रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By
Last Updated : शुक्रवार, 8 जुलै 2022 (11:28 IST)

आषाढी एकादशी कथा Aashadhi Ekadashi Katha

Devshayani ekadashi 2022
devshayani ekadashi katha
युधिष्ठिराने विचारले, केशवा, आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय? त्या दिवशी कोणत्या देवाची पूजा करावी व त्या व्रताचा विधी कसा आहे ते मला सांगा.'
 
श्रीकृष्ण म्हणाले, 'हे पृथ्वीचे पालन करणार्याल राजा, जी कथा पूर्वी ब्रह्मदेवाने नारदाला सांगितली, तीच आश्चर्यकारककथा मी तुला सांगतो.'
 
नारदाने विचारले, 'पित्या ब्रह्मदेवा, आषाढाच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे? व तिचे माहात्म्य काय ते मला सांगा कारण मला विष्णूची आराधना करायची आहे?'
 
ब्रह्मदेव म्हणाले, 'कलियुग आवडणार्याव मुनीश्रेष्ठा, तू चांगले विचारलेस. तू खरोखरच वैष्णव आहेस. त्रैलोक्यामध्ये एकादशीसारखे दुसरे पवित्र व्रत नाही. हे व्रत पुण्यकारक असून ते पापांचा नाश करते, व सर्व इच्छा पूर्ण करते. ज्या मनुष्यांनी जन्माला येऊन हे व्रत केले नाही, त्यांना खरोखरच नरकाची इच्छा आहे असे समजावे. आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशी पद्मा किंवा शयनी या नावाने प्रसिद्ध आहे. ह्रषीकेशाच्या प्रीतीकरता या एकादशीचे उत्तम व्रत जरूर करावे.
 
आता मी तुला या एकादशीची पुराणातील कथा सांगतो. ही कथा ऐकल्यानेही महापापाचा नाश होतो.
 
पूर्वी सूर्यवंशामध्ये मांधाता नावाचा राजा होता. तो चक्रवर्ती, सत्यप्रतिज्ञ व प्रतापी होता. तो आपल्या प्रजेचे पालन धर्माने व स्वतःच्या औरसपुत्राप्रमाणे करीत असे. त्याच्या राज्यात कधीहे दुष्काळ पडत नसे व कोणालाही कसल्याच आधीव्याधी नव्हत्या. त्या राजाच्या कोषागारात अन्यायाने मिळवलेले धन थोडेसुद्धा नव्हते. तो अशाप्रकारे राज्य करीत असताना पुष्कळ वर्षे लोटली.
 
एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात तीन वर्षे पाऊस पडला नाही. त्यामुळे सर्व प्रजाजन वैतागले. व भुकेने आर्त झाले. राज्यात धान्य अजिबात नसल्यामुळे देवयज्ञ, पितृयज्ञ, अग्निहोत्रे व वेदाध्ययन हे सर्व बंद पडले.
 
तेव्हा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि म्हणाले, 'राजा, प्रजेला हिताचे ठरेल असे आमचे बोलणे ऐक. पुराणामध्ये पंडितांनी पाण्याला 'नारा' असे म्हटले आहे. तेथे पाण्यातच राहण्याचे भगवंतांचे घर-आयन-आहे म्हणून तर भगवंतांना नारायण असे म्हणतात. नारायण सर्वांच्या ह्रदयात राहतो. हा भगवान विष्णू पर्जन्यरूपच आहे. पर्जन्याची वृष्टी तोच करतो. त्यातूनच अन्न निर्माण होते व अन्नातूनच प्रजा निर्माण होते.
 
'हे राजा, असा हा पर्जन्य नसेल तर प्रजेचा नाश होतो. तेव्हा नृपश्रेष्ठा, ज्यामुळे पाऊस पडेल व आमचा योगक्षेम चालेल असे काहीतरी कर.'
राजा म्हणाला, 'प्रजाजनांनो, तुम्ही सांगितलेत ते अगदी खरे आहे. अन्न हे ब्रह्मस्वरूपच आहे. सर्व चराचर जग अन्नामुळेच स्थिर आहे. सर्व भूतमात्र-प्राणीमात्र अन्नातूनच निर्माण होतात. जगाचे जीवन अन्नावरच चालते. पुराणात व लोकांच्या तोंडून मी असे ऐकले आहे की, राजांच्या अनाचराम्ळेच प्रजाजनांचे दुःख भोगावे लागते. मी सूक्ष्म बुद्धीने विचार करीत आहे. मी काही पाप केल्याचे मला आढळले नाही. तरीही प्रजाजनांचे हित व्हावे म्हणून मी सर्व प्रयत्न करीन.'
 
