गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी माझी, मी राजीनामा देतोय: राहुल गाँधी

लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्याच्या जवळपास दोन महिन्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला आहे.
 
या आधीही त्यांनी अनेकदा राजीनामा देण्याची शिफारस केली होती. मात्र काँग्रेस नेत्यांनी एकमुखाने त्याला नकार दिला होता. आज मात्र राहुल गांधीनी राजीनामा देत राजीनाम्याचं पत्र ट्विटरवर टाकलं आहे. 
 
महिनाभराच्या चर्चेनंतर आज राहुल गांधी यांनी अधिकृतपणे ट्विटरवर आपला काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या चार पानी राजीनाम्यामध्ये राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाची सेवा केल्याचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे.
 
त्याआधी, काँग्रेसच्या विद्यमान आणि माजी मुख्यमंत्र्यांबरोबर राहुल गांधी यांनी बैठक घेतली. बैठकीच्या सुरूवातीला राहुल गांधी यांनी आपण राजीनामा मागे घेत नसल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांवरही जोरदार टीका केली.
 
ते म्हणाले जर लोकांमध्ये जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेतली असती तर काँग्रेसचे असे हाल झाले नसते.
 
राहुल गांधी यांनी 25 मे रोजीच लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेत राजीनामा दिला होता.
 
तेव्हापासून आजपर्यंत काँग्रेसमधले बडे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती करत होते.
 
आपल्या राजीनाम्यात राहुल गांधी म्हणाले, " आपली मूल्यं आणि आदर्शांच्या माध्यमातून या सुंदर देशाची सेवा करणाऱ्या काँग्रेस पक्षात काम केल्याचा मला अभिमान आहे. आजपर्यंत मला मिळालेल्या प्रेमाबद्दल मी देशाचा आणि पक्षाचा ऋणी राहीन."
 
काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्याने 2019 लोकसभा निवडणुकीतल्या पराभवासाठी मी जबाबदार आहे. त्यामुळे मी पदाचा राजीनामा दिला असून काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीसाठी हे महत्त्वपूर्ण आहे, असंही त्यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलं आहे.
 
"पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. संबंधित पदाधिकाऱ्यांनीही 2019 च्या निवडणुकीतील अपयशाची जबाबदारी घ्यावी."
 
त्यांनी लिहिलं, "माझ्या अनेक सहकाऱ्यांनी पुन्हा मी काँग्रेस अध्यक्ष व्हावे असा सल्ला दिला. मात्र सध्या कुणीतरी नव्या व्यक्तीने पक्षाचं नेतृत्व करणं आवश्यक आहे, पण मी त्या व्यक्तीची निवड करणं योग्य नसेल."
 
का दिला राहुल गांधींनी राजीनामा
 
2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला होता. यावेळी सत्ता मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसला फक्त 52 जागांवर समाधान मानावं लागलं.
 
इतकंच नाही तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी स्वतःचा बालेकिल्ला असणाऱ्या अमेठीतही हरले. हा पराभव राहुल यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता.
 
यानंतर काँग्रेसचे इतर वरिष्ठ नेते राजीनामा देतील अशी त्यांची अपेक्षा होती मात्र असं काही झालं नाही.
 
जेष्ठ पत्रकार अपर्णा द्विवेदी म्हणतात की, मुळात काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी या पराभवाची जबाबदारी घ्यावी आणि पक्षाच्या पदांचा राजीनामा द्यावा, अशी राहुल यांची इच्छा होती.
 
पक्ष संघटनेत परिवर्तनाची गरज असल्याचं मत राहूल गांधी यांनी वारंवार व्यक्त केलं. हे परिवर्तन ते आपल्या राजीनाम्यापूर्वीच करणार होते.
 
"पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी दिलेले सगळे सल्ले राहुल यांनी ऐकले. त्यांनी सांगितेलेल्या उमेदवाराला पक्षानं तिकीट दिलं पण लोकसभा निवडणुकीत त्यांचे उमेदवार काहीच खास करू शकले नाही, अशी राहूल गांधी यांची तक्रार आहे," त्या पुढे सांगतात.
 
इतकं असूनही पक्षाचे नेते आपली पदं सोडायला तयार नाहीत.
 
पक्षाच्या तिकीटवाटपात घराणेशाहीचा मुद्दा महत्त्वाचा होता. राहुल गांधी यांनी याबाबत मुख्यमंत्री बैठकीत स्पष्टपणे मत मांडलं.
 
महाराष्ट्रात काँग्रेसने 10 जागांवर विजयाचा दावा केला होता. पण त्यांना फक्त एका जागेवर विजय मिळाला. हा विजयी उमेदवारसुद्धा ऐनवेळी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाला होता.