गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By
Last Updated : मंगळवार, 28 जून 2022 (12:45 IST)

Pandharpur Wari वारीचे महत्त्व

vitthal pandharpur
आषाढी एकादशीच्या दिवशी शेषशायी भगवान श्रीविष्णु शयन करतात आणि कार्तिकी एकादशी जागृत होतात अशी समजुत आहे. आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात. हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.
 
पंढरपूर वारी
वारीची परंपरा ही आठशे वर्षांपेक्षाही अधिक जुनी असल्याचे सांगितले जाते. आजही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करत ही धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपत आहेत. आषाढ आणि कार्तिक या दोन्ही महिन्यातील शुद्ध एकादशीला ही वारी होते. पण आषाढी एकादशीची वारी ही खूपच मोठी आणि महत्त्वाची असते. आळंदीमधून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू या स्थळावरून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते.
 
पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकदशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात. हिलाच आषाढी वारी म्हणतात. विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तीभावे येऊन पोहचतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे. दर आषाढी एकदशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची पंरपरा आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते.
 
पायी वारीची परंपरा बरीच जुनी असल्याचेही सांगण्यात येते. तेराव्या शतकामध्ये ही परंपरा असल्याचे उल्लेख आढळतात. ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा असल्याचे कळून येतं. ज्ञानदेव महाराजांनी भागवत या धर्माची पताका खांद्यावर घेत सर्व जातीपातींच्या लोकांना एकत्रितपणे या वारीच्या सोहळ्यात सामील करून घेतले. हेच व्यापक स्वरूप जपत एकनाथ महाराज, तुकाराम महाराज यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली. एकादशीच्या निमित्ताने नित्यनेमाने न चुकता पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी. नियमित वारी करणार्‍याला वारकरी म्हणतात. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म म्हटलं जातं. वारकरी धर्माला भागवत धर्म असेही म्हटले गेले आहे. वारकर्‍याचं ध्येय केवळ पंढरीचा वास, चंद्रभागेत स्नान आणि विठोबाचे दर्शन असते. हा ध्यास असल्याने वारकरी वारी चुकवत नाही, अशी भागवत संप्रदायाची ठाम धारणा आहे. 
 
इतक्या वर्षांनंतरही आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिला- पुरुषांच्या मनात आदर आणि श्रद्धा याचे स्थान बाळगून आहे. महत्त्वाचं म्हणजे शतकांपासून जागतिक स्तरावरही याचा अभ्यास सुरू आहे. वारीचा अनुभव घेण्यासाठी अनेक जागतिक पातळीवरील अभ्यासक, संशोधकही सहभागी होत असतात. शेतकरी शेतात पेरणी करुन वारीसाठी निघतात. ते घरी पोहचेपर्यंत त्यांच्या शेतात जोमाने वाढ झालेली असते. हे पिकलेले धान्य शेतकऱ्याला जगण्यास अधिक बळ देतं.