राजाने असा विचार केला आणि विधात्याला नमस्कार करून व बरोबर मोठे सैन्य घेऊन तो गहन वनात गेला. तेथे तप करणार्या् श्रेष्ठ मुनींच्या आश्रमांना त्याने भेटी दिल्या. त्यावेळी त्याला ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असलेला अंगिराऋषी दिसला. त्याच्या तेजाने दाही दिशा उजळल्या होत्या. तो जणू दुसरा ब्रह्मदेवच आहे काय, असे वाटत होते.
त्या ऋषीला पाहून मांधाता राजाला आनंद झाला व तो रथातून उतरून त्याच्यापुढे हात जोडून एखाद्या सेवकाप्रमाणे उभा राहिला.
 
त्या ऋषीने राजाला आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन केले व राज्यातील राजा, प्रधान, मित्र, भांडार, देश, किल्ले व सेना या राज्याच्या सात अंगाविषयी कुशल विचारले.
राजाने स्वतःचे कुशल निवेदन करून ऋषीचे कुशल विचारले. नंतर ऋषीने राजाला इकडे वनात येण्याचे कारण विचारले.
 
मुनीला ते कारण सांगताना राजा म्हणाला, 'मुनि श्रेष्ठा, मी स्वधर्माप्रमाणे पृथ्वीचे पालन करीत होतो. तरीही माझ्या राज्यात अनावृष्टी का व्हावी, याचे कारण मला समजत नाही. माझा संशय नाहीसा व्हावा म्हणून मी आपया पायांपाशी आलो आहे. तरी प्रजाजनांचा योगक्षेम चालेल व त्यांचे समाधान होईल असा उपाय सुचवावा.
 
अंगिरा ऋषी म्हणाला, 'राजा, हे कृतयुग सर्व युगात उत्तम आहे असे म्हणतात. या युगात ब्राह्मणधर्म प्रधान आहे आणि धर्माचे चारी चरण संपूर्ण आहेत. या युगात तप करण्याचा धर्म फक्त ब्राह्मणांचा आहे. असे असता, राजा, तुझ्या राज्यात एक शूद्र तप करीत आहे. करू नये असे काम त्याने केल्यामुळे तुझ्या राज्यात मेघ वर्षत नाहीत. तू त्या शूद्राचा वध करण्याचा प्रयत्न कर म्हणजे दोष दूर होईल.'
 
राजा म्हणाला, 'तपश्चर्या करणार्या् त्या शूद्राने माझा काहीच अपराध केलेला नाही. तो निरपराध असताना मी त्याला मारणार नाही. तरी दुष्काळ नाहीसा होण्यासाठी मला एखादा धार्मिक उपाय सांगा.
 
ऋषी म्हणाला, 'राजा, असे असेल तर तू आषाढ शुक्ल पक्षातील पद्मा नावाच्या एकादशीचे व्रत कर. या व्रताच्या प्रभावाने तुझ्या राज्यात निश्चितपणे उत्तम वृष्टी होईल. ही एकादशी सर्व सिद्धी देणारी आहे व सर्व उपद्रवांचा नाश करणारी आहे. राजा, तू आपल्या परिवारासह व प्रजाजनांसह या एकादशीचे व्रत कर.'
 
मुनीचे हे म्हणणे ऐकून राजा घरी परतला. आषाढ महिना आल्यावर त्याने पद्मा (म्हणजेच शयनी) एकादशीचे व्रत केले. ब्राह्मण, वैश्य, शूद्र या चारी वर्णांच्या प्रजाजनांनीही हे व्रत केले.
 
राजा, त्या सर्वांनी असे व्रत करताच मेघांनी वर्षा सुरू केली. सर्व पृथ्वी जलाने भरून गेली. व थोड्या दिवसातच शेते पिकांनी शोभू लागली. ह्रषीकेशाच्या प्रसादाने सर्व लोकांना सौख्य लाभले.
 
याकरिता पद्मा एकादशीचे हे उत्तम व्रत अवश्य करावे. हे व्रत ऐश्वर्य व मुक्ती देणारे व सर्वांना सुखदायक आहे. या एकादशीचे माहात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो.
 
॥याप्रमाणे ब्रह्मांडपुराणातील पद्मा एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले॥
॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