गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 मे 2019 (18:08 IST)

गांधीहत्या आणि RSS : नथुराम गोडसे त्या दिवशी 'संघात' होता की नव्हता?

- रजनीश कुमार
महात्मा गांधी यांची हत्या झाली तो दिवस 30 जानेवारी 1948. तेव्हापासून आजपर्यंत एक प्रश्न सतत चर्चेत येतो तो म्हणजे गांधी यांची हत्या झाली त्या दिवशी नथुराम गोडसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य होता का? या अनुषंगाने वेळोवेळी आरोपप्रत्यारोप झाले आहेत आणि हा वाद कोर्टातही पोहोचला आहे.
 
"संघाच्या लोकांनीच गांधीजींवर गोळ्या झाडल्या आणि आज हेच लोक गांधींविषयी बोलत आहेत," असा आरोप 2014च्या लोकसभा निवडणुकीत प्रचारावेळी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता.
 
6 मार्च 2014 रोजी भिवंडीतल्या एका प्रचारसभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गांधीच्या हत्येला संघच जबाबदार असल्याचा दावा केला होता.
 
राहुल गांधी यांच्या या आरोपानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला. 2016 साली याप्रकरणी भिवंडीतील न्यायालयाने राहुल यांना जामीनही मंजूर केला.
 
मात्र अजून हे प्रकरण निवळलेले नाही. 12 जून 2018 रोजी राहुल गांधींनी भिवंडी न्यायालयात हजेरी लावली. आपण कोणताही गुन्हा केला नाही, असे त्यांनी न्यायालयात सांगितले. यानंतर राहुल गांधी यांच्याविरोधात खटला चालवण्याचे निर्देश न्यायाधीशांनी दिले आहेत.
 
"ही विचारप्रणालीची लढाई आहे. मी कुणालाही घाबरत नाही, त्यामुळे मागे हटणार नाही," अशी भूमिका त्यांनी मांडली.
 
याआधी 2016मध्ये या खटल्याचा एफआयआर रद्द करण्याची मागणी एका याचिकेद्वारे राहुल यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. मात्र काहीच दिवसात त्यांनी ही याचिका मागे घेतली. संघाशी दोन हात करण्यासाठी आपण न्यायालयीन लढाई लढणे पसंत करू, असे त्यांनी जाहीर केले.
 
राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत सार्वजनिकरीत्या माफी मागितली तर त्यांच्याविरोधातील खटला मागे घेऊ अशी तयारी संघाने दर्शवली आहे. पण दुसरीकडे राहुल गांधी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
 
गांधींजींची हत्या कुणी केली याबाबत काही संभ्रम नाही. वादविवादाचा मुद्दा हा आहे की हत्या करणाऱ्याचा संघाशी काही संबंध आहे अथवा नाही?
 
गांधीजींची हत्या कुणी केली होती?
30 जानेवारी 1948 रोजी दिल्लीतील बिर्ला भवन येथे संध्याकाळच्या प्रार्थनेसाठी महात्मा गांधी निघाले होते. त्याचदरम्यान नथुराम गोडसे या युवकाने त्यांच्यावर गोळी झाडली.
 
केंद्र सरकारच्या आदेशानुसार, गांधीजींच्या हत्येसंबंधीच्या सुनावणीसाठी लाल किल्ल्यावर एका विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली. येथेच झालेल्या न्यायालयीन सुनावणीत 8 जणांना दोषी ठरवण्यात आले. गोडसे आणि हत्येचा कट रचणाऱ्या नारायण आपटे या दोघांना 15 नोव्हेंबर 1949 रोजी फाशी देण्यात आली.
 
नथुरामने गांधीजींची हत्या का केली?
'गांधी वध क्यों' या पुस्तकात नथुरामचे भाऊ गोपाळ गोडसे यांनी लिहिलं आहे, "देशभक्ती जर पाप असेल तर मी मानतो, मी या पापाचा धनी आहे. मात्र जर देशभक्ती हा अभिमान असेल तर या अभिमानाचा मी पाईक आहे, असे मला वाटते. मला विश्वास आहे, मानवजातीच्या वर जर एखादी न्यायव्यवस्था असेल, तर त्या न्यायालयात माझ्या कृतीला गुन्हा समजलं जाणार नाही. देशासाठी आणि जातीच्या भल्यासाठी मी हे कार्य केले आहे. ज्या व्यक्तीवर मी गोळी झाडली, त्यांच्या भूमिकेमुळे माझ्या हिंदू बांधवांवर घोर संकट कोसळले. हिंदूंची हानी झाली."
 
