रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 6 फेब्रुवारी 2023 (22:05 IST)

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा 3600 एपिसोडनंतरही वाद सुरूच का आहे?

tarak mehta
'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वांत यशस्वी आणि आवडता शो राहिला आहे. हा शो गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या शोमध्ये या वर्षांत अनेक नवे कलाकार सामील झाले, तर अनेक कलाकारांनी हा शो सोडला.
 
शोमधील बदलांमुळे त्याच्या टीआरपीवरही परिणाम झाला. पण आता पुन्हा एकदा 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे निर्माते प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
त्यासाठी या शोचे निर्माते पुन्हा एकदा जुन्या पात्रांची नव्यानं एंट्री करण्यासाठी सज्ज आहेत. लवकरच शोमध्ये नवीन टप्पू आणि टप्पूची आई म्हणजेच दयाबेन यांची एंट्री होणार आहे.
 
दयाबेन आणि टप्पू लवकरच एंट्री करणार
शोचा टीआरपी सांभाळण्यासाठी लवकरच दयाबेन आणि टप्पू हे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये प्रवेश करणार आहेत. अर्थात या कलाकारांचा शोध अद्याप संपलेला नसला तरी शोचे निर्माते या दोन कलाकारांच्या भूमिकांसाठी रात्रंदिवस ऑडिशन घेत आहेत. याच शोमध्ये काही जुन्या पात्रांची एंट्री झाली आहे.
शोमध्ये बावरीच्या व्यक्तिरेखेचा पुन्हा प्रवेश करण्यात आला आहे. या भूमिकेसाठी अभिनेत्री नवीना वाडेकरची निवड करण्यात आली आहे.
 
नवीना वाडेकरबद्दल शोचे निर्माते असित कुमार मोदी सांगतात, "मला बावरीच्या व्यक्तिरेखेसाठी एक नवीन आणि निरागस चेहरा हवा होता आणि आम्ही जे शोधत होतो ते आम्हाला सुदैवानं सापडलं आहे. बावरी शोमध्ये दाखल होताच सेटवरील बावरी आणि बाघाचे फोटोही व्हायरल व्हायला लागले आहेत आणि शूटिंगही जोरात सुरू झाले आहे.
 
शैलेश लोढा यांनी केले आरोप
एकीकडे शोमधील पात्रांचा शोध सुरू असतानाच दुसरीकडे शोशी संबंधित आणखी एक वाद निर्माण झाला आहे. हा नवा वाद शैलेश लोढा यांच्याबद्दल आहे.
 
अलीकडेच शैलेश लोढा यांनी आरोप केला होता की, "शो सोडल्यानंतर सहा महिने उलटूनही शोच्या निर्मात्यांनी त्यांचं लाखोंचं थकलेलं पेमेंट केलं नाहीये."
 
यावर 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे प्रोजेक्ट हेड सुहेल रमाणी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते सांगतात की, "कोणत्याही कलाकाराचं पेमेंट थांबवलेलं नाहीये. शैलेश लोढा यांचा आरोप चुकीचा आहे."
त्यांनी निवेदनात म्हटलंय की, "देयकाच्या कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी वारंवार मेल आणि फोन करूनही शैलेश लोढा सही करण्यासाठी कार्यालयात आले नाहीत. जेव्हा तुम्ही एखादी कंपनी किंवा शो सोडता तेव्हा एक अधिकृत प्रक्रिया असते जी पूर्ण करणं आवश्यक असतं. प्रत्येक कलाकार, कर्मचाऱ्याला ही औपचारिकता पूर्ण करावी लागते. त्याशिवाय कोणतीही कंपनी पेमेंट देत नाही."
 
कंपनीची बदनामी करण्याचा प्रयत्न?
 
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसमधील एका जवळच्या सूत्रानं सांगितलं की, "तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांकडून प्रेम आणि प्रशंसा मिळवत आहे. कधीकधी असमाधानी लोक चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक कंपनीची एक प्रणाली असते. जेव्हा एखादा कर्मचारी किंवा कलाकार पूर्ण आणि अंतिम पेमेंट घेण्यासाठी जातो तेव्हा त्यांनी त्याचं पालन करणं आवश्यक असतं. कंपनीने आजपर्यंत एकाही कलाकाराची पेमेंट थांबवलं नाहीये."
ते पुढे म्हणाले की, "अपूर्ण माहितीच्या आधारे एखाद्या कंपनीची चुकीच्या पद्धतीनं बदनामी करणं अयोग्य आणि अनैतिक आहे. शैलेश लोढा आणि इतर कलाकार हे प्रॉडक्शन हाऊससाठी त्यांच्या कुटुंबासारखे आहेत. संबंधित व्यक्तीच्या आदरापोटी शोमधून बाहेर पडण्याची त्यांची कारणं यावर आम्ही मौन पाळलं आहे. जेव्हा एखादा कलाकार असे वागतो तेव्हा खूप दुःख आणि वेदना होतात. शोमधून मिळालेली लोकप्रियता विसरणं चुकीचं आहे. पेमेंट ही समस्या नाहीये. त्यांना त्यांचं पेमेंट मिळेल. पण त्यांना त्यासाठी क्लोजर करावं लागेल आणि कागदपत्रांवर स्वाक्षरी करावी लागेल.
 
"तारक मेहता का उल्टा चष्माची जनमानसात प्रतिष्ठा आहे. कंपनीनं पैसे देण्यास एक दिवसही उशीर केलेला नाहीये. असे असते तर एकाही कलाकारानं आमच्यासोबत काम केलं नसतं. तारक मेहता का उल्टा चष्मा हा रोज प्रसिद्ध होणारा शो आहे आणि शोचा दर्जा राखण्यासाठी टीम 24 तास काम करत असते."
 
'रन जेठा रन' गेम झाला लाँच
'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा सर्वांत जास्त काळ चालणाऱ्या शोपैकी एक आहे. हा शो 2008 मध्ये पहिल्यांदा प्रसारित झाला होता आणि आता 3600 हून अधिक भागांसह आपल्या 15 व्या वर्षात आहे.
 
या प्रमुख शो व्यतिरिक्त, नीला फिल्म प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या शोला यूट्यूबवर मराठीत 'गोकुळधामची दुनियादारी' आणि तेलुगूमध्ये 'तारक मामा आयो रामा' नावानं प्रसिद्ध करतात.
सर्व शोचे लेखन आणि निर्मिती असित कुमार मोदी यांनी केली आहे. अलीकडेच 'तारक मेहता का उल्टा चष्मा'ने रन जेठा रन हा नवीन गेम लाँच केला आहे. कमी वेळात हा गेम लोकांच्या पसंतीस उतरल्यांच दिसून येत आहे.
 
तारक मेहता का उल्टा चष्माचं बालगीतही यूट्यूबवर सुरू करण्यात आलं आहे. एखाद्या शोची लोकप्रियता इतकी वाढली की त्याच्या नावावर एवढ्या सगळ्या गोष्टी लाँच करण्यात येत असल्याची ही पहिलीच वेळ आहे.
Published By- Priya Dixit