सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : मंगळवार, 21 जून 2022 (12:44 IST)

एकनाथ शिंदे नाराज का आहेत? ही आहेत 4 संभाव्य कारणं

eknath shinde
विधान परिषद निवडणुकांच्या निकालानंतर चर्चेचा रोख नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नॉट रिचेबल असण्याकडे वळली. संध्याकाळनंतर एकनाथ शिंदे कोणाच्याच संपर्कात नसल्याची चर्चा सुरू झाली.
 
मंगळवारी सकाळी एकनाथ शिंदे सूरतला असल्याची बातमी थडकली आणि महाविकास आघाडीचं काय होणार हा प्रश्न उपस्थित झाला.
 
शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक असलेले एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात विधान परिषदेच्या निवडणुकांवरून बेबनाव निर्माण झाल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं होतं. मात्र शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्तच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी योग्य समन्वय असल्याचं सांगितलं. गद्दार नकोत असं विधानही त्यांनी केलं होतं.
 
विधान परिषदेसाठीच्या निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटल्याने पक्षांतर्गत फूट पडल्याची चर्चा सुरू झाली. त्यातच एकनाथ शिंदे राज्याबाहेर आणि त्यातही गुजरातला रवाना झाल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलं.
 
अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेंचं नाव मुख्यमंत्री म्हणून शर्यतीत होतं. पण राजकीय समीकरणं बदलली आणि खुद्द उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री झाले.
 
1. भाजपशी चांगले संबंध, भविष्याचा विचार
 
लोकसत्ताचे राजकीय संपादक संतोष प्रधान यांनी सांगितले की भाजपचे आणि शिंदेंचे चांगले संबंध आहेत.
 
"ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, देवेंद्र फडणवीस यांच्याशी एकनाथ शिंदेंचे चांगले संबंध आहेत. शिवसेनेनं भाजपबरोबर जावं असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे खासदार आहेत. येत्या काळात ते भाजपविरुद्ध लढले तर जिंकण्याची शक्यता कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत शिंदे यांनी स्वत:बरोबरंच मुलाच्या करिअरचाही विचार केला असावा," असं लोकसत्ताचे राजकीय संपादक संतोष प्रधान यांनी सांगितलं.
 
ते पुढे म्हणाले, "एकनाथ शिंदेंकडे नगरविकास खातं आहे. पण निधीसंदर्भात या खात्याला फारसा लाभ झालेला नाही. शिवसेनेत एखादा नेता मोठा होऊ लागला की त्याचे पंख छाटले जातात. जे आनंद दिघेंचं झालं ते एकनाथ शिंदेचं झालं. एकनाथ शिंदेंचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत ठाण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. ठाण्याचे पालकमंत्री असलेले एकनाथ शिंदे भागवत यांची भेट घेण्यासाठी आवर्जून थांबले होते."
 
2. काम करूनही श्रेय नाही याची नाराजी?
 
"काही दिवसांपूर्वी मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्याचं व्यवस्थापन खासदार संजय राऊत आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे होतं. इतक्या मोठ्या नेत्याला दौऱ्याच्या व्यवस्थापनाचं काम देण्यात आलं याची नाराजी होती. दौऱ्यादरम्यान संजय राऊत सातत्याने दिसत होते. शिंदे यांच्यासाठी हे कमीपणा आणणारं होतं," असं राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी सांगितलं.
 
ते पुढे म्हणाले, "शिवसेना वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात एकनाथ शिंदे बोलले नाहीत. महत्त्वाचे नेते असूनही त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं नाही. शिवसेनेचे नेते भाजपबद्दल, केंद्रीय तपास यंत्रणांच्या वापराबद्दल सातत्याने बोलत असतात. एकनाथ शिंदे मात्र यासंदर्भात आक्रमकपणे टीका करताना दिसत नाहीत. सरकारमधले लोक याबाबत बोलत का नाहीत अशी नाराजी संजय राऊत यांनी व्यक्त केली होती".
 
3. शंका निरसन झाले नाही
"कोरोना काळात तसंच आजारपणाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नॉट रिचेबल होते. एकनाथ शिंदे यांच्याकडे नेहमीच संशयाने बघितलं गेलं. मध्यंतरी त्यांनी शक्तिप्रदर्शन केलं होतं. शिंदे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या शंकांचं निराकरण करून त्यांना सन्मान द्यायला हवा होता. तसं झालं नाही," देसाई सांगतात.
 
"संजय राऊत दररोज प्रसारमाध्यमांशी बोलतात पण ते निवडून आलेले नेते नाहीत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुख्यमंत्री प्रदीर्घ काळ घरी होते. समोर भाजपसारखा विरोधी पक्ष आहे. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदेंना विश्वासात घेऊन मोठी जबाबदारी द्यायला हवी होती. पण तसं झालं नाही", असं देसाई यांनी सांगितलं.
 
"समृद्धी महामार्गाला सुरुवातीला शिवसेनेचा विरोध होता. पण एकनाथ शिंदे याप्रकल्पाविरोधात कधीही भाष्य केलं नाही. सत्तेत आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या खात्याने विक्रमी वेळेत या महामार्गाचं काम पूर्ण केलं. या कामाचं श्रेय शिंदे यांना किंवा त्यांच्या खात्याला देण्यात आलं नाही. शिंदे यांचे देवेंद्र यांच्याशी चांगले संबंध आहेत. भाजप नेत्यांशीही त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध आहेत," असं देसाई यांना वाटतं.
 
4. अपेक्षाभंगाचे दुःख
एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी होते पण उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार म्हटल्यावर त्यांचे नाव मागे पडल्याचे देसाई सांगतात.
 
"उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत होतं. त्यांच्यासाठी तो अपेक्षाभंगच होता. पण त्यांनी ते स्वीकारलं. कमी बोलणारे पण जास्त काम करणारे अशी त्यांची प्रतिमा आहे. पण दुसरीकडे संजय राऊत यांना लोकाश्रय नाही पण ते सतत बोलत असतात. यामुळे पक्षाचं नुकसान होतंय अशी एकनाथ यांना वाटत होतं," असं देसाई म्हणाले.
 
"एकनाथ शिंदे यांना आमदारांची साथ आहे. निधी मिळत नाही, कामं होत नाही अशी टीका शिवसेनेच्या अन्य आमदारांनी, नेत्यांनी केली होती. त्या सगळ्यांची साथ एकनाथ शिंदेंना मिळाली तर मोठं संख्याबळ त्यांच्याकडे असू शकतं," असेही देसाई सांगतात.