नथुराम गोडसे एकेकाळी संघाचा कट्टर समर्थक होता, मात्र नंतर त्यांने हिंदू महासभेत जाणे पसंत केले होते. मात्र 8 सप्टेंबर 2016 रोजी इकॉनॉमिक टाइम्स या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत नथुरामच्या परिवारातील सदस्यांनी मोठा गौप्यस्फोट केला. "नथुराम गोडसेने कधीही संघाशी संबंध तोडले नव्हते, तसेच त्यांना संघातून काढूनही टाकण्यात आले नव्हते," असा दावा त्यांनी केला.
 
नथुराम गोडसे आणि विनायक दामोदर सावरकर यांचे वंशज सत्याकी गोडसे यांनी इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला.
 
"सांगलीत असताना 1932 साली नथुराम यांनी संघपरिवारात प्रवेश केला होता. हयातीत असेपर्यंत ते संघाचे बौद्धिक कार्यवाह होते. त्यांनी कधीही संघाला सोडचिठ्ठी दिली नव्हती वा त्यांना संघातून बेदखल करण्यात आले नव्हते," असा दावा त्यांनी केला आहे.
 
गांधीजींची हत्या आणि संघ
महात्मा गांधी यांच्या हत्येचे धागे संघाशी जोडले जातात. 'महात्मा गांधी : लास्ट फेज' या नवजीवन प्रकाशन, अहमदाबाद येथून प्रकाशित झालेल्या पुस्तकात गांधीजींचे खासगी सचिव असलेल्या प्यारेलाल नय्यर, पान क्रमांक-70 वर लिहितात "शुक्रवारी चांगली बातमी मिळणार, असे सांगून काही ठिकाणच्या संघाच्या कार्यकर्त्यांना त्यादिवशी रेडीओ सुरू ठेवण्याचे सुतोवाच करण्यात आले होते. तर काही ठिकाणी संघाच्या कार्यकर्त्यांनी मिठाई वाटली होती."
 
गांधीजींच्या हत्येच्या दोन दशकांनंतर संघाचे मुखपत्र असलेल्या 'ऑर्गनायजर'च्या 11 जानेवारी 1970च्या अग्रलेखात लिहिलं आहे, "नेहरूंनी पाकिस्तानचे उघड समर्थन केल्याचा आणि गांधींनी पुन्हा एकवार उपोषणाचे हत्यार उपसल्याचा प्रचंड असंतोष जनतेमध्ये होता. अशावेळी नथुराम गोडसे लोकभावनेचे प्रतिनिधित्व करत होता. गांधीजींची हत्या ही जनतेच्या आक्रोशाची अभिव्यक्ती होती."
 
गांधीजींच्या हत्येसंबंधी आणखी काही तपशील समोर आल्यानंतर सरकारने 22 मार्च 1965मध्ये एका चौकशी आयोगाची स्थापना केली. 21 नोव्हेंबर 1966 रोजी या आयोगाची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश जे. एल. कपूर यांच्याकडे होती.
 
गांधीजींच्या हत्येनंतर समाजवादी नेते जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया आणि कमलादेवी चटोपाध्याय यांनी पत्रकार परिषद घेऊन 'गांधींच्या हत्येमागे कुणा एका व्यक्तीचा हात नसून यामागे एका मोठ्या कटकारस्थानाचा आणि संघटनेचा सहभाग आहे,' असा दावा केला होता.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभा आणि मुस्लीम लीग या संघटनांचे नावही त्यांनी घेतले होते. कपूर आयोगाने सादर केलेल्या अहवालात या दाव्याची दखल घेण्यात आली आहे.
 
