रॉक्सी गागदेकर छारा
गुजरात विधानसभा निवडणुका फार दूर नाहीत. अशा परिस्थितीत गेल्या 20 वर्षांत गुजरातमध्ये झालेल्या विकासाची चर्चा प्रसारमाध्यमांध्यांत सुरू आहे.
विरोधी पक्षनेते आणि भाजपच्या माजी नेत्यांनी यावर निराशा व्यक्त करत हा मोदींच्या प्रचाराचा भाग आहे असं म्हटलं आहे.
'20 साल का विश्वास' अभियानाद्वारे 20 वर्षांचा विकास दाखवला जात आहे. असा दावा केला जात आहे की या 20 वर्षांपूर्वी राज्य प्रगतीच्या बाबतीत अंधारात होतं.
'वंदे गुजरात, विश्वास के 20 साल, विकास के 20 साल' - या उपक्रमांद्वारे भाजप आगामी निवडणुकांची तयारी करत आहे.
घरोघरी नळ कार्यान्वित करण्याची योजना असो, इंजिनियरिंग कॉलेजची संख्या वाढवणं असो, गुजरातचा विकास असो, हे सगळं गेल्या दोन दशकात झालं असा दावा केला जात आहे. केशूभाई पटेल आणि सुरेश मेहता यांच्यासारख्या भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांचं काम आणि यश याविषयी कोणतीही चर्चा होत नाहीये.
गुजरातच्या विकासाचं पर्व नरेंद्र मोदी मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतरच सुरू झालं आहे असा दावा काही लोक करत आहेत. काही लोक असे मानतात की एक माणूस पक्षापेक्षाही मोठा झाला आहे.
सध्या भाजप सरकारच्या गेल्या दोन दशकातल्या कामाच्या जाहिराती संपूर्ण राज्यभर प्रदर्शित झाल्या आहेत. रस्त्यारस्त्यांवर, टीव्हीवर, पेपरात सगळीकडे या जाहिराती दिसू लागल्या आहेत.
योगायोग म्हणजे नरेंद्र मोदी दोन दशकांपूर्वी म्हणजे 2002 मध्येच गुजरातचे मुख्यमंत्री झाले होते. त्यांनी 2002, 2007, 2012 मध्ये विधानसभा निवडणुका जिंकल्या. त्यांच्या समर्थकांच्या मते हा विजय फक्त मोदींचा होता.
त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी प्रत्येक निवडणुकीनंतर राजकारणातून बाजूला गेले. मग ते गोरधनभाई जडाफिया असो किंवा केशूभाई पटेल. सुरेश मेहता असोत किंवा शंकरसिंह वाघेला किंवा हरेन पंड्या. या सगळ्यांची राजकीय कारकीर्द अकालीच संपुष्टात आली.
या कालावधीत नरेंद्र मोदींचे प्रतिस्पर्धी राहिलेले हे नेते जनतेपासून दूर होत गेले. या सगळ्याचा अंतिम टप्पा म्हणजे 2022 वंदे गुजरात मोहीम आहे.
यापैकी काही गोरधनभाई जडाफिया भाजपमध्ये परतले. पण त्यांची स्थिती पहिल्यासारखी नाही. सुरेशभाई मेहता सक्रिय राजकारणातून दूर झाले. शंकरसिंह वाघेला काही काळ काँग्रेसमध्ये सक्रिय होते.
गुजरात भाजपच्या मते केंद्रात आठ वर्षांपासून मोदी सरकार आहे. या 8 वर्षांच्या कार्यकाळाभोवतीच सरकारची प्रसिद्धी मोहीम आहे. यामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळाचा समावेश केला जात नाही.
यासंदर्भात गुजरात भाजपचे मुख्य प्रवक्ता यग्नेश दवे यांनी सांगितलं की, "याचं एकमेव कारण म्हणजे 20 वर्षांपूर्वी बिगरभाजप पक्षांचं सरकार होतं. केशुभाई आणि सुरेशभाई यांच्यानंतर राष्ट्रीय दल, शंकरसिंह आणि दिलीप पारीख यांचं सरकार होतं. त्यामुळे केवळ दोन दशकांचीच चर्चा होते".
