बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योग सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 18 फेब्रुवारी 2023 (19:57 IST)

मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी करा व्यायाम

workout
आरोग्याची काळजी नेहमी घेणे गरजेचे असते. आरोग्य चांगले ठेवायचे असेल, तर व्यायामाची अत्यंत गरज असून, नियमित व्यायाम केल्यास मेंदूची कार्यक्षमतादेखील वाढते, असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रत्येकाने नियमित व्यायाम केलाच पाहिजे. विशेष म्हणजे व्यायामाने मेंदूच्या आकारातदेखील बदल होतो. तसेच मेंदूच्या नसांचीही वाढ होते, असे तज्‍ज्ञांचे म्हणणे आहे. मेंदूची कार्यक्षमता वाढल्यास आपोआपच आपल्या दैनंदिन कामाला वेग येऊ शकतो.
 
अर्थात शारीरिक कार्यक्षमता वाढवण्यासाठीही व्यायामाची गरज आहे, असे म्हटले तरी वावगे ठरू शकत नाही. त्यामुळे नियमित व्यायामावर भर दिला पाहिजे. इलिनोस विद्यापीठातील वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनातून हा निष्कर्ष पुढे आला आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासातून वरील निष्कर्ष पुढे आला आहे. व्यायामातून मेंदूच्या कार्यक्षमतेत तर वाढ होतेच. शिवाय मेंदूच्या आकारातही बदल होतो. तसेच मेंदूच्या नसांच्या पेशीची वाढ होते. त्यामुळे रक्तपुरवठाही सुधारतो. त्यातून न्यूरो रसायानाची निर्मिती वाढल्याने मेंदूच्या पेशी अधिक सुदृढ होतात.
 
व्यायामामुळे मेंदूच्या आरोग्यावरही परिणाम होतो. एरोबिक व्यायामामुळे मेंदूच्या महत्त्वाच्या भागांना फायदा होतो. यामुळे सर्वच क्षेत्रात निर्णय घेण्याची क्षमता तर वाढतेच, शिवाय नियोजन आणि योग्य, अयोग्य अटींना लवकरच ओळखणे आणि निर्णय घेणे सोपे जाते. विशेषत: मेंदूच्या संरचनेत बदल झाल्याने स्मृतीही वाढते. एकूणच मानवी हालचालीच बदलून जातात आणि कोणत्याही कार्याला तेवढाच वेग येतो. त्यामुळे व्यायामावर अधिक लक्ष केंद्रीत केले पाहिजे.