गांधींच्या अंत्यविधीनंतर, ताबडतोब 31 जानेवारी रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी आणि पोलीस यंत्रणेतील वरिष्ठ उपस्थित होते. मात्र संघ अर्थात आरएसएस आणि हिंदू महासभा यांना या बैठकीपासून लांब ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
'लेट्स कील गांधी' या त्यांच्या पुस्तकात गांधींचे पणतु तुषार गांधी यांनी लिहिले आहे, "तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांची कन्या मणिबेन पटेल यांनी कपूर आयोगाला असे सांगितले की, बैठकीपासून दूर ठेवण्यात आल्याच्या दुसऱ्याच दिवशी, सकाळी संघाचे काही उच्चपदस्थ त्यांच्या वडिलांची भेट घेण्यास आले होते. 1 फेब्रुवारी 1948 रोजीही संघाचे लोक, पटेलांना भेटण्यासाठी आले आणि गांधीजींच्या हत्येशी संघाचा काहीएक संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला होता"
 
संघाला मंत्रिमंडळाच्या बैठकीपासून लांब ठेवण्याचा निर्णय लीक झाला. कपूर आयोगाला एका साक्षीदाराने दिलेल्या साक्षीचा हवाला घेत तुषार गांधी आपल्या पुस्तकात लिहितात- 'बैठकीपासून लांब ठेवले गेल्याचा निर्णय कानावर पडताच, संघाचे नेते भूमिगत झाले. फेब्रुवारी 1948 ते जुलै 1949 पर्यंत ही बंदी कायम होती.'
 
कपूर अहवालात सरदार पटेल यांची कन्या मणिबेन पटेल यांचाही जबाब साक्षीदार म्हणून नोंदवण्यात आला. त्या होत्या साक्षीदार क्रमांक 79. त्यांनी कपूर आयोगाला पुढील माहिती दिली, "गांधीजींच्या हत्येसाठी सरदार पटेलच जबाबदार असल्याचा आरोप जयप्रकाश नारायण यांनी एका बैठकीत अगदी जाहीररीत्या केला. बैठकीला मौलाना आझादही उपस्थित होते. मात्र त्यांनी जयप्रकाश यांचे आरोप खोडून काढण्याचा किंवा त्याला विरोध करण्याचा साधा प्रयत्नही केला नाही. माझ्या वडिलांसाठी हा मोठा धक्का होता."
 
कपूर आयोगाने गांधीजींच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन पोलीस अधिकारी जेटली यांची चौकशी केली. गांधीजी जेव्हा जिल्ह्यांच्या दौऱ्यावर जात तेव्हा त्यांना कशाप्रकारे सुरक्षा दिली जात असे यावर आयोगाने स्पष्टीकरण मागितले. त्यावर जेटली यांनी खुलासा केला, "सुरक्षा देण्यासाठी स्थानिक पोलिसांचा समावेश केला जात नसे. मात्र राजकीय खबरदारी म्हणून, साध्या वेशातल्या पोलिसांना गांधीजींच्या आसपास तैनात केले जात असे."
 
"हत्येच्या घटनेपूर्वी संघकार्यकर्त्यांकडून जप्त करणाऱ्यात आलेली शस्त्रे मी महात्मा गांधींना दाखवली होती. इतकेच नाही तर संघाकडून काही गंभीर घातपातीची शक्यता असल्याचेही गृहमंत्री सरदार पटेल यांच्या कानावर घातले होते. त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला होता," असा अधिकचा खुलासा जेटली यांनी आयोगाकडे नोंदवला होता.
 
राजस्थानातील अलवर जिल्ह्यातील घटनाक्रमाचा कपूर आयोगाच्या चौकशी अहवालात तपशीलवार उल्लेख आहे. एक परदेशी नागरिक साधूचा पोशाख धारण करून स्थानिक हिंदू महासभेचा सचिव गिरधर सिद्धा याच्याबरोबर राहात होता.
 
