बुधवार, 9 ऑक्टोबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 मे 2016 (10:53 IST)

वास्तवाला भिडणारा हृदयस्पर्शी कथासंग्रह - चवंडकं

काही दिवसांपूर्वी शिरढोण या गावी झालेल्या ‘संवाद’ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविणारे आणि साहित्य क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख असणारे लेखक, कवी, चित्रपट लेखक, कथाकार, कादंबरीकार, गीतकार, पटकथा लेखक, नाटककार आणि चित्रपटातील कलाकार श्री. अशोक भिमराव रास्ते यांची ओळख कवितासागर प्रकाशनचे संस्थापक डॉ. सुनिल दादा पाटील यांनी करून दिली. मला लेखक अशोक भिमराव रास्ते यांना भेटून खूप आनंद झाला, स्वतःची वेगळी ओळख कशी निर्माण करावी हे त्यांच्याकडून सहजपणे समजू शकले.
 
लेखक अशोक रास्ते यांनी लिहिलेला चवंडकं हा कथासंग्रह वाचावयास मिळाला. या पुस्तकाची प्रस्तावना मी लिहायला हवी असे त्यांचे मत होते. कथासंग्रहातील पहिली कथा चवंडकं आहे. त्यामध्ये लेखकाने देवाला सर्वस्व वाहून घेणा-या एका तरूण मुलीची वास्तववादी जीवनातील परिस्थिती मांडली आहे. जिथे अज्ञान आणि गरीबी आहे. तिथे देवाला सर्वस्वी मानून जीवन जगले जाते. परंतु काही गोष्टी समाजाच्या आणि निसर्गाच्या विरूद्ध असल्या तरी त्या अनेकांच्या वर लादल्या जातात. अशा गोष्टींमुळे अनेकांची संपूर्ण आयुष्यच उद्वस्त झालेली आहेत. हे आपण पाहतो परंतु त्यांना अशा वाईट प्रसंगातून बाहेर काढण्यासाठी कोणीही तयार होत नाही. एखाद्यावर झालेल्या अन्यायाची किंवा दुःखाची खरी किंमत त्यालाच समजते ज्याच्यावर प्रत्यक्ष अन्याय झाला आहे आणि अशा कठीण समस्येतून बाहेर पडण्यासाठी स्वतःलाच प्रयत्न करावे लागतात हे त्रिवार सत्य आहे.
 
जन्मदाता या कथेतील अनेक गोष्टी आज पावलोपावली जाणवतील कारण या धावत्या युगात माणसांचे वर्तन खूप बदलले आहे. प्रत्येकजण स्वार्थी आत्मकेंद्री होतांना दिसत आहे. अनेकांना नाती गोती या पेक्षा पैसा, जमीन याचं मोल जास्त वाटू लागलं आहे. अगोदरच्या काळात माणसं माणसांवर प्रेम करीत होती आणि पैशाचा वापर करीत होती. परंतु आज चित्र बदललं आहे, माणसं पैशावर प्रेम करतात आणि माणसांचा वापर करतांना दिसून येतात. प्रत्येक आईवडिलांनी मुलांना मोठं करत असतांना अनेक गोष्टींचा त्याग केलेला असतो. हे स्वतः आईवडिल झाल्याशिवाय मुलांना समजत नाही हे देखील खरे आहे. कसला ही असला तरी जन्मदाता पाठीशी उभा असेल तर आपण कोणत्याही प्रकारच्या समस्येतून, अडचणीतून बाहेर पडू शकतो.
 
जीवन जगत असतांना अनेक प्रकारच्या अडचणी, समस्यांना सामोरे जावे लागते. त्यावर कशा पद्धतीने मात करायची याचे उपाय देखील उपलब्ध असतात. फक्त त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा हे प्रत्येकाने ठरवायचे असते. जेव्हा पावसाचे दिवस असतात पाऊस जोर जोरात कोसळत असतो. तेव्हा अनेक प्राणी, पक्षी पावसापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी धडपडत असतात. निवारा शोधत असतात परंतु गरूड हा पक्षी पावसात आडोसा न शोधता उंच उडी घेवून ढगांच्या वरती पोहचतो त्यामुळे पावसापासून त्याचे संरक्षण होते. या पक्षाप्रमाणे प्रत्येक माणसाने जीवन जगत असतांना सकारात्मक विचार करणे गरजेचे असते आणि त्यासाठी एक शब्द पुरेसा आहे तो म्हणजे बी पॉझिटिव्ह...
 
प्रत्येक माणसाने हे लक्षात ठेवायला हवे की, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही, कोणताही यशस्वी व्यक्ती हा शॉर्टकटने कधीच मोठा होत नाही. त्यासाठी दिवस रात्र कष्ट करण्याची तयारी असायला हवी. काही व्यक्ती फक्त आणि फक्त कष्टच करत राहतात परंतु मिळालेल्या यशाचा आनंद जर तुम्ही उपभोगू शकत नसाल तर ते एक प्रकारचे अपयशच आहे हे सुद्धा लक्षात ठेवायला हवे. प्रत्येकाने बाहेरून सुंदर होण्यासाठी अनेक प्रयत्न, पैसा, श्रम घेतले पाहिजे असे सर्वांचे मत असते. परंतु आंतरिक सौंदर्य ज्या व्यक्तीचे सुंदर असते तो जगाच्या कोणत्याही ठिकाणी गेला तरी सुद्धा स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करू शकतो. लेखक अशोक भिमराव रास्ते यांनी अप्सरा ब्युटी पार्लर या कथेमध्ये खूपच उत्तम पद्धतीने उल्लेख केलेला आहे.
 
लेखकांने शांता या कथेत प्रत्येकाने आत्मपरिक्षण करण्याच्या प्रसंगाचे वर्णन खूपच छान पद्धतीने केले आहे. अनेकजण योग्य वेळी, योग्य निर्णय न घेतल्यामुळे नंतरच्या वेळी पश्चात्तापाचे बळी पडतांना दिसतात. इतरांचे ऐकूण गैरसमज करून घेण्यापेक्षा त्या व्यक्तीला समोरासमोर बोलणे कधीही योग्यच ठरते. चवंडकं या कथासंग्रहामधील प्रत्येक कथेमधून खूप काही शिवण्यासारखे आहे. हा कथासंग्रह नक्कीच प्रत्येकाला आवडेल अशी अपेक्षा आहे. हा कथासंग्रह वास्तवाला भिडणारा आहे. लेखक अशोक रास्ते यांना भावी लिखानासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. त्याच बरोबर मराठी वाचकांसाठी अनमोल अशा आगळ्या-वेगळ्या प्रकारचा कथासंग्रह तयार करणारे कवितासागर प्रकाशनचे प्रकाशक डॉ. सुनील दादा  पाटील यांचे ही मी खूप खूप आभार मानतो.
 
- मंगेश विठ्ठल कोळी लेखक-संपादक-समीक्षक