला काय एवढेसे निमित्त पुरते. पण हा भले मोठे कारण सापडले तरी रागावत नाही. जणू शांतीचा पुतळाच ! स्वत:च्या आचरणातून जणू हा शांतीपरते नाहीं सुख। येर अवघेंचि दु:ख।। म्हणूनि शांती धरा। उतराल पैलतीरा।। असा संदेशच जगाला देत असतो. हा असा साधा वाटत असला तरी प्रत्यक्षात तो म्हणजे एक फार मोठे प्रस्थ आहे बरे ! लक्षूनियां योगी, पाहाती आभास। तें दिसे आम्हांस। दृष्टीपुढे।। योगी अफाट साधना करून जे आभास तत्त्व पाहतात, ते स्वरूप आम्हाला सहजपणे दृष्टिगोचर झाले आहे. कसा दिसतो हा आमचा लाडका ? कर दोनी कटीं राहिलासे उभा। सांवळी हे प्रभा अंगकांती।। ह्याची करामत काय म्हणून विचारता ? तो एकाच वेळी सार्‍यांचे अंत:करण व्यापून पुन्हा निर्विकारपणे वेगळा राहिला आहे.
 
व्यापूनि वेगळें राहिलेंसे दुरी। सकळां अंतरीं निर्विकार।। विशेष म्हणजे ह्याला रूप, रंग, नाम, कूळ, जात, धर्म, हात, पाय, डोके असे काहीच नाही. अशा या अरूपाचे ध्यान स्वत: भगवान शिवशंकर करीत आहेत. रूप नाही रेखा, नामही जयासी, आपुल्या मनासीं. शिव ध्याये ।। अंत नाहीं पार, वर्णा नाहीं थार। कुळ याति शिर। हस्त पाद।। अचेत चेतलें, भक्तिचिया सुखें। आपुल्या कौतुकें। तुका म्हणे।। केवळ भक्तीच्या अवर्णनीय सुखासाठी ते चिन्मय असूनही सगुण साकार झाले. असे हे अतिदुर्लभ घबाड जर आपल्याला अनायासे लाभले आहे तर मग आपण त्याचा फायदा का नाही करून घ्यायचा ? तर मग मंडळी चला, बांधू विठ्ठल सांगडी। पोहुनि जाऊं पैल थडी।। त्यात उद्या आषाढी एकादशी. मग काय विचारता ? पूर आला आनंदाचा। लाटा उसळती प्रेमाच्या। अशी पंढरपुरी आनंदयात्राच भरली आहे. आपणही या यात्रेत सामील होऊन उद्या निवांतपणे विटेवरच्या त्या तटस्थ ध्यानाला भेटूया, पाहूया.