या परदेशी नागरिकाच्या चौकशीदरम्यान त्याने दिलेली माहिती धक्कादायक होती. 'गांधीजींच्या हत्येसंदर्भातला एक कागद अलवरमध्ये दुपारी तीन वाजताच छापण्यात आला होता. गांधीजींची हत्या मात्र त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजून 17 मिनिटांनी झाली होती. संघाच्या काही कार्यकर्त्यांनी आनंदाच्या भरात मिठाई वाटली होती आणि सहलीची आनंदही लुटला,' असा उल्लेख यात आहे. (तुषार गांधी, पृष्ठ 770)
 
17 जानेवारी 1948 रोजी या खटल्यातील आठवा आरोपी डॉ. दत्तात्रेय सदाशिव परचुरे यांनी आपली 15 पानी साक्ष न्यायालयापुढे सादर केली. "मी नथुराम गोडसे याला आधीपासून ओळखत होतो. तो संघाच्या मुख्य संघटनकर्त्यांपैकी एक होता. तो प्रखर देशभक्त होता, 'हिन्दू राष्ट्र' नावाचे दैनिक तो चालवत असे," अशी माहिती त्यांनी न्यायालयाला दिली.
 
'संघ आता गांधीवादी झाला आहे'
नथुराम गोडसे यांचे बंधू गोपाळ गोडसे यांनी 28 जानेवारी, 1994 रोजी फ्रंटलाइन मासिकाला दिलेल्या सविस्तर मुलाखतीत सांगितले होते," आम्ही सगळे भाऊ संघाचे कार्यकर्ते होतो. नथुराम, दत्तात्रेय, मी स्वतः आणि गोविंद. किंबहुना आम्ही घरात नाही तर संघातच लहानाचे मोठे झालो, वाढलो असेही तुम्ही म्हणू शकता. संघ हाच आमचा परिवार होता. नथुराम पुढे संघाचा बौद्धिक कार्यवाह म्हणून काम पाहू लागला. नथुरामने आपल्या चौकशीदरम्यान, संघ सोडल्याचे सांगितले होते. मात्र गांधीजींच्या हत्येनंतर गोळवलकर गुरूजी आणि संघ परिवार अडचणीत येऊ नये म्हणून त्याने हा जबाब नोंदवला होता. वास्तविक नथुरामने संघाला कधीही सोडचिठ्ठी दिली नव्हती."
 
याच मुलाखतीत गोपाळ गोडसेंना लालकृष्ण अडवाणी यांच्या वक्तव्याबाबतही बोलते करण्यात आले. नथुरामचे कोणतेही संघ कनेक्शन नसल्याचा दावा आडवणींनी केला होता. याप्रकरणी गोपाळ गोडसे म्हणाले, "आडवणींचे वक्तव्य भ्याडपणाचे आहे. 'जा आणि गांधीजींची हत्या करा,' असा कोणताही ठराव संघाने मंजूर केला नव्हता, असे तुम्ही म्हणू शकता पण नथुरामच्या संघाशी असलेल्या संबंधांना तुम्ही नाकारू शकत नाही. हिंदू महासभेने काय सांगितले ते पुन्हा एकदा तपासा. संघाचे बौद्धिक कार्यवाह राहून 1944मध्ये हिंदू महासभेसाठीही नथुरामने काम करण्यास सुरुवात केली," असे त्यांनी सांगितले होते.
 
हिंदू महासभेचे सध्याचे सरचिटणीस मुन्ना कुमार शर्मा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले, "आरएसएस अर्थात संघ आता गांधीवादी झाला आहे. त्यांना आता नथुरामची अडचण होते आहे. मात्र सत्य हे आहे की नथुराम आमचा होता, तो संघाचा होता. मात्र आता ते हे स्वीकारायला तयार नाहीत." त्याकाळी संघ आणि हिंदू महासभा फार वेगळ्या संघटना नव्हत्याच मुळी, असा दावाही शर्मा यांनी केला.
 
