सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 16 मे 2022 (09:37 IST)

शाहरूखची मुलगी, अमिताभ यांचा नातू , श्रीदेवी यांची कन्या झळकणार 'या' सिनेमात

'द आर्चिज' या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला असून झोया अख्तर दिग्दर्शिका असलेल्या 'द आर्चिज' या सिनेमात एक, दोन नव्हे तर तीन 'स्टार किड़्स' आहेत.
 
शाहरूख खानची मुलगी सुहाना, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत.
 
शाहरूखचा मुलीसाठी भावुक संदेश
हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म 'नेटफ्लिक्स'वर येणार आहे. नेटफ्लिक्सने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवर सिनेमाचा टीझर पोस्ट केला आहे.
 
सिनेमात 1960 च्या काळातील चित्र उभं करण्यात आलं आहे. त्यामुळे टीझरमध्येही सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा रेट्रो लुकमध्ये दिसत आहेत.
 
काय आहे 'आर्चिज'?
हा सिनेमा लोकप्रिय इंग्रजी कॉमिक्स बुक 'आर्चिज'वर आधारित असल्याचं सांगितलं जात आहे.
रिव्हलडेल नावाचं काल्पनिक गाव आणि याठिकाणी राहणारे किशोरवयीन मित्र-मैत्रिणी यांच्या नातेसंबंधांवर आणि प्रेम-त्रिकोणावर आधारित हे कॉमिक्स बुक आहे आणि यावर आधारित हा सिनेमा असणार आहे.
 
आर्चिज या कॉमिक्स बुकमधील पात्र हे कलाकार साकारणार आहेत.
सुहाना खान वेरोनिकाच्या भूमिकेत आहे. खुशी कपूरने या सिनेमात बेट्टीचं पात्र साकारलं आहे. अगस्त्य नंदा या सिनेमात मुख्य भूमिकेत असणार आहे. तसंच मिहिर अहुजा, डॉट, वेदांग रैना, युवराज मेंडा या कलाकारांचाही समावेश आहे.
 
शाहरुख खानने आपल्या मुलीच्या पहिल्या सिनेमाचा टीझर पोस्ट करत तिच्यासाठी एक भावूक संदेश लिहिला आहे.
 
आपल्या पोस्टमध्ये शाहरूख म्हणतो, "सुहाना, कायम लक्षात ठेव तू कधीही परफेक्ट बनू शकणार नाहीस. पण त्याच्या जवळ जाण्यासाठी तू जशी आहेस तसा राहण्याचा प्रयत्न करू शकतेस. अभिनेत्री असताना मिळणारं कौतुक हे तू स्वत:कडे ठेवण्यासाठी नाही. स्क्रिनवर जो तुझा अभिनय देशील तो तुझ्याशी संबंधित राहणार आहे. तू खूप मोठा प्रवास केला आहेस पण लोकांच्या मनापर्यंत पोहचण्याचा मार्ग कधीही न संपणारा आहे."
 
अमिताभ बच्चन यांनीही नातू अगस्त्य नंदा याला त्याच्या नवीन कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 'अजून एक उदय' असं म्हणत त्यांनी सिनेमाचा टीझर पोस्ट केला आहे.