शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 20 मे 2019 (09:44 IST)

मतदान टाळण्यासाठी आदल्या दिवशीच बोटाला शाई

उत्तर प्रदेशातील चंडौली मतदारसंघातल्या ताराजीवनपूर गावातील एका दलित वस्तीत जाऊन भाजप कार्यकर्त्यांनी शनिवारी रात्रीच काही मतदारांच्या बोटांना शाई लावून वर 500 रूपये लाच दिली. त्यांना मतदान करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, अशी सप-बसपनं तक्रार केली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
 
भाजप कार्यकर्ते या वस्तीत गेले आणि लोकांना तुम्ही कुणाला मतदान करणार असे विचारलं. त्यांनी भाजपला मत देणार नाही, असं सांगितल्यानंतर त्यांच्या बोटाला शाई लावून प्रत्येकी पाचशे रुपये लाच देण्यात आली, असा आरोप आहे. याच्या निषेधार्थ ताराजीवनपूरमधल्या समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यासमोर निदर्शनं केली.
 
दरम्यान मतदारांच्या बोटाला मतदान न करताच बळजबरीने शाई लावण्यात आली असली तरी ते मतदान करू शकतात, शिवाय जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं स्थानिक प्रशासनानं सांगितलं.
 
भाजपन मात्र हे आरोप फेटाळले असून हा विरोधकांनी केलेला बदनामीचा डाव असल्याचा आरोप केला आहे.