गांधीजींच्या हत्येनंतर एका तरुणाने पटेलांना पत्र लिहले होते. त्यात लिहिले होते, "अनेक ठिकाणी आधीपासूनच संघाने अशा वार्ता पसरवल्या होत्या की चांगली बातमी येणार आहे, त्यासाठी शुक्रवारी रेडीओ सुरू ठेवा. हत्या झाल्याच्या वृत्तानंतर संघाच्या शाखांमध्ये मिठाईचे वाटप करण्यात आले." (तुषार गांधी, लेट्स कील गांधी, पान क्रमांक 138)
 
सप्टेंबर 1948मध्ये संघाचे तत्कालीन प्रमुख माधव सदाशिव गोळवलकर यांनी गृहमंत्री पटेल यांना पत्र लिहिले. संघावर बंदी घालण्याच्या निर्णयाला त्यांनी कडाडून विरोध केला.
 
उत्तरादाखल सरदार पटेलांनी गोळवलकरांना 11 सप्टेंबर 1948 रोजी पत्र लिहिले, "संघाने निश्चितच हिंदू समाजाची सेवा केली आहे, मात्र सुडाच्या भावनेने संघाने कायम मुसलमानांना लक्ष्य केले आहे. ही भूमिका अडचणीची आहे. तुमच्या सर्व भाषणांमध्ये सांप्रदायिक विषाची बीजे रोवलेली असतात. याचा थेट परिणाम म्हणून गांधींना आपले बलिदान द्यावे लागले. गांधीजींच्या हत्येनंतर संघपरिवाराने सण साजरा केला, मिठाईचे वाटप केले असे आढळून आले. या सर्व घटनांमुळे संघावर बंदी आणणे आवश्यक झाले होते."
 
16 ऑगस्ट 1949 रोजी गोळवलकरांनी पटेलांची भेट घेतली. या भेटीबाबत पटेलांनी नेहरूंना सविस्तर लिहून कळवले," त्यांनी (संघाने) काय चूक केली आहे, हे मी गोळवलकरांना सांगितले, जी चूक व्हायला नको होती. अशा विध्वंसक कारवायांपासून संघाने लांब राहायला हवे आणि काही ठोस कार्य करण्याकामी योगदान द्यावे अशा स्पष्ट शब्दात मी त्यांना सुनावले आहे."
 
सरदार पटेल आणि संघ
या घटनेच्या काही महिन्यांपूर्वी जयपूर येथे पटेल यांनी संघावर तीव्र टीकास्त्र सोडले होते. "आम्ही संघाला किंवा आणखी कोणत्या धार्मिक संघटनेला देशाला पिछाडीवर नेण्याची परवानगी देऊ शकत नाही. मी एक सैनिक आहे आणि देशाची विभागणी करणाऱ्या शक्तींविरोधात मी लढणार. माझ्या मुलाने जरी यात सहभाग नोंदवला तर त्याचीही गय केली जाणार नाही."
 
याचप्रकारे 6 जानेवारी 1948 रोजी लखनऊमध्ये मुस्लिमांना संबोधित करताना पटेलांनी त्यांना थेट सवाल केला होता, "काश्मीरमध्ये झालेल्या पाकिस्तानी हल्ल्याचा तुमच्याकडून निषेध का झाला नाही? तुम्ही एकाचवेळी दोन्ही दगडांवर पाय ठेऊ शकत नाही. कोणत्याही एकाच पर्यायाचा स्वीकार तुम्हाला करावा लागेल. ज्यांना पाकिस्तानात जायचे आहे, त्यांनी तेथे खुशाल जावे आणि सुखी रहावे."
 
गांधीजींच्या हत्येसंदर्भात सरदार पटेलांवर अनेक प्रकारच्या प्रश्नांची सरबत्ती केली जात होती. संसदेतही त्यांना कडव्या प्रश्नांचा सामना करावा लागला. दुसरीकडे लाल किल्ल्यावर या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणीही सुरू होती.
 
8 नोव्हेंबर 1948 रोजी न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली, मुख्य अभिवक्ते चंद्र किशन दफ्तरी यांनी याप्रकरणी आणखी कोणताही पुरावा वा साक्षीदार सादर करायची नसल्याचे सांगितले. यानंतर न्यायालयाने नथुरामला काही बोलायचे आहे का, अशी विचारणा केली.
 