भाजपच्या बहाण्याने मोदींचा प्रचार
गुजरातमध्ये भाजप, भाजपसाठी नरेंद्र मोदींचा प्रचार करत आहेत. या प्रश्नावर राज्याचे माजी मुख्यमंत्री सुरेश मेहता सांगतात, "गुजरातमध्ये विकास 1990नंतर सुरू झाला. या काळात उद्योगांना अनुमती देण्यात आली. देशात पहिल्यांदा इन्स्पेक्टरराज गुजरातमध्येच संपुष्टात आलं. लोकांना ग्लोबल गुजरात इव्हेंटच्या माध्यमातून गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देण्यात आलं. नरेंद्र मोदी यांच्याआधी राज्यातल्या भाजप सरकारचं नर्मदा योजनेत महत्त्वपूर्ण योगदान होतं."
ते पुढे सांगतात, "मोदी भाजपच्या माध्यमातून स्वत:चाच प्रचार करत आहेत. या रणनीतीमुळे पक्षाचं नुकसान होत आहे असं मेहता यांना वाटतं. मोठ्या कालावधीचा विचार केला तर त्यांना स्वत:ला आणि भाजपला याचा फटका बसू शकतो."
वंदे गुजरातच्या माध्यमातून रेडिओवर घोषणा होतेय की 20 वर्षांत राज्यात इंजिनियरिंग कॉलेजेसची संख्या वाढली आहे. गेल्या 20 वर्षात ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे भाजप सरकारचं यश आहे.
27 वर्षांपूर्वी ऑक्टोबर 1995 मध्ये केशुभाई पटेलांचं सरकार सत्तेत आलं होतं. राज्यातलं पूर्ण बहुमताचं ते पहिलंच सरकार होतं. ते 221 दिवस मुख्यमंत्रिपदी राहिले. त्यानंतर 11 महिने सुरेशभाई पटेल यांचं सरकार होतं.
गुजरातमध्ये सप्टेंबर 1996 ते मार्च 1998 या काळात बिगरभाजप सरकारं सत्तेत होती. यानंतर 1998 ते 2001 पर्यंत केशूभाई पटेल पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. कच्छला भीषण अशा भूकंपाने दणका दिला तोवर ते मुख्यमंत्रिपदी विराजमान होते.
गुजरातच्या निवडणुकीच्या राजकारणात नरेंद्र मोदींचा प्रवेश 2001मध्ये अचानकच झाला. 2014 मध्ये देशाच्या पंतप्रधानपदासाठी त्यांनी गुजरातचं मुख्यमंत्रिपद सोडलं. त्यांच्या जागी आनंदीबेन पटेल, विजय रुपाणी आणि भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री झाले.
विश्लेषकांच्या मते हे सगळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे नेते होते. गुजरातचं राजकारण नरेंद्र मोदींच्या आधीच्या भाजपचा कार्यकाळ पुसण्याचा प्रयत्न करत आहे का?
गुजरात काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते मनीष दोशी सांगतात, "जनताकेंद्रित पक्ष आता व्यक्तीकेंद्रित झाला आहे. त्यामुळे ते एका माणसाविषयी बोलतात. 20 वर्षांच्या विश्वासाची मोहीम घेऊन ते उतरले आहेत. प्रत्यक्षात या 20 वर्षात भाजपने काय गमावलं हे त्यांनी सांगायला हवं".
राजकीय विश्लेषक विद्युत ठाकरे या मताशी सहमत नाहीत. ते सांगतात, "नरेंद्र मोदी यांचं काम आणि विकासाच्या कामाबाबत कोणीही युक्तिवाद करू शकत नाही. त्यांनी असं काम केलं आहे म्हणूनच लोक त्यांच्याविषयी चांगलं बोलतात. मोदींची तुलना आधीच्या भाजप मुख्यमंत्र्यांशी करणं योग्य नाही."
समाजशास्त्राचे अभ्यासक विद्युत जोशी यांच्या मते अशा प्रकारची मोहीम भाजपचं नुकसान करू शकते. काँग्रेस पक्षात एकावेळी इंदिरा गांधींनी असं केलं होतं. तेव्हा प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.
जोशी यांच्या मते काँग्रेस ही आता कार्यकर्त्यांविना असलेल्या नेत्यांचा पक्ष आहे. नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या इतिहासाशी छेडछाड करण्यात यशस्वी झाले तर भाजपची काँग्रेससारखी अवस्था होऊ शकते.