नथुरामने सांगितले त्याला त्याचा 93 पानी जबाब वाचून दाखवायचा आहे. नथुरामने सकाळी सव्वा दहा वाजता आपले निवेदन वाचायला सुरुवात केली. वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी त्याने, हे निवेदन सहा भागांमध्ये वाचणार असल्याचे सांगितले. निवेदनाच्या अखेरचा हिस्सा 'राष्ट्रविरोधी लागुलचालनाच्या राजकारणा'वर आधारित असेल असे त्याने स्पष्ट केले. मात्र न्यायालयीन दस्तावेजांमध्ये हे निवेदन ठेवण्याची गरज नाही असा आग्रह दफ्तरींनी केला. (तुषार गांधी, लेट्स कील गांधी, पान क्रमांक 607)
 
त्यांनी सांगितले की त्यांच्या या भागातील निवेदनाचा खटल्याशी काहीही संबंध नाही. नथुराम आपले निवेदन वाचत होता, अकरा वाजले असतील, अचानक चक्कर आल्याने तो खाली कोसळला. थोडा आराम केल्यानंतर त्याने पुन्हा निवेदन वाचण्यास सुरुवात केली. नथुराम जवळपास 5 तास त्याचे निवेदन सादर करत होता. निवेदनाच्या शेवटी त्याने खड्या आवाजात नारा दिला "अखंड भारत अमरे रहे, वंदे मातरम् ...त्या दिवशी न्यायालय खचाखच भरलेले होते."
 
दिवस- 10 फेब्रुवारी 1949...वेळ सकाळी साडे अकराची. न्यायाधीश आत्मचरण यांनी गांधीजींच्या हत्येप्रकरणाच्या खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यावर निकाल जाहीर केला. नथुराम गोडसे आणि नारायण दत्तात्रय आपटे या दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
 
विष्णू करकरे, मदनलाल पाहवा, शंकर किस्तय्या, गोपाळ गोडसे आणि डॉ. दत्तात्रेय सदाशिव परचुरे यांना आजीवन तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
 
न्यायालयाने विनायक दामोदर सावरकरांना निर्दोष सिद्ध केले आणि तात्काळ त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले. निकालाची घोषणा झाल्यावर या सगळ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि 'हिन्दू धर्म की जय... तोड़ कर रहेंगे पाकिस्तान... हिन्दू हिन्दी हिन्दुस्तान.' असे नारे दिले.
 
ज्यांना उच्च न्यायालयात दाद मागायची आहे, त्यांनी 15 दिवसांच्या आत अर्ज करावा, असे न्यायाधीश आत्मचरण यांनी निकाल जाहीर केल्यानंतर सांगितले. सर्व दोषींनी पंजाब उच्च न्यायालयात चार दिवसांत अर्ज सादर केला.
 
तुषार गांधी यांनी आपल्या 'लेट्स कील गांधी' या पुस्तकात लिहले आहे, "गांधीजींच्या हत्येप्रकरणी सावरकरांच्या निर्दोष सुटकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. सावरकरांच्याविरोधात नीट तपास झाला नाही अशी चर्चा होती. पटेलांनीही हे स्वीकारल्याचे दिसते की सावरकरांना दोषी ठरवले असते मुसलमानांसाठी ती अडचण ठरली असती आणि हिंदूंच्या रोषाला सांभाळणे अशक्य झाले असते." (पान क्रमांक 732)
 
तुषार गांधी विस्ताराने पुढे मांडतात, "सावरकरांना शिक्षा झाली असती तर कट्टर हिंदुत्ववाद्यांकडून उग्र प्रतिक्रिया उमटली असती असे पटेलांचे मत होते आणि काँग्रेसला या असंतोषाची पुरती धास्ती होती. सावरकरांचा गांधी हत्येशी काही संबंध नाही, हे स्वीकारण्यास चौकशी अधिकारी नागरवाला यांनी साफ नकार दिला होता. हे मात्र विसरता येणार नाही."
 
एकूणच गांधींजीच्या हत्येसंदर्भांत राहुल गांधी यांनी केलेले आरोप आणि त्यांच्यावरील न्यायलयीन खटला यात इतिहासातील कोणकोणत्या बाबींचा समावेश केला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.